सभ्येतेचे सार (परिमळ)

सभ्येतेचे सार (परिमळ)

सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएकाजींचा एक दोहा कानावर पडला -
जिसके मन मे प्रज्ञा जगी - होय विनम्र विनित ।
जिस डाली को फल लगे - झुकनेकी ही रीत ।।
तो ऐकताना महात्मा गांधींची आठवण झाली. एकदा गांधीजी चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्याच्या छोट्या घरी गेले. भेट झाल्यावर गांधीजींनी विचारले. ""आमच्या प्रार्थनेची झलक तुम्हाला पाहायची आहे का? चॅप्लीनने उत्तर दिले की त्याचे घर खूपच लहान असून, प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले, "तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू.‘ त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली. पुढे चॅप्लीनने लिहिलेय, ""गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांना माझ्यासमोर जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही; पण मी मात्र त्यांच्यापुढे सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो.‘‘ खरोखर मित्रांनो, आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्युपत्रात त्याने "अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील, अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा‘, असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने सर्वांना एक संदेश दिला होता, ""मी सिकंदर, मी जग जिंकले, पण रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हातानेच परत चाललोय.‘‘ म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठ, सत्ता मिळवली, तरी वृथा अभिमान बाळगू नका, नेहमी नम्र राहा.
म्हणतात ना - "महापुरे झाडे जाती - येथे लव्हाळे वाचती.‘ महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपात्रातील लव्हाळ्याच्या पाती सकाळच्या वेळी सूर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेची महिमा सांगताना संत बसवेश्‍वर विचारतात. ""गाय आपल्या पाठीवर बसणाऱ्यांना कधी दूध देईल का? ज्याला दूध हवे त्याने गायीच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.‘‘
बहिणाबाई चौधरींच्या काही ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते.
फाट आता टराटरा - नाही दया तुफानाला।
हाले बाभळीचे पान - बोले केळीचे पानाला ।।
बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान, सोसाट्याच्या वाऱ्याला केळीचे पान आडवू पाहते व आपला ऊर फोडून घेते. बाभळीचे पान वाऱ्याला कौतुकाने कुरवाळते, त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज म्हणतात - ""लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ।‘‘
हे लहानपण म्हणजे आपले अवमूल्यन नव्हे; तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी व शांत होतो, नम्र होतो. निसर्गाला नम्रतेचे आसन आवडते. नम्र माणसाच्या मागे सगळ्या शुभशक्ती उभ्या राहतात. परंतु, आधुनिक युगात बऱ्याचदा सद्‌गुणी माणसाला लोक त्रास देतात. त्या वेळी तुम्हाला जशास तसे उत्तर देता आले पाहिजे. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहून कठोर होत असतात, असे तुकाराम महाराजांच्या अभंगात वाचावयास मिळते. त्यामुळे वेळप्रसंगी वज्रासारखे कठोर व्हा; पण अंतर्मनात मंगलमैत्री असू द्या. विनम्रता म्हणजे लाचारी किंवा दुर्बलता नसून, निष्कपट, निष्कलंक, निराग्रही सरलता, मनाची शुद्धता आहे. ही विनम्रता आचरणात आणण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com