सरदार पटेलांचे सागरी ‘मंथन’

रोहन चौधरी
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

हिंदी महासागराचे भारतासाठी असणारे महत्त्व लक्षात घेऊन नौदलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी टाकलेली पावले हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या सागरी सुरक्षेत आणि नौदलाच्या विकासातील अमूल्य; परंतु दुर्लक्षित असे योगदान आहे. पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा न उलगडलेला हा पैलू समोर आणणे हाच त्यांचा गौरव आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती. गांधीजींचे कट्टर अनुयायी, संघटनेवर पकड असणारा ‘लोहपुरुष’, पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आणि ‘भारतीय एकतेचे प्रतीक’ अशा असंख्य बिरुदावलींनी जनमानसात त्यांची आठवण आहे. परंतु, आज पटेलांना ‘गुजराती अस्मिता’ आणि ‘नेहरूंचे विरोधी’ अशा राजकीय जंजाळात गोवण्याचे प्रयत्न होत आहेत. इतकेच नव्हे, तर संस्थानांचे विलीनीकरण करणारा लोहपुरुष इथपर्यंतच त्यांचे कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, काळ आणि वेळेच्या जंजाळात व्यक्तींना राजकारणाचे हत्यार बनवले जाते, तेव्हा त्या व्यक्तीचे कार्य विस्मृतीत तर जातेच; परंतु इतिहासाच्या शक्तिशाली प्रवाहात न उलगडलेले कार्यही उमलण्याआधीच कोमेजते. आपल्याकडे ही ‘परंपरा’ दुर्दैवाने मोठी आहे. उदाहरणार्थ आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान, नेहरूंची भारतीय संस्कृतीची मीमांसा, गांधीजींचे सामाजिक विचार, सुभाषचंद्र बोस यांचे भारताच्या सामरिकसंबंधीचे विचार. पटेल यांच्या जयंतीनिमित्त असाच एक न उलगडलेला पैलू समोर आणणे, हाच त्यांचा गौरव ठरेल.

वीस हजार खलाशांचे बंड शमविले 
सव्वीस जानेवारी १९५० रोजी म्हणजे पटेल यांचे निधन होण्याच्या एक वर्षआधी ‘रॉयल इंडियन नेव्ही’चे ‘इंडियन नेव्ही’ असे नामकरण झाले होते. एकीकडे हिंदी महासागरातील मोक्‍याचे ठिकाण आणि दुसरीकडे पाकिस्तानसारखा शेजारी, अशा परिस्थितीत देशाच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर होती. पण, तत्पूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी १९४६ रोजी भारतीय खलाशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’च्या विरोधात बंड पुकारले. हे बंड भारतीय खलाशांना आणि अधिकाऱ्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेल्या सापत्न वागणुकीविरुद्ध होते. वीस हजार खलाशांनी पुकारलेले अशा बंडाचे उदाहरण जगातील नौदलाच्या इतिहासात दुसरे सापडणार नाही. ‘१९४६ चे बंड’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध झालेल्या या बंडाचे लोण अंदमान निकोबार, मद्रास, कोचीन, विशाखापट्टण, मुंबई, कलकत्ता ते एडन, बहारीनपर्यंत पोचले होते. इतकेच नव्हे, तर या बंडाला भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाचाही पाठिंबा होता. माजी नौदलप्रमुख ॲडमिरल एस. एन. कोहली जे त्या काळी ‘तलवार’ या जहाजावर कार्यरत होते, त्यांच्या मते अन्य अनेक कारणांपैकी ब्रिटिश भारतातून जाण्यामागचे हे महत्त्वाचे कारण होते. सरदार वल्लभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने हे बंड शमविण्यात आले. या बंडाचा परिणाम म्हणून आठ मार्च रोजी फिल्डमार्शल सर क्‍लॉड औचिनलेक यांच्या शिफारशीनुसार न्यायाधीश, हवाई दलाचे उपप्रमुख आणि भारतीय सैन्यातील ब्रिटिश मेजर जनरल यांची समिती नेमण्यात आली. या समितीच्या शिफारशीत आधुनिक नौदलाची बीजे रोवलेली दिसतात. १९४८-४९ च्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाचे सिंहावलोकन करताना पटेल आणि नेहरू यांच्या मध्यस्थीचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात येईल. हे बंड शमविण्यात थोडा जरी उशीर झाला असता, तर या युद्धाचा निकाल कदाचित पाकिस्तानला अनुकूल झाला असता.

नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी योजना
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सर्वांत महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे आधी विकास की आधी संरक्षण? भारतासारख्या गरीब देशाने विकासाला प्राधान्य देणे हे क्रमप्राप्त होते. परंतु, पाकिस्तानची निर्मिती आणि शीतयुद्धाच्या राजकारणात संरक्षणसिद्धता गरजेची होती. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या संरक्षक समितीच्या पहिल्याच बैठकीत नौदलाच्या अत्यानुधिकीकरणासाठी दहा वर्षांची योजना तयार करण्यात आली. या समितीने दोन विमानवाहू युद्धनौका, तीन टेहळणीयुक्त युद्धनौका, आठ विनाशिका, चार पाणबुड्या आणि अन्य छोटी जहाजे यांची निर्मिती करण्याला मंजुरी दिली. एकंदरीतच, स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती पाहता ही योजना महत्त्वाकांक्षी होती. या पार्श्वभूमीवर सरदार पटेलांनी माजी नौदल उपप्रमुख एन. कृष्णन यांच्याकडे पोर्तुगिजांपासून गोवा मुक्त करण्यासंबंधी  विचारणा केली होती. हा सूचक प्रश्न म्हणजे पटेलांच्या दूरदृष्टीचे द्योतक म्हणावे लागेल. पटेलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे गोव्याचे स्वप्न अपुरेच राहिले. परंतु, त्यांचे योगदानही काळाच्या ओघात विस्मृतीत गेले.
केशव वैद्य यांनी १९४९ च्या ‘नेव्हल डिफेन्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात पटेलांचे सागरी सुरक्षेसंबंधीचे विचार नमूद केले आहेत. पटेलांच्या मते भारताचे भौगोलिक स्थान, त्याला लाभलेल्या किनारपट्ट्या आणि आजूबाजूला पसरलेला अथांग समुद्र बघता त्याच्या संरक्षणासाठी सक्षम नौदलाची नितांत आवश्‍यकता होती. एकीकडे जागतिक इतिहास हा सागरी सुरक्षेवर ज्याचे नियंत्रण असेल, तोच देश जागतिक राजकारणाच्या स्पर्धेत टिकतो, असा होता. ब्रिटन आणि अमेरिका ही त्याची यशस्वी उदाहरणे होती, तर दुसरीकडे भारताचा इतिहास हा भारताच्या सुरक्षेला कायमच उत्तरेकडून धोका असल्याचे सूचित करणारा होता. या पार्श्वभूमीवर सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष देणे हे साहजिकच. परंतु, यात नौदलाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका अधिक होता. मात्र, गोवामुक्तीचा विचार आणि हिंदी महासागराचे भारतासाठी असणारे महत्त्व लक्षात घेऊन नौदलाचे अत्याधुनिकीकरण हे पटेलांचे भारताच्या सागरी सुरक्षेत आणि नौदलाच्या विकासातील अमूल्य; परंतु दुर्लक्षित असे योगदान म्हणावे लागेल.

‘सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर?’ अशा प्रकारच्या अतार्किक प्रश्नांवर चर्चा करणे, नेहरू आणि पटेल यांच्यातील वैचारिक मतभेदांचा संकुचित राजकारणासाठी वापर करणे, यात वास्तविक पाहता पटेलांच्या विचारांचे अवमूल्यन आहे. त्याऐवजी पटेल व नेहरू यांनी एकत्रितपणे राष्ट्रनिर्मितीत केलेल्या योगदानांना उजाळा देणे, २६/११ रोजी समुद्रातून झालेला दहशतवादी हल्ला, यामुळे भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला झालेला धोका लक्षात घेणे, हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित करणे आणि त्यासाठी नौदलाला अधिक सक्षम करणे, हेच पटेलांना खरे अभिवादन ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohan Chowdhury article sardar vallabhbhai patel