कहाणी ‘कोव्हॅक्सिन’च्या जनकाची

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कृष्णमूर्ती येल्ला यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःची कंपनी स्थापन केली.
Krishnamurthy Ella
Krishnamurthy EllaSakal

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कृष्णमूर्ती येल्ला यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःची कंपनी स्थापन केली. एका ध्यासाने लसनिर्मितीच्या क्षेत्रात ते उतरले. त्यांच्या प्रेरक वाटचालीची ही नोंद.

तमिळनाडू व आंध्राच्या सीमेलगत ‘तिरुत्रणी’ नावाचे खूप मंदिरे असलेले एक नगर आहे. तेथे कृष्णमूर्ती येल्ला यांचा १९६९मध्ये एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्याची इच्छा होती कृषिविज्ञान शिकण्याची. वडिलांना ते पसंत नव्हतं. तरीही कृष्णाने बंगळूर विद्यापीठाचा कृषीविज्ञान अभ्यासक्रमच निवडला व ‘सुवर्णपदक’ पटकावले. पुढे अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात रेण्वीय जीवशास्त्रात डॉक्‍टरेट मिळवली. इतर तरुणांप्रमाणे त्यांना ‘ग्रीनकार्ड’ इत्यादीचे आकर्षण नव्हते. त्यांचे स्वप्न खूप मोठे होते. यामध्ये आपल्या कोट्यवधी देशवासीयांना रोगराईपासून संरक्षण कसं देता येईल, हा विचार त्यांच्या मनात होता. काही दुर्लक्षित आजारांवर उपयोगी पडणारी; पण कमी किमतीतील लसनिर्मिती हे क्षेत्र त्यांना खुणावत होते. या स्वप्नपूर्तीसाठी ते मायदेशी परतले व त्यांनी आपली ‘भारत बायोटेक’ ही कंपनी हैदराबादमध्ये स्थापन केली. त्यांचे पहिले यश ‘हेपेटाइटिस-बी’ या रोगावरील ‘सीझीयम’विरहित लस होती. ही जगातील या प्रकारची पहिलीच लस. सीझीयम क्‍लोराइडच्या वापरामुळे रुग्णांच्या हृदयावर गंभीर परिणाम संभवतात. ‘बिल व मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशन’ला ही गोष्ट समजली व त्यांच्या फाऊंडेशनतर्फे डॉ. कृष्णमूर्ती यांनी रोटाव्हायरस व विषमज्वरवरील लस जगात पहिल्यांदाच निर्माण केली.

ही रोटाव्हायरस लस प्रत्यक्षात येण्यास खूप वर्षे गेली; पण शेवटी यश मिळाले. या लशीची पाश्‍चिमात्य देशातील किंमत जवळपास ८५ डॉलर असून भारतातील या लसप्रकाराची किंमत त्यामानाने नगण्य आहे. ही लस आता सत्तर एक देशांत मिळू लागली आहे. डॉ. कृष्णमूर्ती व त्यांच्या टीमने आतापर्यंत शंभराहून अधिक पेटंट घेतली आहेत.

सुरक्षित आणि व्यवहार्य

अन्‌ आता ‘कोरोना’चे संकट उभे राहिले! त्यावर लस शोधण्याची स्पर्धाच सुरू झाली. सगळ्या फार्मा कंपन्या आपापल्या अंदाजाप्रमाणे एक प्रकारे जुगारच खेळत होत्या. कोरोनाविरुद्धची लस बनवण्याच्या जागतिक स्पर्धेत विविध मार्ग अवलंबिले जात होते. जणू काही एकाच वेळी रेसच्या कित्येक घोड्यांवर पैज लावण्यासारखे हे प्रकरण चालू होते. कृष्णमूर्ती यांच्या मते, लस केवळ सुरक्षित व प्रभावीच नसावी, तर ती व्यवहार्य पण असावी; म्हणजेच वापरण्यात सोपी असावी व साठवणीच्या कठीण अटी नसाव्यात. यास्तव mRNA प्रकारच्या लसी उपयोगी ठरल्या नसत्या. ॲडेनोव्हायरस लस आपल्या शरीरात अशी जादू करते, की शरीराला वाटावे की ‘संसर्ग’ झाला आहे जो केवळ स्पाइक प्रोटिन शरीरात टाकून करता येतो आणि जे (प्रोटीन) व्हायरस पेशीमध्ये शिरण्यासाठी वापरत असतो. असे केल्याने शरीराअंतर्गत प्रतिबंधात्मक संस्था एकप्रकारे चार्ज होते व शरीरही ती स्मरणात ठेवते. मग खरा विषाणू शरीरात शिरल्यावर त्याच्याशी दोन हात करण्यास आपले शरीर तयार झालेले असते. परंतु यातही एक अडचण आली. ती म्हणजे जेव्हा ही लस चिंपांझीवर प्रयोग करून त्याची चाचणी चालू होती, तेव्हा कोरोना विषाणूपासूनचे संरक्षण पूर्णपणे साधत नव्हते, असे आढळले. डॉ. कृष्णमूर्ती यांना एक वेगळी कल्पना सुचली, ज्यायोगे एक सुधारित ‘रेबीज’ची लस व्हेक्‍टर म्हणून वापरून बघितली. पण तीही चालली नाही.

एनआयव्हीचा सहभाग

कोरोनाच्या लशीच्या चाचण्या घेण्यातही ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी एका वेळी २०० चाचण्यांची तपासणी करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. ‘जिनोम सिक्वेंसिंग’ ही किचकट, खर्चिक व वेळखाऊ चाचणीची पद्धत आहे. या चाचण्यांचे सातत्याने निरीक्षण करावे लागते. निरीक्षण नोंदवण्यापूर्वी त्याच्या क्‍लिनिकल व प्रयोगशाळेतील माहितीसाठी ‘डाटा’ लागतो. असे माहिती संकलनाचे कार्य पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले. ‘भारत बायोटेक’ने विकसित केलेल्या लशीच्या निर्मितीत एनआयव्हीने विषाणू विकसित केले. त्याच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या आधारेच ‘भारत बायोटेक’ने लसनिर्मिती केली. भारत हा तिसऱ्या जगातील एकमात्र देश आहे, ज्याने कोरोना लस स्वतःच्या बळावर निर्माण केली.

..आणि स्वदेशी लस तयार झाली

जगभरातील शास्त्रज्ञ अत्याधुनिक mRNA प्रौद्योगिकीचा वापर करून चाचण्या घेत होते, तेव्हा डॉ. कृष्णमूर्ती यांनी retro route (मार्ग) अवलंबण्याचे ठरवले. ‘जुने ते सोने’ अशी एक म्हण आहे आणि खरोखरच त्यांना एका ‘मृत विषाणू’च्या लसीमधून सोन्याची खाणच जणू सापडली. ही पद्धत ‘भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदे’च्या शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन चाचण्यातून विकसित केली गेली. पण या लसीची चाचणी उंदीर व गिनीपिग्ज यांवर करून झाल्यावर माणसांवर प्रयोग करून बघण्याचे अजून राहिले होते. फेज १ व २मधील चाचण्या घेण्यात बऱ्याच अडचणी आल्या.

एकीकडे कोरोनाने मृत्यू वाढत होते, त्यामुळे काळाबरोबरची ही मोठीच स्पर्धा ठरत होती. ‘कोव्हॅक्‍सिन’ यशस्वी होईल का, किती वेळेत, असे अनेक प्रश्‍न त्यांच्या सगळ्या टीमला भेडसावत होते. दुसरीकडे आपल्याच एनआयव्हीच्या मदतीने चाचण्यांचा अवधी कमी करता येईल का, यावरही प्रयत्न सुरू होते. स्वयंसेवकांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या व २८ दिवसांनी त्यांची रक्ततपासणी केली गेली. या चाचण्या एका जैवसुरक्षित प्रयोगशाळेत घेण्यात आल्या, याचे कारण विषाणू भयंकर होता. लस नीट काम करत असल्यास शरीरात बनलेली प्रतिजैविके विषाणूचा पूर्ण नाश करतील व त्याची वाढ खुंटेल. लशीचे परिणाम अत्युत्तम आढळून आल्यावर संपूर्ण टीमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सरतेशेवटी डॉ. कृष्णमूर्ती यांच्या टीमने संपूर्ण देशी लस निर्माण केली. त्याचा उपयोग केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात इतरत्रही होऊ शकेल. थोडक्‍यात ‘कोवॅक्‍सिन’चा जन्म झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com