द रिपब्लिक! (ढिंग टांग)

- ब्रिटिश नंदी
गुरुवार, 26 जानेवारी 2017

अथेन्सच्या गावकुसाबाहेर
माळरानावर पसरलेल्या
विशाल विद्यापीठातील वातावरण
होते शांत. व्यग्र. चिंतनशील.
कुलगुरु सॉक्रेटिस ह्यांच्या 
पुतळ्याशी एकट्याच बसलेल्या
गुरुवर्य प्लेटो ह्यांना गाठलेच,
त्यांच्या लाडक्‍या, सर्वोत्तम शिष्याने.

‘‘प्रणाम गुरुवर, आपल्या तंद्रेचा
भंग केल्याबद्दल क्षमा करा...
परंतु काही शंका विचारायच्या होत्या...’’
गुरुवर्यांनी अनुमोदनाची मान डोलावली.

अथेन्सच्या गावकुसाबाहेर
माळरानावर पसरलेल्या
विशाल विद्यापीठातील वातावरण
होते शांत. व्यग्र. चिंतनशील.
कुलगुरु सॉक्रेटिस ह्यांच्या 
पुतळ्याशी एकट्याच बसलेल्या
गुरुवर्य प्लेटो ह्यांना गाठलेच,
त्यांच्या लाडक्‍या, सर्वोत्तम शिष्याने.

‘‘प्रणाम गुरुवर, आपल्या तंद्रेचा
भंग केल्याबद्दल क्षमा करा...
परंतु काही शंका विचारायच्या होत्या...’’
गुरुवर्यांनी अनुमोदनाची मान डोलावली.

‘‘गुरुवर, इतिहासाचे आलोडन 
केले असता, असे दिसते की,
सत्ताचक्रात हरेक सत्ता
नव्या आकृतिबंधाला जन्म देते.
धनिकांच्या राजकारणातूनच
तथाकथित कल्याणकारी राजवट
जन्म घेते... आणि टिकतेदेखील.
परंतु, अर्थार्जनाच्या व अर्थवृद्धीच्या
बुभुक्षेपायी प्रबळ होत जाते
ते राज्य नव्हे, तर सशस्त्र सैन्य! 
ह्या प्रबळ सैन्यातूनच अखेर निपजतो,
निष्ठूर, शिस्तप्रिय असा हुकूमशहा,
ज्याच्या शस्त्राच्या धाकाने
गोठतो जीव समाजकारणाचा.
बिरादर भावनेचा...
एकांगी विकास तेवढा साधतो.
तथापि, खड्गाच्या जोरावर
मिळवलेली ही सत्ता अखेर
खड्‌गानेच नष्टही होते.
ते खड्‌ग असते नव्या युगाचे,
असंतोषाच्याच भट्टीत लखलखलेले.
मग लोकशाहीच्या ह्या परिपक्‍व 
मंथनातून उभे राहाते 
एक आदर्श प्रजासत्ताक.
तथापि, तिथेच मेख आहे...

‘‘कुठली मेख?’’ गुरुवर्यांनी
कौतुकाने विचारले.
‘‘प्रजासत्ताकाच्या प्रतिष्ठापनेनंतरही
हे सत्ताचक्र थांबत नाही...
स्वप्नवत अशा प्रजासत्ताकाच्या पोटीच
होतो जन्म अखेर अराजकाचा. असे का?
मूर्तिमंत वत्सलतेच्या पोटी
माणुसकीची कलेवरे खाणारे
विखारी अराजक का निपजावे?’’
‘‘शिष्य ॲरिस्टॉटल,
सत्तेचे मूल्य सत्ताच असते, मग ती 
कोठल्याही आकृतिबंधात बद्ध असो!
आकृतिबंध बदलला तरी सत्ता 
अभंग राहाते... हे त्याचे उत्तर.’’

‘‘ह्यावर उपाय काय...गुरुवर?
शाश्‍वत प्रजासत्ताकाची लक्षणे कोणती?
ॲरिस्टॉटलने प्रश्‍न छेडला.
सत्ताचक्राच्या कुठल्या टप्प्यावर तू
उभा आहेस, त्यावर अवलंबून आहे
ह्यावरला उपाय...
किंचित हसून ते म्हणाले :
ज्याला तू प्रजासत्ताक म्हणतोस,
ते नक्‍की प्रजासत्ताक आहे की
आणखी काही?’’

ॲरिस्टॉटल अजूनही शोधतो आहे,
गुरुवर्यांनी टाकलेल्या कोड्याचे उत्तर!

Web Title: the republic