रशियाच्या नजरेतून भारत

डॉ. अशोक मोडक (नॅशनल रिसर्च प्रोफेसर)
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानने उभारलेले दहशतवाद्यांचे तळ 29 सप्टेंबरला भारताने उद्‌ध्वस्त केले. याचा अर्थ मॉस्को व रावळपिंडी यांच्यात गोत्र जुळले आहे, हे कळल्यानंतरही दिल्लीने साहस केले. पाठोपाठ दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, श्रीलंका या चार देशांनी पाकिस्तानात होणाऱ्या 'सार्क‘ परिषदेवर बहिष्कार टाकला.

भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव अथवा दुरावा औटघटकेचाच ठरतो, दोस्ती टिकाऊ ठरते. त्यामुळेच पाकिस्तानबरोबर रशियाने संयुक्त लष्करी कवायती केल्या, याचा अर्थ त्या देशाचे धोरण बदलले, असे मानण्याचे कारण नाही. 

काही दिवसांपूर्वी रशियन सरकारने 'आमचे लष्कर आणि पाकिस्तानचे लष्कर संयुक्त कवायती करतील,‘ अशी घोषणा केली; तसेच आमचे आरमार आणि चीनचे आरमार दक्षिण चीन सागरात संयुक्त कवायती करतील, असेही जाहीर केले. त्यामुळे तुम्हा-आम्हा सर्वांना धक्का बसला. 1955 मध्ये आपण रशियाबरोबर भिलाई करार केला, तेव्हापासून भारत व रशियात सौहार्द आहे. तत्कालीन रशियन कर्णधार निकिता क्रुश्‍चेव्ह यांनी तर श्रीनगरमध्ये भाषण करताना 'या हिमालयाच्या पलीकडे आम्ही निवास करतो, आम्हाला केव्हाही बोलवा, तुम्हाला सर्व ते साह्य करण्यासाठी आम्ही धावत येऊ‘‘ असे आश्‍वासन भारताला दिले होते. नंतरही प्रश्‍न काश्‍मीरचा असो, गोव्याचा असो वा बांगलादेशाचा असो - सुरक्षा समितीत नकाराधिकार वापरून भारताला कायमच मॉस्कोने दिलासा दिला. खुद्द नरेंद्र मोदींनीच या इतिहासाचे भान बाळगून 'मॉस्को व दिल्ली या जणू सख्ख्या बहिणी आहेत‘ असा अभिप्राय दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारताला छळणाऱ्या राहू-केतूंना रशियाने जवळ करावे याचा भारताला विस्मय वाटला. रशियाची नवी नीती वेदनादायकही वाटली. उरीमध्ये व तत्पूर्वी पठाणकोटमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ले केले आणि चीननेही अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या समूहात भारताच्या प्रवेशाला विरोध केला, तसेच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये रस्ते बांधण्यात चीनने रूची दर्शविली, अशा वेळी रशियाच्या वरील घोषणा म्हणजे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उपद्‌व्याप आहे, असा निष्कर्ष भारताने काढला तर त्यात नवल कसले? 

या विषयावर दोन दृष्टिकोनांतून भाष्य करता येईल. एकतर भारताने नुकताच अमेरिकेशी मैत्रीचा करार केला आहे. फ्रान्ससारख्या देशातून संरक्षण सामग्री खरीदण्याचे धोरण स्वीकारले आहे. म्हणजे गेली कैक वर्षे आपण केवळ रशियाकडून जी खरेदी करीत होतो, ती इतःपर अन्य देशांतून करणार हा सध्याचा पवित्रा आहे. अमेरिकेबरोबर रशियाचे जे संबंध आहेत, त्यात सातत्याने चढ-उतार होत असतात. नुकताच सीरियाच्या प्रश्‍नावरही अमेरिका व रशिया यांच्यात तंटाबखेडा झाला. तेव्हा ज्या अमेरिकेशी आमचा वाद आहे, त्या राष्ट्राबरोबर मैत्री करार करणारा भारतही आमच्या लेखी बिनभरवशाचा ठरतो, अशी रशियाची भूमिका दिसते. मग प्रतिक्रिया म्हणून भारताशी वैर करणारा पाकिस्तान रशियाला जवळचा वाटतो. 

रशियाच्या भारताबाबतच्या वर्तमान नीतीला आणखी एक परिमाण आहे. गेल्या 61 वर्षांत अधूनमधून काही ना कारणांमुळे रशिया-भारत संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो; पण तो औटघटकेचा खेळ ठरतो. अल्पावधीतच खुद्द रशिया पुढाकार घेऊन दुरावा संपुष्टात आणतो, हा इतिहास आहे. उदाहरणार्थ, ऑक्‍टोबर 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा 'प्रावदा‘ने 'चीन रशियाचा भाऊ आहे, तर भारत मित्र आहे,‘ अशी शेरेबाजी केली होती; पण काही अवधीनंतर याच रशियाने भारताला साह्य केले व चीनकडून शिव्याशाप खाल्ले.

ताश्‍कंद करार झाल्यानंतर दक्षिण आशियात 'आपण प्रभाव वाढवायचा‘ असे धोरण रशियाकडून अंगीकारले गेले, त्या धोरणाच्या प्रकाशात 'पाकिस्तानात आम्ही पोलाद कारखाना उभारून देऊ‘ ही घोषणा रशियाने केली; पण बांगलादेश निर्माण झाला व त्या प्रक्रियेत रशियाने भारतासाठी हिताची कामगिरी बजावली. आणीबाणीला रशियाने पाठिंबा दिला होता; पण निवडणुकीत मतदारांनी इंदिरा विरोधकांना भरघोस मते देऊन सत्तेच्या मखरात बसविले. तेव्हा इंदिरा विरोधकांच्या सरकारला सोव्हिएत संघ कशी मदत देईल, असा काळजीयुक्त प्रश्‍न मोरारजी देसाई, वाजपेयी यांची बेचैनी वाढविणारा ठरला; पण तत्कालीन सोव्हिएत परराष्ट्रमंत्री आन्द्रे ग्रोमिको भारतात आले व अधिक सवलतींनी युक्त असलेले अर्थसाह्य भारताच्या पदरात टाकले. 1991 मध्ये सोव्हिएत संघ कोसळला, तिथे पंधरा सार्वभौम राष्ट्रे मार्गक्रमण करू लागली. किमान दोन वर्षे तरी भारत व इतर विकासोन्मुख देश रशियापासून दुरावले; पण 1993 मध्ये तत्कालीन रशियन अध्यक्ष बोरिस येल्त्सिन भारताच्या दौऱ्यावर आले अन्‌ ताणतणाव संपले. दिल्ली आणि मॉस्को पुन्हा मैत्री मार्गावर वाटचाल करू लागले. या सर्व विवेचनाचा अर्थ असा, की भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव अथवा दुरावा औटघटकेचाच ठरतो नि दोस्ती टिकाऊ ठरते. 

अलीकडेच 'आमचे लष्कर व पाकिस्तानी लष्कर संयुक्त कवायती करतील,‘ अशी घोषणा रशियाने केली; पण मग तातडीने त्यांनी खुलासा केला - 'पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये म्हणजेच वादग्रस्त क्षेत्रात या कवायती होणार नाहीत.‘ 

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानने उभारलेले दहशतवाद्यांचे तळ 29 सप्टेंबरला भारताने उद्‌ध्वस्त केले. याचा अर्थ मॉस्को व रावळपिंडी यांच्यात गोत्र जुळले आहे, हे कळल्यानंतरही दिल्लीने साहस केले. पाठोपाठ दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, श्रीलंका या चार देशांनी पाकिस्तानात होणाऱ्या 'सार्क‘ परिषदेवर बहिष्कार टाकला. मग मालदीव व नेपाळ या उर्वरित दोन सदस्य देशांनीही 'पाकिस्तानातील 'सार्क‘ परिषदेने गाशा गुंडाळावा,‘ असे आवाहन केले. तात्पर्य, सहा सदस्य देशांनी भारताचीच तळी उचलून धरली. पाकिस्तान एकटा पडला तो या पार्श्‍वभूमीवर. या परिस्थितीत रशियाने आपल्या धोरणात एकदम बदल केला - 'भारताने 29 सप्टेंबरला जी कारवाई केली, ती समर्थनीयच आहे; पाकिस्तानने दहशतवादाला अजिबात थारा देऊ नये,‘ असे पत्रकच रशियाचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर कंडाकिन यांनी प्रसृत केले. म्हणजे ग्रहणाचे किटाळ टळले व पाच बड्या राष्ट्रांपैकी रशियानेच भारताची पाठ थोपटण्यात उजळ माथ्याने उत्साह दाखविला. रशियाच्या चष्म्यातून भारत हा दोस्त आहे. कधी या दोस्तीत काही विघ्न आले, तरी ते अल्पकालीनच ठरते.

Web Title: Russia and India have strong bonding, writes Ashok Modak