'बीसीसीआय'चा 'नो बॉल' (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

चँपियन्स करंडकासारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेच्या तोंडावर "टीम इंडिया'च्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेले राजकारण भारतीय क्रिकेटला ग्रासू पाहत आहे, ही निश्‍चितच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

चँपियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झालेला असताना "टीम इंडिया'चे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मुदतवाढीवरून भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नवा खेळ सुरू केल्याचे दिसते. सुंभ जळला तरी पीळ काही सुटत नाही हेच खरे. वास्तविक प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांनी लक्षणीय कामगिरी बजावलेली असतानाही "बीसीसीआय'ने नव्या प्रशिक्षकपदासाठी रीतसर जाहिरात दिली. अर्थात या जाहिरातीला स्वतः कुंबळे प्रतिसाद देऊ शकतात, इतकेच नव्हे तर रीतसर मुलाखत देऊन पुन्हा प्रशिक्षकपदाची सूत्रे मिळवू शकतात, असे आडून आडून सुचविण्यात आले.

या पार्श्‍वभूमीवर "वर्षभरात इतके कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर कुंबळे यांना थेट मुदतवाढ देणेच योग्य होते. मुलाखतीची नौटंकी कशाला,' अशी संतप्त विचारणा विनोद राय यांच्या प्रशासन समितीने "बीसीसीआय'कडे केली आहे. प्रशिक्षकपदासाठी नवी जाहिरात देणे ही दिसते तेवढी सरळ घटना नसावी. कुंबळे हे खेळाडू असल्यापासून "परफेक्‍शनिस्ट' आहेत. कसोटीत एका डावात अख्खा संघ गारद करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे. वेस्ट इंडीजमध्ये जबड्याला बॅंडेज बांधून संघासाठी मैदानात उतरण्याचे धैर्य त्यांनीच दाखवले होते. आता प्रशिक्षक म्हणून भारतीय संघातील खेळाडूंच्या मानधनात दीडशे टक्के वाढ करण्याची त्यांची शिफारस "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्यांना झोंबली असेल काय? की कुंबळे यांच्या यशस्वी कामगिरीमुळे कुंठित झालेल्या काही झारीतील शुक्राचार्यांचे हे काम आहे? चँपियन्स करंडकासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेच्या तोंडावरच अशा प्रकारचे राजकारण भारतीय क्रिकेटला ग्रासू पाहत आहे, ही निश्‍चितच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. चँपियन करंडक स्पर्धेत खेळण्याचे टाळून "आयसीसी'ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न "बीसीसीआय'ने चालविला होता. पण "आम्हाला या स्पर्धेत खेळायला आवडेल,' असे वक्तव्य करून कुंबळे यांनी "बीसीसीआय'च्या विरोधी घेतलेली भूमिका वादाचे मूळ ठरली असावी. चँपियन करंडक स्पर्धेसाठी संघ रवाना होण्याच्या तोंडावर नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठीची जाहिरात देणे हे कुंबळे यांच्यावर आणि संघाच्या मनोबलावर परिणाम करू शकते, याचा विचार "बीसीसीआय'ने केल्याचे दिसत नाही. खरे तर असे निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतले असते, तर लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.

प्रशिक्षक हा केवळ संघाला विजय मिळवून देण्यासाठीच असतो असे नाही. विराट कोहलीने कसे खेळावे किंवा उमेश यादवने कशी गोलंदाजी करावी, यावर फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक अर्थातच सपोर्ट स्टाफचे लक्ष असते. मुख्य प्रशिक्षक संघ घडवत असतो, खेळाडूंची मानसिकता कणखर बनवत असतो. त्यांना विजयाचा उन्माद आणि अपयशामुळे मरगळ येऊ देत नसतो. कुंबळे यांनी प्रशिक्षक म्हणून हेच काम प्रामुख्याने केले. कोहलीचा आक्रमक स्वभाव त्यांनी बदलला नाही, की अजिंक्‍य रहाणेला शांत वृत्ती सोडायला सांगितले नाही, म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत कोहली नसतानाही रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने मोहीम फत्ते केली. याच मालिकेत पुण्यात पराभव झाल्यानंतर राजमाचीचा ट्रेक करून खेळाडूंना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याची अनोखी कल्पना कुंबळे यांनीच राबवली. असा कल्पक प्रशिक्षक पुढच्या पिढीचेही खेळाडू घडवतो आणि त्यातूनच अजिंक्‍य संघ तयार होतो. कुंबळे यांनी केवळ एका वर्षात हे सर्व कार्य केले. गत मोसमात मायदेशात मिळवलेले भव्यदिव्य यश म्हणजेच 10 पैकी 10 गुण मिळवूनही विद्यार्थ्याला पुढच्या प्रवेशासाठी अडथळा निर्माण केला जात असेल, तर पडद्यामागे नक्कीच काही तरी वेगळ्या हालचाली सुरू असतील, असे वाटते.

"लोढा समितीच्या शिफारशींनुसार आम्ही पारदर्शक कारभार करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी हा घाट घातला आहे. कोणीही आपले स्थान गृहीत धरू नये असे आम्हाला दर्शवायचे आहे,' असे स्पष्टीकरण कदाचित "बीसीसीआय'कडून दिले जाईलही. पण विद्यमान प्रशासकांचा "बोलविता धनी' कोणी वेगळा आहे काय असा प्रश्‍न त्यामुळे मनात येतो. समालोचनात सर्वच काही उघडपणे बोलता येत नाही, अशा वेळी मनातील सल दुसऱ्या मार्गाने बाहेर येऊ शकतो. प्रशिक्षक शोधमोहिमेत कोणकोण इच्छुक आहेत याचे चित्र बुधवारपर्यंत स्पष्ट होईल. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती मुलाखती घेणार आहे. त्यांनीच माजी संघ संचालक रवी शास्त्री यांच्याऐवजी कुंबळे यांना पसंती दिली होती. हे तिन्ही दिग्गज मैदानावर आपले कौशल्य दाखवत असताना कुंबळे सर्वच बाबतीत संघाचा "ब्रेन' होते. त्यामुळे कुंबळे यांनाच पसंती मिळू शकेल; पण चँपियन्स करंडक स्पर्धेच्या तोंडावर हा सारा "खेळ' नोबॉलएवढाच व्यर्थ होता, यात शंका नाही.

Web Title: sakal editorial cricket bcci no ball