अंतराचा शोध

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 8 जून 2017

चांगलं आणि वाईट अशा परस्परविरोधी समजुती आपण आयुष्यभर जपत राहतो; आणि जगण्याचा सगळा तोलच बिघडवून टाकतो. कुठल्याही बाबीवर यांपैकी एक शिक्का मारून आपण अंतिम निर्णय करतो. वास्तविक शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट असं काही नसतंच. अशा निर्णयाची रेषा धूसर असते. जे नजरेला ठळक दिसतं किंवा जाणवतं, तसं आपलं मत बनतं. चांगल्याची चिकित्सा करताना नकळत आपण त्यातलं वाईट काय ते शोधायचा प्रयत्न करतो; आणि वाईटाचं मूल्यमापन करताना त्यातलं चांगलं वेगळं करतो. या संदर्भातला आधीचा निर्णय वरवरचा होता; आता त्यात बदल करायला हवा, असं नंतर वाटू लागतं.

चांगलं आणि वाईट अशा परस्परविरोधी समजुती आपण आयुष्यभर जपत राहतो; आणि जगण्याचा सगळा तोलच बिघडवून टाकतो. कुठल्याही बाबीवर यांपैकी एक शिक्का मारून आपण अंतिम निर्णय करतो. वास्तविक शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट असं काही नसतंच. अशा निर्णयाची रेषा धूसर असते. जे नजरेला ठळक दिसतं किंवा जाणवतं, तसं आपलं मत बनतं. चांगल्याची चिकित्सा करताना नकळत आपण त्यातलं वाईट काय ते शोधायचा प्रयत्न करतो; आणि वाईटाचं मूल्यमापन करताना त्यातलं चांगलं वेगळं करतो. या संदर्भातला आधीचा निर्णय वरवरचा होता; आता त्यात बदल करायला हवा, असं नंतर वाटू लागतं. चांगलं आणि वाईट यांत फारसा भेद नसतो; पण जो थोडा भेद असतो, तो त्या त्या गोष्टींची प्रतवारी करतो. यशाचं कौतुक होत असताना, अयशस्वी ठरलेले दूर कुठं तरी अंधारगुहेत फेकले गेलेले असतात. दोघांनीही यशासाठीच प्रयत्न केलेले असतात. काहींच्या प्रयत्नांची दिशा भरकटते; आणि यश त्यांना चकवा देतं. आधीच्या प्रयत्नांनी थकलेली माणसं यशाच्या खूप जवळ येऊन थांबतात. त्यांच्याच प्रयत्नांनी यश आणि अपयश यांतलं कमी झालेलं अंतर त्यांना जाणवत नाही. अखेर ते नशिबाला दोष देतात.

यशापासून तुम्ही किती अंतरावर आहात, हे अपयश शिकवतं. ते तुमच्या प्रयत्नांची गती आणि दिशा निश्‍चित करतं. सकारात्मक कृतीला प्रवृत्त करणारा अपयशासारखा दुसरा हितचिंतक नाही. अपयशाचे शब्द कठोर आणि कटू असतात. त्यांत निष्पक्ष वृत्ती असते. अपयश कधीच कुणाला फसवत नाही. खोटी आश्वासनं देत नाही. ते नेहमी यशाचा हमखास मार्ग सांगतं. अपयश माणसांत निश्‍चयाचं बी पेरतं. अथक कृतीची मशागत करण्याचा सल्ला ते देतं. यशस्वी माणसंही अनेकदा अपयशी ठरलेली असतात; मात्र प्रत्येक अपयशानंतर ते यशासाठी लागणारी हिंमत वाढवीत नेतात; आणि जिंकतात. अपयशी माणसाला कुठल्याही कामात कृतीऐवजी सबबी दिसतात; आणि संधीतही त्यांना अडचण जाणवते. यशस्वी माणूस अडचणींकडं, आव्हानांकडं मोठी संधी म्हणून पाहतो. अयशस्वी माणूस मैदानात उतरण्याआधीच हरलेला असतो; आणि यशस्वी माणूस मैदानावर येण्याआधीच मनात जिंकलेला असतो. यशासाठी किंमत मोजावी लागते; तशीच अपयशाचीही किंमत असते. यशाची किंमत चुकविण्यासाठी चलनी नाणी उपलब्ध असतात. अपयशासाठी मात्र वेगळी आणि दुर्मिळ नाणी वापरावी लागतात; आणि तुलनेनं ती महाग असतात. यश मिळविण्यासाठी वेळ हे सर्वांत हुकमी नाणं उपलब्ध आहे. ते तुम्ही कसं वापरता, त्यावर यशापयश ठरतं. यशापयशाचा तराजू समतोल असतो. तुमच्या कृती तराजूचं झुकणं निश्‍चित करीत असतात. कुणीही निव्वळ योगायोगानं, नशिबानं किंवा अपघातानं यशस्वी होत नाही. यशाची तहान लागल्यावर ती भागविण्यासाठी मार्गाचा शोध घेणाराच यशस्वी ठरतो. यशापयशातलं अंतर शोधा; यशाचा झगमगाट किती नजीक आहे, हे तुम्हाला सहज कळेल.

Web Title: sakal editorial malhar arankalle inspirational article