राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न केले. अशा लोकराजाची आज जयंती.

गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत दोन एप्रिल १८९४ रोजी खास दरबार भरवून त्यामध्ये शाहू महाराजांचे राज्यारोहण झाले. त्यानंतर महाराजांनी आपल्या पहिल्याच जाहीरनाम्यात, ‘आपणाला मिळालेला राज्य अधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून, तो आपल्या रंजल्या-गांजल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब व अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी असल्याचे’ स्पष्ट केले. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या जाती-जमातीच्या लोकांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय २६ जुलै १९०२ रोजी घेऊन तो प्रत्यक्ष राबविण्यास सुरवात केली. आजच्या राज्यकर्त्यांना मंडल आयोगाच्या शिफारशी अमलात आणताना किती विरोध सहन करावा लागला, हे पाहिल्यावर राखीव जागांचा जाहीरनामा काढून त्याची अंमलबजावणी करणारा हा राजा किती दूरदृष्टीचा होता हे लक्षात येते. ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पारशी या जाती वगळता इतर सर्व जातींना त्यांनी आरक्षणाचा लाभ दिला होता.

राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानातील सर्वच मागासलेल्या जातींचा उद्धार शिक्षणाच्या माध्यमातून करण्याचे धोरण स्वीकारले होते. १९०८ मध्ये त्यांनी भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, बागल, शिंदे आदी निकटवर्ती मंडळींना सोबत घेऊन कोल्हापूरमध्ये दलितांसाठी वसतिगृह सुरू केले. त्यासाठी ‘विद्याप्रसारक मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली. भास्करराव जाधव त्याचे प्रमुख होते. राज्यारोहणाच्या प्रसंगी संस्थानात दलितांच्या पाच शाळा होत्या. त्यामधील विद्यार्थी संख्या १६८ होती. १९०७-०८ मध्ये शाळांची संख्या १६ व विद्यार्थ्यांची संख्या ४१६ झाली. १९१२ मध्ये शाळांची संख्या २७, तर विद्यार्थ्यांची संख्या ६३६ झाली.

छत्रपती शाहू महाराजांचा १९०६ चा निवडक आदेश सांगतो, की कोल्हापुरात चर्मकार, महार आदी समाजातील मंडळींसाठी एक रात्रीची शाळा होती. २८ नोव्हेंबर १९०६ च्या आदेशान्वये ती कायम केली. चार ऑक्‍टोबर १९०७ च्या एका आदेशान्वये कोल्हापुरातील चर्मकार व ढोर समाजातील मुलींच्या शाळेसाठी मंजुरी देण्यात आली. तसेच त्या शाळेसाठी दरसाल रुपये ९६ खर्चाची तरतूदही संस्थानच्या स्त्री शिक्षणाच्या अंदाजपत्रकात केली. तसेच वडगाव येथे महार, मांग समाजासाठी शाळा सुरू केली होती; तसेच ढोर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या रात्रीच्या शाळेची मुदतही वाढविली होती.

महाराजांनी संस्थानातील सर्व दलित समाजातील लोकांना सर्व प्रकारचे शिक्षण २४ नोव्हेंबर १९११ च्या आदेशान्वये मोफत केले. हुशार विद्यार्थ्यांना वेळोवेळी खास शिष्यवृत्त्या दिल्या जात. सात एप्रिल १९१९ च्या एका आदेशान्वये ‘दलित लोकांची दैनावस्था ध्यानी’ आणून त्यांच्या शिक्षणास उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराजांनी त्यांना पुस्तके, पाट्या, पेन्सिली मोफत देण्यासाठी अडीच हजार रुपये मंजूर केले. तसेच महाराजांनी सुरू केलेल्या तलाठी वर्गातील दलित विद्यार्थ्यांसाठी दरमहा आठ रुपयांप्रमाणे खास शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. मागासवर्गीय समाजात उच्च शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे आवश्‍यक होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या राहण्या-जेवणाच्या सोयीसाठी वसतिगृहे सुरू करण्याच्या विचारातूनच त्यांनी १४ फेब्रुवारी १९०८ रोजी ‘मिस क्‍लार्क हॉस्टेल’ची स्थापना केली. या वसतिगृहातील एक विद्यार्थी दत्तोबा संतराम पोवार हे कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे चेअरमन होते. दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी १९१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट १९१९ मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले. दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तत्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू झाले.

वकिलीच्या क्षेत्रातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी ११ मार्च १९२० रोजी एका हुकूमान्वये करवीर इलाख्यातील सर्व कोर्टात वकिली करण्यासाठी रामचंद्र शिवराम कांबळे, रामचंद्र सखाराम कांबळे, दत्तात्रेय संतराम पोवार, तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य, कृष्णराव भाऊसाहेब शिंदे, विश्वनाथ नारायण कुंभार, धोंडदेव रामचंद्र व्हटकर आणि कलेश यशवंत ढाले आदींना सनदा देऊ केल्या. दत्तोबा पोवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे यांनी चर्चा करून माणगाव परिषद घेण्याची तयारी चालवली. त्यासाठी निंगाप्पा ऐदाळे डॉ. आंबेडकरांना भेटले. भेटीत २१ व २२ मार्च १९२० ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत; इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते हिंदुस्थानचे पुढारी होतील.’’ डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील पत्रव्यवहारातून त्यांचे संबंध दृढ झाले. 

बाबासाहेबांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद ३० व ३१ मे १९२० रोजी नागपुरात भरवली. या परिषदेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारावे यासाठी बाबासाहेबांनी महाराजांना ११ मे १९२० रोजी पत्र लिहिले. या पत्रात डॉ. आंबेडकर म्हणतात... ‘‘नागपूरच्या परिषदेस हुजूरचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होईल, आमचा व्यूह ढासळणार. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हेत काय? आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय? आणि आम्ही किती काळपर्यंत आजारी आहोत हे आपल्यास सांगावयास नको...आपल्या लडीवाळ अस्पृश्‍य लेकरास वर येण्यास हात द्यावा.’’

शाहू महाराजांना हे पत्र मिळाल्याबरोबर त्यांनी १३ मे १९२० रोजी त्या पत्राला उत्तर पाठविले. त्या पत्रात महाराज म्हणतात,

रा. आंबेडकर यांस,

सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती विशेष. आपले ११ मे १९२० चे पत्र पोचले. मी गव्हर्न्मेंटची परवानगी विचारली आहे. परवानगी येताच आपल्यास कळवितो. माझी मुलगी आजारी असली तरी मी आपले काम हाती घेतले असल्याने कोणतीही अडचण असली तरी ती बाजूस ठेवून मी येण्याचे करितो. 

कळावे, लोभ असावा ही विनंती.

- शाहू छत्रपती

या पत्राप्रमाणे शाहू महाराज नागपूरला परिषदेसाठी गेले. तेथे त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि ही परिषद यशस्वी झाली. राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी दृष्टिकोन, त्यांचे द्रष्टेपण त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीतून दिसून येते. सामाजिक क्रांतीचे त्यांचे विचार एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आजही मार्गदर्शक ठरतील असेच आहेत.

(लेखक कोल्हापूरच्या गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com