अग्रलेख : 'ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी'ची कसोटी 

sakal editorial on 1st january 2020
sakal editorial on 1st january 2020

नववर्षाची प्रभात होत आहे, ती काही केवळ सरत्या वर्षांच्या संध्येला झालेल्या रंगारंग मैफलींच्या आठवणी जागवतच असे नव्हे, तर गतवर्षाला कवेत घेणाऱ्या आठवणी आणि नव्या दशकाची चाहूल लावणाऱ्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊनच! एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचे अखेरचे वर्ष आजपासून सुरू झाले आणि समस्त भारतवासीयांच्या मनात स्मृती जागृत झाल्या, त्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या "2020 मध्ये भारत महासत्ता बनेल!' या स्वप्नाच्या. स्वप्ने बघायला कितीही सुंदर असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे किती कठीण असते, हेच सरत्या दशकाने दाखवून दिलेले कठोर वास्तव आहे. शिवाय, हे वास्तव केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर स्वप्नांच्या दुनियेत मश्‍गूल असलेल्या संपूर्ण जगाला सरत्या दशकाने समजावून सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. नवे दशक सुरू झाले तेव्हा हातात आलेल्या "स्मार्ट फोन'मुळे इंटरनेटचे जाळे आपल्याला कवेत घेऊ पाहत होते. याच इंटरनेटच्या माध्यमातून आपण सारेच एका आभासी दुनियेत वावरू लागलो. या दशकाची सर्वांत मोठी देन काय, असा प्रश्‍न विचारला गेला, तर त्याचे उत्तर अर्थातच स्मार्ट फोन, हे आहे. स्मार्ट फोनने आपले आयुष्य बदलून टाकले आणि लॅंडलाइनच्या फोनपासून ते कॅमेऱ्यापर्यंत आणि टेपरेकॉर्डरपासून बॅटरीवाल्या टॉर्चपर्यंत अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातून गायब करून टाकल्या! सुंदर आणि सुवाच्य हस्ताक्षर ही बाबही इतिहासजमा होऊन गेली; एवढेच काय इंग्रजी भाषेचे अचूक स्पेलिंग आपण पुरते विसरून गेलो! अर्थात, हे बदल एवढ्या वरवरचे नव्हते आणि नाहीत. अगदी 2014 मधील राजकीय सत्तांतरातही "समाजमाध्यमां'ची कळीची भूमिका होती, हे सगळेच जाणतात. 2019च्या निवडणुकीतही तो बदल आणखी ठळक झाला. अर्थात, ही प्रक्रिया म्हणजे केवळ सत्तांतर नव्हते, तर त्यात बरीच उलथापालथ होती. त्याचे तात्कालिक उद्रेकही आपण अनुभवत आहोतच. परंतु, केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण आणि अर्थकारणही या दशकात आरपार बदलून गेले आणि "आयडिया ऑफ इंडिया' या संकल्पनेतही मोठा बदल होऊ घातला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाचे याच सरत्या वर्षातील काही निर्णय हे देशाचे राजकीय, तसेच सामाजिक नेपथ्य बदलण्यास कारणीभूत ठरले आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकाल होता तो अयोध्येतील राममंदिराबाबतचा! अर्थात, असे हे मूलगामी स्वरूपाचे बदल काही केवळ भारतातच घडत होते, असे बिलकूलच नाही. अवघे जगच बदलाच्या दिशेने निघाले होते आणि मोदी असोत की डोनाल्ड ट्रम्प; बोरिस जॉन्सन असोत की पुतीन, असे नेते जागतिक स्तरावर एकूण बदलांचे प्रतिनिधित्व करताना दिसताहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला जागतिकीकरणाचा प्रवाह चालू दशकात दिशा बदलताना दिसला. प्रत्येक देश उदारीकरणाची चौकट नाकारून कोशात जाण्यास उत्सुक बनला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादाच्या तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. भारत असो वा चीन, यांसारख्या उदयोन्मुख देशांना जागतिकीकरणाचा लाभ घेऊन विकासाचा सोपान चढता येत होता. पण, अग्रगण्य पाश्‍चात्त्य राष्ट्रेच आता वेगळा विचार करताहेत आणि त्यांना जनमानसाचा पाठिंबा मिळत आहे. अर्थगतीची चाके मंदावल्याने त्याचा मुकाबला कसा केला जाणार, हे नव्या वर्षातील साऱ्या जगापुढचे आव्हान आहे. भारतापुढेही ते आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट दूर करणे, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण करणे आणि त्यासाठी कौशल्यविकासाची गंगा सर्वदूर पोचविणे, ही आव्हाने भारतापुढे आहेत. त्यांना सरकार आणि समाजही कसे सामोरे जातो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यादृष्टीने आगामी वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरेल. 
काही नेते आणि समाजकारणी जगाला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ पाहत असतानाच, जगभरातील तरुणाईने आपल्या आशा-आकांक्षा अधिक आग्रहीपणे मांडायला सुरुवात केलेली दिसते आणि हे आश्‍वासक आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध उठविलेला आवाज असो की ठिकठिकाणच्या दमनशाहीच्या विरोधात उघडपणे केलेला विरोध असो, तो आशेचे नवे अंकुर रुजविणारा आहे. त्या बळावर अधिक सुखी-संपन्न जीवनाकडे जाण्याचा मार्ग येत्या वर्षात प्रशस्त व्हावा, ही नववर्ष दिनानिमित्त शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com