अग्रलेख : मनधरणीचा फार्स!

Congress_Logo
Congress_Logo

राजीव गांधी यांची 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर पुढची सहा-सात वर्षे गांधी घराणे पक्षाच्या कारभारापासून दूर होते. या काळात पाच वर्षे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते आणि नेमक्‍या त्याच काळात देशाच्या अर्थकारणाला वेगळे वळण देणारे क्रांतिकारी निर्णय त्यांनी अर्थ खात्याची धुरा सांभाळणारे डॉ. मनमोहनसिंग यांच्या सहकार्याने घेतले.

आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून देशात खासगीकरण, जागतिकीकरण, तसेच उदारीकरणाचे युग अवतरले. याचा अर्थ स्पष्ट आहे! गांधी घराण्याच्या हातात काँग्रेसची सूत्रे नसली, तरी काँग्रेस पक्ष काही बुडत नाही. हा इतिहास ठाऊक असल्यानेच बहुधा लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याला सव्वा महिना उलटून गेल्यावरही त्या पक्षातील निर्णायकी परिस्थिती कायम आहे! हे या सव्वाशे वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या पक्षातील नेतेमंडळी दरबारी राजकारणाला आणि भाटगिरीला कशी सोकावली आहेत, याचेच निदर्शक आहे.

तळागाळाच्या पातळीवर जाऊन काम करणे आणि पक्षाची वाढ होईल यासाठी अथक परिश्रम घेणे, हे या सुस्तावलेल्या काँग्रेसजनांना कठीण असल्यामुळेच गांधी घराण्याच्या उरल्या-सुरल्या करिष्म्याच्या जोरावर निवडून येणे सोपे, हाच रिवाज सोनिया गांधी यांनी 1998 मध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून पडून गेला. त्याला अर्थातच सोनिया-राहुल आणि आता प्रियांका हे या घराण्याचे तीन शिलेदारच कारणीभूत आहेत. त्यामुळेच आता देशभरातील मोजक्‍या काँग्रेस नेत्यांना राहुलविना पोरके झाल्यासारखे वाटू लागले आहे. गेला सव्वा महिना राहुल यांच्या मनधरणीचा जो काही फार्स देशभरात सुरू आहे, तो बघता 'काँग्रेसमुक्‍त भारता'चे भाजपचे स्वप्न काँग्रेसजनच पूर्ण करतील की काय, अशी शंका सहज घेता येते.

खरे तर राहुल यांनी राजीनामा देतानाच, तातडीने नवा प्रमुख वा किमान कार्यकारी अध्यक्ष निवडला जाईल आणि महाराष्ट्र व अन्य काही राज्यांत तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षात जान आणण्यासाठी काही कृतिकार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी व्यवस्था त्यांनी करायला हवी होती. ते झाले नाही आणि सोनिया, राहुल आणि त्यांचे बगलबच्चे यांनी नियुक्‍त केलेले कार्यकारिणीचे सदस्य राहुल यांचा राजीनामा मंजूरही करायला तयार नाहीत. त्याऐवजी सुरू आहे ती राहुल यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, यासाठी त्यांची मनधरणी! सोमवारी या मनधरणी नाट्याने आणखी एक वेगळे वळण घेतले.

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या मनधरणी नाट्याचा नवा प्रवेश सोमवारी एका ट्‌विटद्वारे केला; पण राहुल यांनी त्यावर तातडीने पडदा टाकत राजीनाम्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे पुन्हा जाहीर केले. हे असेच सुरू राहिले, तर तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेसजनांना विना-अध्यक्षच लढवाव्या लागतील, असे दिसते आणि त्यामुळे दुसऱ्या पराभवामुळे गलितगात्र झालेला कॉंग्रेस पक्ष मरणपंथाला लागेल, हे देशातील लोकशाहीच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

समर्थ विरोधकांअभावी एकाच पक्षाचे वर्चस्व निर्माण होणे हे लोकशाहीला घातक आहे. तसे होऊ नये, यासाठी काँग्रेससारखा मध्यममार्गी आणि देशव्यापी प्रभाव असलेला पक्षच लोकशाही वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, त्याचे भान ना काँग्रेसजनांना आहे, ना सोनिया-राहुल यांना. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भले अवघ्या 52 जागा मिळाल्या असतील; पण देशभरातील बारा कोटी मतदारांनी आपले मत या पक्षाच्या पारड्यात टाकले आहे. त्यामुळेच सध्या काँग्रेसजन पक्षाबाबत दाखवत असलेली उदासीनता हा या बारा कोटी मतदारांचा अपमान आहे. 

काँग्रेसने आतापावेतो अनेक वादळांना तोंड देत आपली नौका त्यातून सुखरूप बाहेर काढली आहे. 1977 मध्ये जनता पक्षाने केलेल्या दारुण पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी केवळ दोन-अडीच वर्षांत पुनःश्‍च सत्ता मिळविली होती आणि सोनिया गांधी यांनीही 2004 मध्ये विविध पक्षांची मोट सुलभतेने बांधत अटलबिहारी वाजपेयी सरकारकडून सत्ता हस्तगत करत, पुढची दहा वर्षे सत्ता टिकवली. त्यामुळे आताही या पक्षाला पुनरुज्जीवित करणे कठीण असले, तरी अशक्‍य नाही, हे राहुल यांना ठाऊक आहेच. मात्र, त्यासाठी काही ठोस पावले उचलण्याऐवजी ते पराभवाची जबाबदारी स्वीकारत 'अन्य कोणी राजीनामे का दिले नाहीत,' असा सवाल करत आहेत. त्यांच्या या सवालानंतर काँग्रेस नेत्यांनी सामूहिक राजीनाम्यांचा फार्स सादर केला! आता या राजीनाम्यांचे कोण आणि काय करणार?

कारण राहुल कारभारी राहू इच्छित नाहीत आणि अन्य कोणाकडे पक्षाची धुरा सोपवण्यास नेतेमंडळी तयार नाहीत. त्यामुळे निर्माण झालेली अवस्था ही बेदिलीपेक्षा फारशी वेगळी नाही. ही निर्णायकी अवस्था लवकरात लवकर दूर होऊन काँग्रेसजन धडाडीने कामाला लागले, तरच या पक्षाला संजीवनी मिळण्याची आशा बाळगता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com