
धर्माचे गहन स्वरूप
रोहन उपळेकर
आ चरण हा धर्माचा गाभा आहे आणि मोक्ष हे धर्माचे अंतिम प्राप्तव्य आहे. महात्म्यांनी धर्माची गती गहन आहे, असे आवर्जून म्हटलेले आहे. कारण धर्म ही प्रत्यक्ष श्रीभगवंतांचीच विभूती आहे. धर्म ही खूप व्यापक आणि प्रगल्भ संकल्पना असल्यामुळे विविध महात्म्यांनी, दर्शनांनी, स्मृति-पुराणांनी धर्माच्या वेगवेगळ्या बाजूंचा सखोल विचार करून आपापल्या व्याख्या केलेल्या दिसून येतात.
असंख्य थोर विचारशील महात्म्यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी या व्याख्यांच्या संदर्भात सविस्तर ग्रंथरचनाही केलेल्या आहेत.श्रीदत्त संप्रदायाचे अध्वर्यू सद्गुरु मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या ‘श्रीपाद बोधसुधा’ ग्रंथात स्मृति-पुराणे आणि महात्म्यांनी केलेल्या धर्माच्या एकोणीस व्याख्या स्पष्ट करून सांगितल्या आहेत. आपण त्यातील महत्त्वाच्या व्याख्यांचा विचार करू या.
‘चार्वाक दर्शन’ हे नास्तिक दर्शन म्हटले जाते. आपल्या व्यक्तित्वाचा ज्या ज्या गोष्टींमुळे उत्कर्ष होईल व ज्यामुळे लौकिक भोग चांगले मिळतील तोच त्यांच्या दृष्टीने धर्म आहे. सध्या आधुनिकतेच्या नावाखाली हाच धर्म सगळीकडे पसरत चाललेला दिसतो आहे. ‘रीण काढून सण साजरे करावेत’ ही मराठी म्हण या वृत्तीचे प्रतिनिधित्व करते.
पूर्वमीमांसा शास्त्रानुसार वेदांनी आपल्या कल्याणाची जी काही साधने वर्णन केलेली आहेत, त्या यज्ञयागादी साधनांनाच धर्म असे म्हणतात. या साधनांचे निष्ठेने आणि प्रेमाने बिनचूक आचरण करण्यावरच त्यामुळे पूर्वमीमांसेचा मुख्य भर आहे.
वेदान्तशास्त्रानुसार अंतःकरण शुद्ध करणाऱ्या साधककर्मालाच धर्म म्हणतात. लोकहितकारी कर्मांनाही त्यांनी धर्म म्हटलेले आहे. हेच सोप्या भाषेत सांगायचे तर, स्वार्थरहित सात्त्विक वर्तन हा धर्म होय.
ज्यामुळे आपलाही उत्कर्ष होईल आणि त्याचा लाभ इतरांनाही होईल; किमानपक्षी आपल्या उत्कर्षाने इतर कोणाही जीवाचा अपकर्ष किंवा तोटा होणार नाही, हाही विचार त्यात अनुस्यूत आहे.
या धर्माचरणाने आपल्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण-चतुष्टयावर जन्मजन्मांतरीच्या कर्मांमुळे साठलेली वासना-विकारांची अशुद्धी नष्ट होऊन ते स्वच्छ व शुद्ध होणे अपेक्षित आहे.
अशाच अर्थाने श्रीमन्महाभारतही म्हणते की, ज्यामुळे प्राणिमात्रांचे भरण पोषण होते म्हणजेच त्यांचा योगक्षेम सुयोग्य पद्धतीने होतो, तोच धर्म होय. वेदांचे उत्तम जाणकार महर्षी भारद्वाज म्हणतात, ज्या कर्मांमुळे तमोगुणाचा ऱ्हास होऊन सत्त्वगुणाचा उदय होतो, त्यांनाच धर्म असे म्हणतात.
महर्षी कणादांच्या वैशेषिक दर्शनानुसार ज्या कर्मांमुळे मानवाचा या लोकात अभ्युदय होऊन शेवटी निःश्रेयसाची, मोक्षाची प्राप्ती होते, त्यालाच धर्म म्हणतात. श्रीविष्णूंचे कलावतार भगवान श्री कपिल महामुनींनी गौरविलेल्या सांख्य दर्शनानुसार, सत्कर्मजन्य अंतःकरणाच्या एका विशेष वृत्तीलाच धर्म म्हणतात.
प्रकृतीच्या विकारांपासून, भोग-विलासापासून अलिप्त करून, अनासक्त करून मनुष्याला त्याच्या आत्मबोधाची प्राप्ती करून देणारी कर्मेच धर्म होत. ज्ञानाच्या भूमिकेने कर्मभोगांमध्ये सारासारविवेक करून, हळूहळू भोगविलासापासून दूर होऊन म्हणजेच वैराग्य बाणवून आत्मज्ञानाची प्राप्ती करवून घेणे हेच सांख्यदर्शनाला धर्म म्हणून अभिप्रेत आहे.
या व्याख्यांवरून आपल्या लक्षात आलेच असेल की धर्माचे स्वरूप केवढे गहन आणि विविधांगी आहे. आज धर्म हा शब्द फार उथळपणे वापरला जातो. प्रत्यक्षात त्याची व्याप्ती अद्भुत आणि विलक्षणच आहे. धर्माच्या आणखी काही व्याख्या आपण पुढील लेखात अभ्यासू या.