गळाभेट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 19 जून 2017

स्थळ : किल्ले मातोश्री, वांद्रे संस्थान.
वेळ : ...आगमनाची.
प्रसंग : अधीर!
पात्रे : मराठी दौलतीचे कारभारी, मराठी अस्मितेचे प्रभारी आणि नुसतेच लय भारी उधोजीसाहेब आणि सर्वांचे लाडके प्रिन्स विक्रमादित्य.

स्थळ : किल्ले मातोश्री, वांद्रे संस्थान.
वेळ : ...आगमनाची.
प्रसंग : अधीर!
पात्रे : मराठी दौलतीचे कारभारी, मराठी अस्मितेचे प्रभारी आणि नुसतेच लय भारी उधोजीसाहेब आणि सर्वांचे लाडके प्रिन्स विक्रमादित्य.

उधोजीसाहेब खिडकीतून दुर्बिणीने काहीतरी पाहात आहेत. तेवढ्यात प्रिन्ससाहेबांची एण्ट्री होते. अब आगे...
विक्रमादित्य : (कुतूहलाने) बॅब्स!..हे बॅब्स!! शुक शुक!! बाबा...पप्पा...डॅडी, अण्णा...अरेच्चा, ओ फाऽऽदऽर!!
उधोजीसाहेब : (दचकून पाठीमागे पाहात) क...क...कोण आहे? कोणाय?
विक्रमादित्य : (सबुरीनं घेत) जस्ट चिल फादर...जस्ट टेक इट इझी!!
उधोजीसाहेब : (चवताळून) शेवटचं सांगून ठेवतोय, चारचौघात फादर म्हणशील तर...तर...(काही न सुचून) चापटी देईन एक!
विक्रमादित्य : (खुशीत) आज फादर्स डे आहे बॅब्स!! हॅप्पी फादर्स डे!! कोणाची वाट पाहात आहात?
उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) कोणाची नाही! तू जा बरं!!
विक्रमादित्य : (दुर्बिण हातात घेत खिडकीतून पाहात) दूरवर मिलिंदकाका उभा दिसतोय!!
उधोजीसाहेब : (शांतपणे) तो दाराशीच उभा असतो, आहे आणि राहील! तू दुर्बीण उलटी धरली आहेस!!
विक्रमादित्य : (दुर्बिण सुलटी करत) ओह...एक गाडी आली बॅब्स!
उधोजीसाहेब : (हादरून) खरं की काय? बघू बघू?
विक्रमादित्य : (रनिंग कॉमेंटरी करत) गाडी थांबली, आय मीन मिलिंदाकाकानेच अडवली!! गाडीत पुढल्या सीटवर कोणीतरी बसलंय! बहुतेक ते आपलाच ऍड्रेस शोधताहेत!! ओह माय गॉड, त्यांच्यासोबत देवेंद्रकाका पण आहेत!! मिलिंदाकाका आपल्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगतोय!!
उधोजीसाहेब : (उतावीळपणाने) दुर्बिण ठेव आणि आधी खिडकीतून दूर हो!! काय माणसं म्हणायची का काय ही? सकाळी अकरापर्यंत येतो, असं सांगून सव्वादहालाच हजर? छे!! साधी वेळ पाळता येत नाही ह्या लोकांना!! माणसाने कसं अकराची वेळ देऊन बाराएक पर्यंत पोचावं!! (सैपाकघराकडे तोंड करून) वडे सोडा कढईत वडे!! पाहुणे आले!!
विक्रमादित्य : (कुतूहलानं) कोण आहेत हे लोक?
उधोजीसाहेब : (घाईघाईने) तू आधी आत जा!! मी बोलावेन तेव्हा बाहेर ये!! आणि हो...फुल प्यांट घालून ये!!
विक्रमादित्य : (किंचित नाराजीने) फुल पॅंट? का? क्‍यों? व्हाय?
उधोजीसाहेब : (समजूत घालत) ते आपले शहाअंकल आहेत ना? कमळ पार्टीवाले? ते येतायत आपल्या घरी!!
विक्रमादित्य : (तात्विक मुद्दा उपस्थित करत) मग फुल पॅंट कशाला? त्यांना आपण अफझूल खान म्हटलं होतं तेच ना? आदिलशहा पण आणखी काय बरं...बरंच काय काय बोललो होतो! मला आठवतंय सगळं!!
उधोजीसाहेब : (सपशेल दुर्लक्ष करत) गृहस्थ पहिल्यांदाच येतोय आपल्या घरी!! त्यांच्यासाठी बटाटावडे करायला सांगितलेत!! तूही खा हो!! ते आले की मी तुला बोलावीन! तू आल्या आल्या त्यांना बोलण्यात गुंगव! काय? म्हंजे काय...की काही अप्रिय विषय येणार नाहीत चर्चेत!
विक्रमादित्य : (विचारात पडत) हो, पण काय बोलू?
उधोजीसाहेब : (उडवून लावल्यागत) काहीही बोल रे! बाहुबली पाहिला का? आज इंडिया-पाकिस्तान म्याचमध्ये काय होईल? यूपीत जागोजाग ओपन जिम लावल्या तर किती मजा येईल? मोदी अंकलप्रमाणे तुम्ही फॉरेनला का नाही जात? तुम्ही ट्‌विटरवर आहात का? वगैरे वगैरे.
विक्रमादित्य : (आयडिया सुचून) तुम्हाला ढोकळा जास्त आवडतो की फाफडा? असं विचारू?
उधोजीसाहेब : (वैतागून) काहीही विचार रे!
(तेवढ्यात दरवाजात अमित शहा अंकल हजर होतात. "केम छो? मजामां ने?' आदी शिष्टाचाराची देवाणघेवाण होते. सगळे स्थानापन्न होतात. काही काळ भीषण शांतता! तेवढ्यात-)
विक्रमादित्य : (खाकरून) आम्ही तुम्हाला आदिल शहा, अफझुल खान म्हटलं, त्याचा राग नाही ना आला, अंकल?

Web Title: sakal editorial dhing tang british nandi dress code marathi news sakal news