बावनकशी सौंदर्य (परिमळ)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

चांगलं आणि वाईट अशी वर्गवारी आपण अगदी सहज करतो. मनात त्याचे काही ठरीव निकष नसतात. त्याला कुठली मोजपट्टीही नसते. असलेच तर काही अनुभव आणि त्यांवरून बांधलेले आडाखे इतकंच, अशा वर्गवारीसाठी आपल्याला पुरेसं वाटतं. या वरवरच्या तुलनेतून आपण अनेक गोष्टींविषयी मत ठरवीत असतो. त्याची सत्यसत्यता मात्र कधीच तपासत नाही.

चांगलं आणि वाईट अशी वर्गवारी आपण अगदी सहज करतो. मनात त्याचे काही ठरीव निकष नसतात. त्याला कुठली मोजपट्टीही नसते. असलेच तर काही अनुभव आणि त्यांवरून बांधलेले आडाखे इतकंच, अशा वर्गवारीसाठी आपल्याला पुरेसं वाटतं. या वरवरच्या तुलनेतून आपण अनेक गोष्टींविषयी मत ठरवीत असतो. त्याची सत्यसत्यता मात्र कधीच तपासत नाही.

जग अशा किती तरी विविधतांनी भरलेलं आहे. एकाच्या तुलनेत दुसरं उठून दिसतं, उजवं दिसतं. यांतलं एक नसतं, तर दुसऱ्याचं महत्त्व स्पष्ट झालंच नसतं. असलं वैविध्य नसतंच, तर जगातलं सारं सौंदर्य, सारी भव्यता काजळून गेली असती. तुलनेसाठी त्याच प्रकारचं दुसरं काहीच नसतं, तर चांगल्या-वाईटाचे स्तर निर्माण झालेच नसते. सगळंच एकसारखं, हुबेहूब असतं, तर झाडं सारखी, पानं-फुलं सारखी, झाडांचा विस्तार सारखा, उंचीही सारखी. हे दृश्‍य काही काळ सुंदर वाटेलही; पण ते एकसुरी असणार. दुःखाचे, पराजयाचे, सत्वपरीक्षेचे क्षण अनुभवल्यानंतर आलेल्या सुखाची झुळुक निश्‍चित सुखदच वाटणार.

जगात ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे, त्या प्रत्येकाची विशिष्ट भूमिका आहे. रंगमंचावर पात्रं येतात, आपापले संवाद बोलतात, अभिनय-सामर्थ्यानं ते अधिकाधिक जिवंत करतात. साऱ्यांच्या मेळातून नाटक साकारतं, परिणामकारक होतं. यांतलं एक पात्र बाजूला केलं, तरी मूळ कथानकाचा सूर बिघडून जातो. पात्रं भूमिकेच्या गरजेनुसार अभिनय करतात. त्यांत चांगलं-वाईट ठरवणं फक्त अभिनयाच्या ताकदीवरच शक्‍य असतं. पात्राचा स्वभाव, लकबी यांतील वेगळेपण हे त्याचं वैशिष्ट्य असतं.
हाताची बोटं एकसारखी नाहीत. ती तशी असती, तर आज आपण बोटांनी ज्या कृती करतो, त्यांतील सहजपणा कदाचित हरवला असता. बोटांची लांबी, ताकद, त्याच्या वळण्याच्या दिशा हे निश्‍चित आहे. सारं सवयीनुसार आपोआप होतं, म्हणून वेगवेगळ्या कृतींतील त्यांचा उपयोग आपल्या लक्षातही येत नाही.

हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ अशी लेबलं तर आपण कित्येकदा लावीत असतो. कोण काय स्वरूपाचं काम करतो, त्यावर ही वर्गवारी होत असते. कुठलंही काम एकेकटं महत्त्वाचं नसतंच. दृश्‍य स्वरूपातील भव्यतेमागंही अनेक छोट्या कृतींची ताकद आणि कौशल्य उभं असतं. सूर्य प्रकाशतो, त्यानं आपण दिपून जातो; पण त्यात सामावलेल्या अगणित तेजःकणांचं महत्त्व कमी कसं म्हणता येईल? प्रत्येक कृती तेवढीच महत्त्वपूर्ण असते. एकावर दुसरं यश उभं असतं. छोटी कृती किंवा छोटी कामं करणारी माणसं कमी दर्जाची असतात, असं कसं म्हणता येईल? भव्यतेच्या अज्ञात पायात तीच झगमगत असतात. सत्कार कुणी एक स्वीकारतो; पण त्याच्या यशात अनेक हात असतात. यशाचं तुडुंब कौतुक स्वीकारणाऱ्याइतकेच तेही देखणे असतात. कधीच दिसले नाहीत, तरीही या न दिसण्यातच त्यांचं बावनकशी सौंदर्य असतं. झगमगाटाआड राहून काम करायलाही कमालीची निष्ठा लागते!

Web Title: Real Beaty - parimal article