सेल्फी मैनें ले ली आज...

सेल्फी मैनें ले ली आज...
सेल्फी मैनें ले ली आज...

अवतीभोवतीचं वातावरण कसं सफळ संपूर्ण संस्कारी आहे. बाहेरचं सोडा, देशातल्या काही बहाद्दरांना गर्भातल्या मुलांचीही मोठी काळजी पडलीय. एकदम शुद्ध व संस्कारी पिढीसाठी "गर्भवती मातेनं मांसाहार करू नये, सेक्‍स करू नये', असा उपदेश केला जातोय. पण, हा देशाच्या, समाजाच्या भविष्याचा वेध व विषय तरुण पिढीला मात्र कसा पचत नाही, हेच मोठ्यांना कळेना. बघा ना, त्या प्रियांका चोप्रानं किमान पंतप्रधानांना भेटताना तरी अंगभर कपडे घालावेत ना. ती बसली पाय उघडे टाकून नरेंद्र मोदींच्या समोर. सोशल मीडियावर किती संपापले लोक तिच्यावर... "काही संस्कार वगैरे आहेत की नाही' म्हणत. ती आमीर खानच्या दंगलमधील फतिमा सना शेख. "धाकड गर्ल' म्हणून इतकं कौतुक झालं तिचं; पण तिलाही संस्कार नाहीतच मुळी. पवित्र रमजान महिना सुरू आहे अन्‌ तिने टाकले "स्वीमसूट'मधले फोटो "इन्स्टाग्राम'वर. साहजिकच लोक चिडले, "ट्रोलिंग' झालं दोघींचं. प्रियांकानं किमान सव्वाशे कोटींच्या देशाच्या पंतप्रधानांचा तरी "लिहाज' बाळगायचा होता अन्‌ फतिमानं रमजान महिन्याचं पावित्र्य तरी लक्षात घ्यायचं होतं.

या दोघींपेक्षा इरसाल एक तिसरीही आहे. नाव ढिंचाक पूजा. आता कोणी म्हणेल हे काय नाव झालं! पण, स्वत:ला गायिका म्हणवणाऱ्या दिल्लीतल्या या मुलीचं नाव आहेच ते. गायिका कशी तर गेल्या तीन वर्षांत तिनं तीन गाणी गायिलीत, तीदेखील कुठल्या स्टुडिओत, सिनेमासाठी किंवा अल्बमसाठी नव्हे, तर घरी किंवा घराजवळ सहज म्हणून. "यूट्यूब चॅनल'वर ही तिन्ही गाणी सुपरहिट आहेत. गाणी तरी कसली, तर पॉप वगैरे म्हणता येतील अशी, उगीच आलं मनात म्हणून गुणगुणल्यासारखी. त्या यो यो हनी सिंगचं नव्हतं का, "चार बॉटल व्होडका, काम मेरा रोज का'; त्यासारखीच. पहिलं गाणं - "स्वॅग वाली टोपी'. दुसरं - "दारू, दारू, दारू' अन्‌ आता गेल्या महिन्यात आलेलं तिसरं - "सेल्फी मैनें ले ली आज'. नवं "इंटरनेट सेन्सेशन' म्हणून ढिंचाक पूजाची ओळख आता भारतातच नव्हे तर जगभर होतेय.
कारण, वर्षाला एकच असलं तरी ढिंचाक पूजाची गाणी चढत्या क्रमानं प्रचंड लोकप्रिय होताहेत. तिचे चाहते तर तिला लोकप्रिय बनवतायतच, पण तिच्यावर टीका करणारे सोशल मीडियावरचे "ट्रोल'ही प्रसिद्धीला मोठा हातभार लावताहेत. म्हणूनच "सेल्फी मैनें ले ली आज, सर पे मेरे रख के ताज', हे गाणं रविवारपर्यंत 1 कोटी 65 लाख लोकांनी पाहिलंय. "दारू, दारू' गाणं पाहिलंय 60 लाखांहून अधिक, तर पहिलं "स्वॅग वाली टोपी' 30 लाख लोकांनी. यातून पूजाला किती पैसे मिळाले असतील याचा हिशेब आता मुख्य प्रवाहातली माध्यमं करताहेत. दर महिन्याची तिची कमाई नक्‍कीच काही लाखांमध्ये आहे.

थोडक्‍यात, आपण मोठ्या माणसांनी कितीही संस्काराच्या नावानं गळे काढले तरी ही तरुण मुलं या अशाच गोष्टीत रमतात. असतात काही अपवाद जुनं ते सोनं मानणारे, नाकासमोर चालणारे, वडीलधाऱ्यांपुढं मान खाली घालून उभे राहणारे. पण, साधारणपणं या नव्या पिढीच्या आवडीनिवडी विचित्र वाटाव्यात अशा वेगळ्याच आहेत. म्हणूनच जस्टीन बीबर येतो, चारच गाणी गातो, उरलेल्यांना फक्‍त ओठ हलवतो अन्‌ कोट्यवधी रुपये कमावून जातो. पौगंडावस्थेतील मुलंमुली तेवढ्यासाठीच वेडी होतात. सोशल मीडिया मोठा केलाय तो या नव्या पिढीनंच. हेच त्यांचं आनंदाचं, झालंच तर ढिंचाक पूजासारख्या काहींच्या कमाईचंही साधन आहे.

कॅटी पेरीची "हंड्रेड मिलियन' मनसबदारी
पाश्‍चात्त्य काय अन्‌ पौर्वात्य काय, विषय पॉप गायन व सोशल मीडियाचाच आहे, तर शुक्रवारी एक ऐतिहासिक नोंद झालीय. कॅटी पेरी नावानं प्रचंड लोकप्रिय अमेरिकन पॉपस्टार कॅथरिन एलिझाबेथ हडसन ही ट्‌विटरवर दहा कोटी "फॉलोअर्स' असणारी जगातली पहिली सेलेब्रिटी बनलीय. अवढे फॉलोअर मिळविण्याच्या बाबतीत कॅनेडियन पॉपस्टार जस्टीन बीबर व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबांमांना मागं टाकून केटीनं हा बहुमान मिळवला. या टप्प्यावर पोचण्यासाठी बीबरला आणखी 32 लाख व ओबामांना 91 लाख फॉलोअर्सची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com