ढिंग टांग : डॉ. चरके यांची शपथ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग
ढिंग टांग : डॉ. चरके यांची शपथ!

ढिंग टांग : डॉ. चरके यांची शपथ!

मेजाच्या पलिकडे एक स्टेथास्कोप लटकताना दिसत होता. त्याची दोन्ही टोके दोन कानात होती. ते कान डॉ. चरके यांचे होते. डॉ. चरके हे नावाजलेले डॉ. आहेत. पेशंट बरा करण्यापेक्षा त्यांना फोटोग्राफी, किशोरकुमारची गाणी म्हणणे यातच अधिक रस आहे. (म्हणूनच ते नावाजलेले आहेत, असे टोमणे काही जण मारतात.) त्यांच्या समोरच्या स्टीलच्या अत्यंत निरुंद अशा स्टुलावर आम्ही बसलो होतो. या स्टुलावर बसून थर्मामीटर बगलेत घेऊन दोन मिनिटे बसणे हा एक हठयोगाचाच प्रकार आहे, असे आमचे मत आहे. हे स्टुल कुठे विकत मिळते ते दुकान हुडकून दुकानाच्या मालकाला त्या तसल्या स्टुलावर तीन तास बसवण्याचा हिंस्र विचार आमच्या मनात डोकावत होता. (Sakal Editorial Article)

सांप्रतकाळी नव्यानवेल्या डागतरांनी नवाकोरा पांढरा कोट चढवण्यापूर्वी हिपोक्रिटसची अगम्य शपथ घ्यावी की महर्षी चरक यांच्या नावे तितकीच अगम्य शपथ उच्चारावी, असा वाद चालू आहे. आमचे मत विचाराल तर, खुर्चीत रेलून बसलेल्या डॉ. पुढील पेशंटाने अत्यंत गैरसोयीच्या स्टुलावर बसले पाहिजे, हे त्या कुण्या ग्रीक (की लॅटिन?) हिपॉक्रिटसने ठरवले असेल तर आम्ही महर्षी चरकवादी आहो. आणि स्वयं चरक ऋषींनी हे भिकार तिकाटणे शोधले असेल तर आम्ही नि:संशय हिपॉक्रिटसच्या मागे उभे राहू.

‘‘जल्दी बोलो, क्या दवाई है? बाहेर पेशंट बैठे है,’’ डॉ. चरकेंनी मोठ्यांदा सांगितले. हा चरक्या आपल्याला मेडिकल रिप्रेझेंटेटिव (एमार) समजला या विचाराने आम्ही थोडे ओशाळलो. आमची रया थोडी तशीच आहे, हे मान्य करावे लागेल.

‘‘तुम्ही चरक शपथ घेण्याच्या बाजूने आहात की हिपोक्रिटिक ओथ? ते सांगा!’’ आम्ही पत्रकारितेच्या धर्माला जागून अर्धवट बसल्या अवस्थेत स्पष्ट सवाल केला. नाईलाज होता...

‘‘तुम्ही बोअरिंग मशीन आहात का? केवढा निरर्थक आवाज करताय?,’’ डॉ. चरके पुन्हा मोठ्यांदा ओरडले. आम्ही उठून शांतपणे त्यांच्या कानातील स्टेथास्कोपाची बोंडके काढून ठेवली. स्टेथास्कोपचे तिसरे टोंक त्यांच्याच छातीवर रुळत असल्याने त्यांना बोअरिंग मशीनसारखी स्वत:चीच धडधड ऐकू आली असणार, हे आम्ही अचूक वळखले होते.

‘‘चरक शपथ घेणार का? बोला,’’ आम्ही विक्रमादित्याप्रमाणे हट्ट सोडला नाही. आमचा प्रश्न ऐकून डॉ. चरके चांगलेच चरकले.

‘‘वेल, महर्षी चरक आयुर्वेदवाले होते, आमची आलोपाथी!,’’ त्यांनी शहाजोग खुलासा केला.

‘‘का? वैद्यकीय शिक्षणाच्या चरकातून तुम्ही भारतातच गेलात ना?,’’ आमचा दुसरा करडा सवाल डॉ. चरक्याला चटका देऊन गेला. मागल्या खेपेला या लेकाने खोटे फिटनेस सर्टफिकिट देताना वाजवून वट्ट अडीचशे रुपये उकळले होते...

‘‘चरकाशी तेवढा संबंध आला खरा...,’’ डॉ. चरक्यांनी कबूल केले. सॅम्पलची पाकिटे टेबलावर ठेवताना एमार लोकांचा जसा चेहरा होतो, तसा आमचा झाला...

‘‘असेल! पण भारतीय अस्मिता नावाची गोष्ट आहे की नाही?,’’ सॅम्पल दिल्यानंतर एमारचा जसा एकाएकी आवाज वाढतो, तशा आवाजात आम्ही थेट गाभ्यालाच हात घातला.

हिपॉक्रिटस असो किंवा महर्षी चरक... शेवटी पेशंट महत्त्वाचा!’’ डॉ. चरक्यांनी एकदम पोलिटिकल भूमिका घेऊन आमचा कात्रज केला. आमचे बोलणेच खुंटले.

‘‘एक पाच दिवसाचं सिक सर्टफिकेट आणि फिटनेस सर्टफिकेट द्या ना...’’ आम्ही मूळ मुद्याला हात घातला, आणि डॉ. चरक्यांनी समाधानाने आपले लेटरहेड पुढ्यात ओढले.

Web Title: Sakal Editorial Dhing Tang Article Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalEditorial Article
go to top