अंगणवाड्यांतून व्हावा क्षमताविकास

रमेश पानसे (बालशिक्षण शास्त्राचे अभ्यासक)
शनिवार, 29 जुलै 2017


बालशिक्षणाचे क्षेत्र हे बालकांच्या निसर्गदत्त अशा क्षमतांच्या, सामाजिक अंगाने करावयाच्या विकासाचे क्षेत्र असते. बालशिक्षणात, अंगणवाड्यांमध्ये काहीही शिकवायचे नसते, तर मुलांच्या क्षमताविकासास साह्य करावयाचे असते, याचे भान ठेवावे लागेल.

प्राथमिक शाळेतील पहिलीच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला मुलगा कसा असायला हवा? त्याची बौद्धिक तयारी काय असावी? पहिलीपासूनचे "औपचारिक' शिक्षण, म्हणजे गणन, लेखन, वाचन यांचे शिक्षण दर्जेदार होण्यासाठी या मुलांची पूर्वतयारी काय असावी याविषयी बरेच संभ्रम समाजात आणि सरकारमध्ये आहेत. शालेयपूर्व शिक्षणाची तयारी करून घेणाऱ्या अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न, 25 जुलै 2017च्या महाराष्ट्र शासननिर्णयाने (जीआर) करावयाचे ठरविले आहे. त्याचा या पार्श्‍वभूमीवर विचार व्हायला हवा. या निर्णयाच्या प्रस्तावनेत एक समस्या मांडली आहे. ती अशी, की सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी, अंगणवाडीतील मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण झाल्याचे बऱ्याचदा दिसत नाही. हे निरीक्षण रास्त आहे. सरकारने येथे, "शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण' या संकल्पनेचे स्पष्टीकरण दिले नाही. ते दिले पाहिजे. अन्यथा, याचा अवाजवी व अशास्त्रीय अर्थ लावून संबंधित मंडळी अंगणवाडीच्या पहिल्या इयत्तेचा अभ्यासक्रम आणून अंतिमतः मुलांचे नुकसानच करतील, अशी भीती आहे. कारण सरकारने कार्यपद्धती व उपाययोजना निश्‍चित करताना, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शिक्षक हे औपचारिक गणन-वाचन-लेखन शिकविण्यात तरबेज असतील, पण त्यांच्या कोणत्याही शिक्षणात किंवा अनुभवांत "शास्त्रीय बालशिक्षणा'चा मागमूसही नसतो. साहजिकच त्यांना शालेयपूर्व बालशिक्षणात (पूर्व बालशिक्षण नव्हे!) उतरवणे योग्य नाही. तसे उतरविण्यासाठी त्यांना शास्त्रीय बालशिक्षणाची संथा द्यावी लागेल. अन्यथा, ते गणन-लेखन-वाचन यांचाच आग्रह, अंगणवाडी सेविकेकडून धरतील आणि पहिलीचा वर्गच अंगणवाडीत आणून ठेवण्याचा खटाटोप करतील.

"जीआर'मध्ये आणखी दोन बाबींचा उल्लेख आहे. एक, अंगणवाडीतील मुलांना इंग्रजी भाषा परिचित व्हावी आणि दोन, "डिजिटल अंगणवाडी' तयार करावी. इंग्रजीचा परिचय देण्याआधी मराठीचा परिचय अधिक समृद्ध पातळीवर नेण्याची गरज आहे. कारण याच भाषेतून मुलांना अंगणवाडीत आणि नंतर प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायचे आहे. मुले प्राथमिक शाळेत सर्वच विषयांच्या आकलनात, कमी-अधिक प्रमाणात कमी पडत असतील, तर त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मराठी भाषेची अपुरी तयारी घेऊन ही मुले पहिलीच्या उंबरठ्यावर उभी राहतात. मात्र इंग्रजी भाषेचा परिचय व्हावा, असे वाटत असेल, तर परिचय कसा व किती याची निश्‍चिती करावी लागेल. कुठल्याही परिस्थितीत ए,बी,सी,डी.... शिकविणे किंवा पहिलीतील इंग्रजीची क्रमिक पुस्तके अंगणवाडीत आणणे टाळायलाच हवे.
आधी भाषा ऐकून समजू लागते; मग बोलायला येते. याला ती आत्मसात होणे असे म्हणतात. जी भाषा मुलांना थोडीफार तरी ऐकून समजते आणि बोलता येते ती भाषा पुढे वाचन, लेखन या कौशल्यांकडे वळविणे उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांना इंग्रजी ऐकायचे आणि बोलायचे अनुभव काही प्रमाणात देणे इष्ट ठरेल. लेखन व वाचन मात्र टाळलेले चांगले. "अंगणवाडी डिजिटल' करणे म्हणजे नेमके काय, याचे स्पष्टीकरण "जीआर'मध्ये नाही. पण मुलांना आवडतील, मजा वाटेल, अशा फिल्म किंवा निसर्गाची-त्यातील प्राणी-पक्षी यांची ओळख होईल अशा गोष्टी संगणकाच्या साह्याने पडद्यांवर दाखवाव्यात.

बालशिक्षणाचे, म्हणजे शालेयपूर्व (पूर्वप्राथमिक नव्हे!) शिक्षणाचे क्षेत्र हे प्राथमिक शिक्षणापेक्षा गुणात्मकदृष्ट्या पूर्णतः भिन्न आहे. बालशिक्षणाचे स्वतंत्र व विकसित असे शास्त्र आहे. ते आजवर कधी अंगणवाड्यांतून उतरलेले नाही. ही आपली सामाजिक उणीव आहे. पालकांनाही त्याविषयी आपण जागरूक करू शकलो नाही. त्यामुळे, बालवाडी-अंगणवाडीत लेखन-वाचनाचे धडे द्यावेत, असा त्यांचा आग्रह असतो. अनेक बालशाळा या आग्रहाला बळी पडतात व अंतिमतः मुलांच्या क्षमता अधुऱ्या ठेवण्यास कारणीभूत ठरतात.

अंगणवाडीच्या, म्हणजे तीन ते सहा या वयोगटातील शिक्षण हे नेहमीच, बालकांच्या नैसर्गिक स्वरूपाच्या क्षमतांच्या विकासाचे असते. या क्षमता भाषा विकासाच्या असतात तशाच या अंगभूत अशा गणित-संकल्पनांच्याही असतात. या क्षमता शारीरिक विकासातून येतात, तशाच भावनिक नियमनांतूनही येतात. सामाजिक ओळखीने सामाजिक वर्तनाच्या क्षमता विकसित होतात, तशाच निसर्गाच्या ओळखींतून, निसर्गविषयक वर्तनाच्या क्षमताही विकसित होऊ शकतात. या प्रक्रियेला साह्य करणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविधांगी व समृद्ध अनुभव बालकाला कौटुंबिक व परिसरातील वातावरणातून प्राप्त होतीलच असे नाही. अनेक बालकांना त्यांपासून वंचितच राहावे लागते. अशांसाठी (वय-3 ते 6) अंगणवाडी, बालवाडी अशा संस्थात्मक यंत्रणा उपयोगी पडतात. या शिक्षणकेंद्रांतून अनौपचारिक अनुभव देण्याचे, पण योजनाबद्ध काम व्हावे लागते. तेथे कोणत्याही औपचारिक (म्हणजे गणन-वाचन-लेखन) शिक्षणाची लुडबुड अजिबात नको.
बालशिक्षण हे अनौपचारिक शिक्षणाचे, मूलतः क्षमताविकासाचे क्षेत्र. सहा वर्षांपर्यंत क्षमता विकसित झाल्या तर सहाव्या वर्षांनंतर औपचारिक शिक्षणाचा पाया नीट रचता येतो. बालशाळांतून, अंगणवाड्यांतून, मुलांची अनौपचारिक समज कशी वाढेल, मेंदूच्या विकासातून त्यांच्या अंतर्ज्ञानाची कक्षा कशी रुंदावेल आणि इतर मुलांच्या संपर्कातून त्यांची भाववृत्ती कशी विकसेल, हे पाहावे लागते. त्यासाठी उपक्रम साधने आणि साहित्य यांचा वापर करण्याचाच अभ्यासक्रम येथे असतो. तो कसोशीने अंमलात आणला होणारा क्षमताविकास प्राथमिकचा अभ्यासक्रम लीलया पेलण्यासाठी उपयुक्त ठरतो. भाषा व गणिताची क्षमता व समज उपजत असते, असे अनेक संशोधनांचे सार आहे. आपण बालवर्गांमधून मुलांना केवळ विविध भाषानुवांत आणि गणितानुभवांत गुंतवायचे व रमवायचे. मुले आपली आपण शिकतात. चांगल्या शास्त्रीय बालवाड्या व अंगणवाड्या मुलांची बळकट अशी प्राथमिक तयारी करून देत असतातच. मग आणखी वेगळे काही करण्याची व मुलांना ताण देण्याची गरज राहत नाही. आधीचा क्षमताविकास हा नंतरचा औपचारिक शिक्षणाच्या तयारीचा पाया आहे.

आपल्याला, न्याय्यतेच्या दृष्टीने, समतेच्या दृष्टीने आणि प्रत्येक बालकाच्या विकासाच्या दृष्टीने अंगणवाड्या संपन्न होण्याची गरज आहे आणि उपर्युक्त शासननिर्णयात त्यावर नेमके बोट ठेवले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार अभिनंदनास पात्र आहे.

Web Title: ramesh panse writes about development