अग्रलेख : भाजपचे नवे कारभारी

Chandrkant Patil
Chandrkant Patil

कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांची निवड ही जितकी अपेक्षित होती, तितकी लोढा यांची नियुक्‍ती अपेक्षित नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीला जेमतेम अडीच-तीन महिने असताना, या निवडीतून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक 'मेसेज' आपल्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर राज्यातील विरोधकांना देण्यात यश मिळवले आहे आणि तो म्हणजे 'कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहणार' हा आहे.

एका अर्थाने हे महाराष्ट्र भाजपमधील स्थित्यंतर आहे आणि नव्या पिढीच्या हातात सूत्रे देण्याचाच हा निर्णय आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत आणि प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनानंतरही नावे घेतली जात ती एकनाथ खडसे, सुधीर मुनगुंटीवार यांची. त्यापूर्वी सूर्यभान वहाडणे, अरुण अडसड, भाऊसाहेब फुंडकर अशीही नावे भाजपमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून घेतली जात. त्या मांदियाळीत आता चंद्रकांतदादा जाऊन बसले आहेत. भाजपची 1980 मध्ये स्थापना झाली, तेव्हा धुळ्याचे उत्तमराव तथा नानासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यांच्याकडून ती सूत्रे मुंडे यांच्याकडे आली, तो एका पिढीचा बदल होता आणि पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली, तेव्हाही ते एका पिढीचे स्थित्यंतरच होते. त्यानंतर आता पुन्हा चंद्रकांतदादांच्या रूपाने पाच वर्षांपूर्वीपर्यंत राज्याला अपरिचित असलेला नवा चेहरा भाजपने प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे केला आहे. 

आतापावेतो भाजपची सारी सूत्रे महाराष्ट्रात विदर्भ आणि विशेषत: मराठवाड्यातील नेत्यांच्या हातात असत. आता ती पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या हाती आली आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे घराण्याचा राजकीय वारसा नसलेले, हे नेतृत्व आहे. भाजपचे बाकीचे नेते शरद पवार यांच्याबाबत सबुरीचे धोरण घेत असताना, त्यांना थेट आव्हान देण्याच्या पाटील यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांनी जिवापाड मेहनत घेतली आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस व 'राष्ट्रवादी'चे बालेकिल्ले काबीज करण्यात मोलाचा वाटा उचलला.

अर्थात, मेहनत आणि समोरच्याला अंगावर घेतानाच कोणाशी सामोपचाराने, तसेच युक्‍तीने वागायचे हा धोरणीपणाही त्यांच्यात आहे. त्यामुळेच आयुष्यभर 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चे काम करणाऱ्या चंद्रकांतदादांना 2003 मध्ये संघपरिवाराने भाजपमध्ये धाडले आणि तेव्हापासून निव्वळ आपल्या पडद्याआडील कामगिरीच्या जोरावर ते या पदापर्यंत पोचले आहेत. पाच वर्षांपूर्वी फडणवीस मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि पुढे रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष झाले, तरी याच पाच वर्षांत पक्षाच्या अनेक मोहिमा तेच जातीने हाताळत होते. त्यासाठी त्यांनी काहीच करावयाचे बाकी ठेवले नव्हते.

विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यापासून ते मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून निघत असलेल्या मोर्चांमुळे झालेली सरकारची कोंडी असो; प्रत्येक वेळी संकटमोचक म्हणून फडणवीस यांना चंद्रकांतदादांचेच नाव आठवत असे आणि तेही सोपवलेली कामगिरी फत्ते करूनच परतत असत. त्यांनी या पाच वर्षांत बजावलेली सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे शिवसेनेने अत्यंत कडवी अशी भाजपविरोधी भूमिका घेतलेली असताना, तेच फक्‍त 'मातोश्री'वर जाऊन, तापलेले ताबूत थंडे करत असत! हीच कामगिरी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात प्रमोद महाजन पार पाडत असत. महाजन यांच्याप्रमाणेच चंद्रकांतदादाही संघाच्या तालमीत तयार झालेले 'स्वयंसेवक' आहेत. कामाचा धडाका आणि संघटनकौशल्य ही त्यांची जमेची बाजू. या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा नेता भाजपने प्रदेशाध्यक्षपदी आणला आहे. याचा वापर या भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्यासाठी केला जाणार हे उघड आहे. 

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी झालेली लोढा यांची निवडही वेगळ्या अर्थाने बदलत्या भाजपचे दर्शन घडवत आहे! पक्षाची स्थापना झाली त्या सुरवातीच्या काळात ही धुरा राम नाईक यांच्यासारख्या नेत्याने सांभाळली होती. नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि भाजपही त्यानुसार बदलत गेला. त्याच बदलाचे 'अर्थपूर्ण' प्रतीक लोढा यांच्या रूपाने समोर आले आहे. मुंबईत मराठी-अमराठी वाद शिवसेनेने रंगवला, त्या काळातही लोढा यांचे भाजपमध्ये बरेच प्रस्थ होते. मात्र आशीष शेलार यांच्याकडून मुंबई भाजपची सूत्रे लोढा हाती घेत आहेत, हे चित्र पिढीतील बदलाचे नसून, भाजपची नवी संस्कृती सूचित करणारे आहे. हे बदल लक्षात घेऊन आगामी निवडणुकीत विरोधकांना रणनीती ठरवावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com