रस्त्यावरचे मरण सस्ते (अग्रलेख)

file photo
file photo

रस्त्यांवरील अपघातांमध्ये होणाऱ्या जीवितहानीचे देशातील प्रमाण चिंताजनक आहे. नियमपालनाच्या संस्कृतीचा अभाव आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनातील अपयश ही कारणे त्यामागे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे.

के वळ पैसा वाढला, साधनसामग्रीची रेलचेल झाली म्हणजे प्रगती झाली, असे नव्हे. नियमपालनाची संस्कृती रुजणे हा खरे म्हणजे प्रगतीचा मानदंड असतो. पण हे लक्षात न घेताच आपण प्रगतीच्या आणि महासत्तेच्या गमजा मारत असतो. आपल्याकडच्या दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या रस्ते अपघातांविषयीच्या अहवालात जे प्रतिबिंब दिसते, ते असते रस्त्यांवरील अराजकाचे. त्यात यंदाही काही फार फरक नाही. नव्वदीतील जागतिकीकरणानंतर महानगरे आणखी फुगली, वाहनांची संख्या अतोनात वाढली; पण या वाढीव वाहनसंख्येचे, त्यामुळे वाढणाऱ्या वाहतुकीचे व्यवस्थापन नीट झाले नाही. पादचाऱ्यांची तर अक्षरशः गळचेपी होऊ लागली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणविणाऱ्या पुण्यात आजमितीला लोकांच्या संख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक व वेगवान दुचाकींची संख्या वाढत गेली आणि त्याचबरोबर अत्याधुनिक चार चाकी गाड्या मध्यमवर्गीयांच्याही दाराशी दिसू लागल्या. मात्र तितक्‍याच वेगाने सुरक्षित प्रवासाचे नियम मोडणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. या नियमांचे पालन न केल्याने अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण भयावह म्हणावे एवढे वाढले आहे. एका अर्थाने या ‘आत्माहुती’च म्हणाव्या लागतील. दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणे किती आणि कसे अंगाशी येऊ शकते, याची आकडेवारीही धक्‍कादायक आहे. देशात गेल्या वर्षी हेल्मेटविना दुचाकी चालवणारे किमान ९८ लोक रोज मृत्यूला सामोरे जात होते. २०१७ मध्ये अशा ३५ हजार ९७५ दुचाकीस्वारांना हकनाक प्राण गमवावे लागले, तर ३६ हजारांहून अधिक दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले. मात्र, प्राणाला मुकलेल्या दुचाकीस्वारांमध्ये ४२ टक्‍के लोक हे मागच्या सीटवर बसलेले होते. त्यामुळे आता दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट घालणे किती आवश्‍यक आहे, यावर प्रकाश पडला आहे. देशभरातील विविध राज्यांचे पोलिस, तसेच वाहतूक विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेल्या ‘रोड ॲक्‍सिडेंट रिपोर्ट’मधून मन विदीर्ण करून सोडणारा हा तपशील बाहेर आला आहे.
सुदैवाने दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या पाहणीत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या ही २०१६च्या तुलनेत गेल्या वर्षी कमी झाल्याचे आढळून आले आहे. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर या महानगरांबरोबरच नाशिक आणि पुणे शहरात अशा दुर्दैवी जिवांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. बंगळूरमध्येही अशा अपघातांत मृत्यूला सामोरे जाणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. मात्र, जमशेदपूरमधील लोक वाहतुकीच्या नियमांचे बिलकूल पालन करत नसल्याचे दिसते. या पोलादनगरीत अशा अपघातात २०१६ मध्ये ७७ लोकांनी प्राण गमावले होते; मात्र २०१७ मध्ये ती संख्या २२३ वर गेली आहे. या आकडेवारीच्या पार्श्‍वभूमीवर दुचाकीस्वारांबरोबरच चार चाकी गाड्यांमधून प्रवास करणारे लोकही ‘सीट बेल्ट’ लावण्यास टाळाटाळ करत असल्याचे सतत बघायला मिळते. ‘सीट बेल्ट’ न लावल्याने याच वर्षी रोज किमान ७९ प्रवाशांना मृत्यूने गाठले. वर्षभरात अशा ‘सीट बेल्ट’विना प्रवास केल्याने २८ हजारांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या चारचाकी गाड्या मृत्यूच्या दारात घेऊन गेल्या, तर ३३ हजारांहून अधिक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. चारचाकी गाड्या चालवताना ‘सेलफोन’वरून बोलत राहण्याचा हट्टही महाराष्ट्रीय, तसेच उत्तर भारतीय लोकांमध्ये सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही अशीच अंगावर शहारे आणणारी आहे.

सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्‍यक असलेल्या हेल्मेट वा सीट बेल्ट न वापरण्याचा दुराग्रह कसा प्राणांवर बेतणारा ठरू पाहत आहे, तेच हे आकडे सांगत आहेत. मात्र, ते भयावह असले तरी ते सुदैवाने त्या आधीच्या म्हणजेच २०१६ या वर्षाच्या तुलनेत जरासे का होईना कमी आहेत, एवढाच काय तो दिलासा! मात्र, २०१७ मध्ये अशा हट्टापायी एकूणात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असली तरी दिसणारी आकडेवारी ही नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांना धडा शिकवणारीच आहे. हेल्मेट न घालण्यामुळे मृत्यूला सामोरे गेलेल्यांची संख्या २०१६ मध्ये १० हजार १३६ होती. २०१७ मध्ये ती ३६ हजारांच्या घरात गेली आहे. आता ही आकडेवारी बघितल्यावर तरी डोक्‍यावर शिरस्त्राण न घालता वेगाने दुचाकी दडपण्याची सवय लोक टाळतील, अशी आशा आहे. या बाबतीतला निष्काळजीपणा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर घाला घालतोच; परंतु त्या व्यक्तीच्या कुटुंबावरही मोठा आघात होतो. हे लक्षात घेता रस्त्यावरील ही जीवितहानी टाळण्याचे सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com