लेखनात रंगलेले रामअप्पा

ramappa
ramappa

चौदा- पंधरा कादंबऱ्या लिहिणारा, त्याही ३००-४०० पानांच्या! असे असूनही हा लेखक फारसा कुणाला माहीत नाही. वयाची ६५ वर्षे होईपर्यंत त्याची कुठे एकही ओळ प्रसिद्ध झाली नव्हती; पण पासष्टीनंतर त्याच्या पुस्तकांचं नशीब अचानक उघडलं. त्याचं पहिलं पुस्तक ‘खवळलेली नागीण’ प्रसिद्ध झालं आणि हळूहळू त्याची इतर पुस्तकंही मार्गी लागली. त्यापूर्वी त्यानं पुस्तक प्रकाशनासाठी खूप प्रयत्न केले होते, पण पुढे मात्र त्याची पाठोपाठ पुस्तकं निघू लागली नि ती अत्यंत लोकप्रिय झाली. प्रकाशकांच्या त्याच्या पुस्तकांवर उड्या पडू लागल्या. ‘मला पुस्तक न देता तुम्ही दुसऱ्या प्रकाशकाला का पुस्तक दिलं?’ म्हणून काही प्रकाशक त्याच्याशी भांडू लागले. त्याच्या कादंबरीची भाषा साधी- सोपी, प्रासादिक असते. त्यामुळे वाचकांचं मनोरंजन तर होतंच, शिवाय त्यांना वाचनाचा आनंदही मिळतो.त्याचं नाव आहे, राम अण्णा पाटील. पूर्वी गाव त्याला ‘फडणीसाचा रामा’ म्हणत असे आणि अजूनही तसंच म्हणतात; पण त्याची पुस्तकं प्रसिद्ध होऊ लागली, तसं त्याला गाव ‘रामअप्पा’ म्हणू लागलं आहे. 

साहित्याची साधना 
पासष्टीपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालं नाही, म्हणून त्यानं लेखन मात्र मुळीच थांबवलं नाही. साहित्याची साधना तो आयुष्यभर करत राहिला अन्‌ तीही दारिद्य्राशी लढत. त्याला वाचनाचं प्रचंड वेड आहे. वर्तमानपत्रं, मासिकं, कादंबऱ्या यांचं भरपूर वाचन तो करतो. कधी कधी गरिबीमुळे त्याला उपासमारीलाही तोंड द्यावं लागलं. त्याच्या या छंदाला त्याच्या बायकोची मोठी साथ मिळाली आहे. आता त्यानं आत्मचरित्रही लिहिलं आहे. त्याची आणखी काही पुस्तके, तीही चारशे पानांची प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्याच्या आणखी काही कादंबऱ्या प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. हा लेखक गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून कर्णबधीर असूनही, तो साहित्याची साधना करतो आहे. 

‘फडणीसाचा रामा’ हे नाव जवळजवळ पुसत चाललंय. त्याच्याकडे लिहायला टेबल-खुर्ची नाही की पुस्तकांसाठी चांगलं कपाटही नाही. लाकडी दोन-तीन फळ्यांच्या छोट्या रॅकवर त्यानं आपल्या प्रकाशित कादंबऱ्यांची रसिकतेने चवड लावली आहे. खालच्या फळीवर त्याच्या हस्तलिखितांची चवड आहे. समुद्रात वाहणारा बर्फाचा तुकडा जसा सगळा दिसत नाही, त्याखाली तो बर्फाचा तुकडा कितीतरी मोठा असतो तसं रामभाऊचं झालं आहे. त्याची प्रकाशित झालेली पुस्तके सर्वांना माहीत आहेत; पण त्यापेक्षाही त्याची कितीतरी पुस्तकं अजून प्रकाशित व्हायची आहेत. आता त्याला लेखनाचं व कादंबरीचं तंत्र इतकं बेमालूम सापडलं आहे, की त्याबद्दल भलेभलेही ‘दाँतोंतले उँगली दबाते हैं। ’ असंच म्हणावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com