अग्रलेख : दोन दिवसीय दु:स्वप्न!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

भारतीयांना क्रिकेटमधला पराभव स्वीकारता येत नाही, असे म्हटले जाते. त्यात थोडेफार तथ्य आहेही. पण असे का होते? कारण एकच : हा बहारदार खेळ कोट्यवधी भारतीय चाहत्यांनी स्वभावत: स्वीकारला आहे. 

क्रिकेट हा बेभरवशाचा, बहारदार आणि तितकाच बेदर्दी खेळ आहे. जिंकण्या-हारण्याची सारी गणिते इथे कधी अचूक ठरतात, अनेकदा सपशेल चुकतात. या अनिश्‍चिततेतच क्रिकेटचे सौंदर्य सामावलेले असते व तीच त्यातील बहारदेखील आहे. परंतु, पराभूत संघासाठी मात्र हा खेळ भलताच बेदर्दी ठरतो. सारे काही मनासारखे घडूनही अखेर पराभव पदरी का पडला? याचे उत्तर मिळता मिळत नाही. हाच अनुभव सध्या भारतीय क्रिकेटवेडे घेत आहेत.

कर्णधार विराट कोहलीच्या अजिंक्‍य चमूने क्रिकेटचा विश्‍वकरंडक सहजी उचलून भारतात आणावा आणि आपण सारे जल्लोषात बुडून जावे, अशी स्वप्ने बघत बघत दिवस कंठणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटदिवाण्या भारतीयांचे मन तूर्त हुळहुळे झाले असेल. मँचेस्टरमध्ये दोन दिवस चाललेल्या विश्‍वकरंडकाच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचे अनपेक्षित 'पानिपत' झाले आणि सारा देश जणू दु:खात बुडाला. ज्याने जल्लोषाची स्वप्ने पाहिली, त्याला दिवसाढवळ्या दु:स्वप्ने पडली.

संपूर्ण विश्‍वकरंडक स्पर्धेत जोशात खेळलेला हा यशस्वी संघ ऐनवेळी गलितगात्र का झाला? न्यूझीलंडसारख्या संघासमोर जगज्जेत्या संघाने अशी नांगी का टाकली? कुठली गणिते चुकली? असे अनेक प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहेत. पुढल्या विश्‍वकरंडकापर्यंत त्याचे यथास्थित चर्वितचर्वण होईल. घडले ते विपरीत घडले हे तर खरेच, पण त्यात नेमका वाटा कुणाचा? हा खरा प्रश्‍न आहे. वास्तविक हा सामना मंगळवारीच व्हायला हवा होता. परंतु, न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या मदतीला पावसाचे ढग धावून आले. अर्धवट राहिलेला सामना दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी खेळवला गेला, त्यात भारतीय फलंदाजीच्या चिंधड्या उडाल्या.

भारताच्या या पराभवात सर्वाधिक वाटा कुणाचा असेल तर तो अवसानघातकी इंग्रज पावसाचा, असेच म्हणावे लागेल. याच पावसाने साखळी सामन्यात न्यूझीलंडच्या मदतीला धावून जात भारताला सामन्यापासून वंचित ठेवले होते. पावसालाच दोष देणे इष्ट, कारण एरवी संपूर्ण स्पर्धेत लाजबाब फलंदाजी करणारा रोहित शर्मा, भरोसेमंद लोकेश राहुल आणि जगातला सर्वात दमदार फलंदाज म्हणून नावाजला जाणारा कर्णधार विराट कोहली, हे अवघ्या पाच धावांमध्ये तंबूत परतावेत, हे अतर्क्‍य घडलेच नसते. भारताला नव्याने गवसलेला प्रभावी गोलंदाजीचा तोफखाना एका बाजूने धडाडत असतानाही पराभव वाट्याला यावा, हेही घडले नसते. सारे काही ठीकठाक असताना पावसाळी ढगांच्या आड दडून साऱ्या शुभग्रहांनी जणू न्यूझीलंडच्या कुंडलीतील घरांमध्ये गुपचूप गर्दी केली आणि भारताविरुद्धचा कट पार पाडला! 

दुसऱ्या दिवशीच्या उरलेल्या लढतीत, न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या हाती आलेला नवा चेंडू ओल्ड ट्रॅफर्डच्या त्या भुताळी खेळपट्टीवर असे काही रंग दाखवू लागला की बघता बघता होत्याचे नव्हते झाले. मॅंचेस्टरच्या त्या पावसाळी हवेत स्विंग होणाऱ्या किवींच्या चेंडूच्या टप्प्याचा थांग लागणे अशक्‍य झाले. बघता बघता सारे काही संपुष्टात येऊन भारतीय सुखस्वप्नाचे रूपांतर दु:स्वप्नात झाले. बिनीच्या फलंदाजांनी शस्त्रे टाकली की आपली बाकीची मंडळी हाय खातात, हे पुन्हा एकवार दिसून आले. नव्याने संघात समावेश झालेला रिषभ पंत आणि धडाकेबाज फटकेबाजीला चटावलेला हार्दिक पंड्या यांनी काही काळ भारतीय आव्हानात धुगधुगी आणली खरी, पण दोघेही ऐन मोक्‍याच्या क्षणी अतिशय खराब फटके मारून बाद झाले.

इंग्लंडमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्या रवींद्र जडेजाने मात्र विक्रमादित्यासारखा हट्ट न सोडता भारतीय आव्हानात पुन्हा जान आणली. त्याला धीरोदात्त साथ होती महेंद्रसिंह धोनीची. या महान खेळाडूच्या निवृत्तीची बेमुर्वत चर्चा करणाऱ्यांना धोनीचे 'असणे' किती महत्त्वाचे असते आणि आहे, याचा साक्षात्कार झाला असेल. रिषभ पंतचा फटका अधिक बेजबाबदार होता, की धोनीला पाचव्या क्रमांकावर न धाडण्याचा निर्णय अंगलट आला? शिखर धवन जायबंदी झाला, तिथेच भारताचे ग्रह फिरले की तिसऱ्या पंचांनीही पक्षपाती निर्णय दिले, तिथे माशी शिंकली? याची चर्चा आजही समाजमाध्यमांवर होतेच आहे, पुढेही होत राहील.

क्रिकेटबद्दल बोलणे हासुद्धा त्या खेळाचाच भाग असतो. एरवी क्रिकेटसिताऱ्यांना डोक्‍यावर घेणारे भारतीय रसिक पराभवानंतर मात्र दयामाया दाखवत नाहीत, हे अगदी खरे आहे. त्याचेच प्रतिबिंब सध्या माध्यमांमध्ये दिसते आहे. भारतीयांना क्रिकेटमधला पराभव स्वीकारता येत नाही, असे म्हटले जाते. त्यात थोडेफार तथ्य आहेही. पण असे का होते? कारण एकच : हा बहारदार खेळ कोट्यवधी भारतीय चाहत्यांनी स्वभावत: स्वीकारला आहे.

भारतीय संघ जिंकतो, तेव्हा देश जिंकतो आणि हार होते, तेव्हा संपूर्ण देशाचा स्वप्नभंग होतो. रिकाम्या इमारतीचे इमले कोसळले, तर त्याला सुदैव मानायचे. पण राहत्या इमारतीचा अपघात ही शोकांतिका ठरते. भारतीय क्रिकेट ही अशीच वास्तू आहे. जिथे मानवी मने नांदतात. हार-जीतीप्रमाणेच तिथे सुखदु:खेही असायचीच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Editorial on India lost semi final of World Cup 2019 against New Zealand