बंडखोरी आणि प्रगती

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 23 जून 2017

प्राण्याप्रमाणे टोळ्यांमध्ये राहणे सोडून माणसाने समाज घडवला. या समाजाने माणसाला स्थैर्य दिले, सुरक्षितता दिली. याआधी जीवन संघर्षात केवळ टिकून राहण्यासाठी खर्ची पडणारी बुद्धी, शक्ती आता मनुष्यत्वाच्या आणखी-आणखी प्रगतीसाठी उपयोगात आणणे शक्‍य झाले

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी समाजमान्य नियमाविरुद्ध बंडखोरी करण्याची उर्मी अनुभवलेली असते. एवढेच नव्हे तर आपल्या कुवतीनुसार आपापल्या मर्यादामध्ये छोटी मोठी बंडे केलेली असतात. ही बंडाची खुमखुमी बहुतेक वेळा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना सर्वांत जास्त जाणवते. वडील आणि इतर वडीलधारे यांच्यावर विश्‍वास ठेवून, ते सांगितले ते ऐकण्याचे वय मागे पडते आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीबद्दल प्रश्‍न पडायला सुरवात होते. "शिंग फुटायला' लागल्यामुळे ते प्रश्‍न विचारण्याचे धाडसही अंगी येते आणि समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर बंडखोरी केली जाते. व्यक्तीच्या विकासामधला हा अपरिहार्य टप्पा असतो. स्वतंत्रपणे विचार करण्याची, निर्णय घेण्याची, तो अंमलात आणण्याची ही सुरवात असते. या स्वातंत्र्याच्या प्रेरणेला अशा वेळी सक्तीच्या बंधनामध्ये करकचून बांधून टाकले, तर व्यक्तीचा विकासच खुंटतो. तिचे "बाळ'पण संपत नाही.

विशिष्ट समाजाचा किंवा संस्कृतीचा इतिहास बघता असे लक्षात येते, की व्यक्तीप्रमाणेच समाज आणि संस्कृतीही याच प्रकारच्या विकासाच्या टप्प्यांमधून जात असतात. संस्कृती निर्माण होण्याच्याही आधीच्या काळात, आदिमानवाच्या टोळ्या प्राणी पातळीवर, नैसर्गिक प्रेरणांच्या आधीन राहून जीवन जगत होत्या. समाज आणि संस्कृतीची बांधणी होताना या प्रेरणांवर नियंत्रण ठेवणारे नियम तयार झाले. या नियमांचे स्वरूप, रूढी, रीतिरिवाज या प्रकारचे होते आणि वर्षानुवर्षे परंपरेनुसार ते पाळले गेले. बिन पंखाच्या, दोन पायांच्या या प्राण्याची वाटचाल मनुष्यत्वाच्या दिशेने झाली. आपल्या मूलभूत प्रेरणांचे गुलाम न होता, त्यांच्या इशाऱ्यानंतर न नाचता, त्यांना काबूत ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे माणसाला समजले. प्राण्याप्रमाणे टोळ्यांमध्ये राहणे सोडून माणसाने समाज घडवला. या समाजाने माणसाला स्थैर्य दिले, सुरक्षितता दिली. याआधी जीवन संघर्षात केवळ टिकून राहण्यासाठी खर्ची पडणारी बुद्धी, शक्ती आता मनुष्यत्वाच्या आणखी-आणखी प्रगतीसाठी उपयोगात आणणे शक्‍य झाले. विचाराअंती परिपक्व होत गेली.

याच टप्प्यावर कधी तरी आपले भूतकाळातील अनुभव भविष्यकाळाबद्दलच्या अपेक्षा आणि वर्तमान परिस्थिती यासंबंधीच्या विचारमंथनातून परंपरेने स्वीकारलेल्या नियमांबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागले. हे नियम त्रिकालाबाधीत नाहीत ते बदलता येतात. ते बदलायला हवेत याची जाण आली आणि यामधूनच मानवी संस्कृती रूढीवर आधारित नीतिमत्तेची अवस्था ओलांडून, बुद्धीवर, विवेकशक्तीवर आधारित नीतिव्यवस्थेकडे वाटचाल करू लागली. नियमांच्या विवेकपूर्ण चिकित्सेवाचून मानवी संस्कृती प्रगतीची नवी नवी शिखरे कधीच पादाक्रांत करू शकली नसती.

Web Title: rebel and growth

टॅग्स