सेंद्रिय शेतीचे किमयागार : हुकुमचंद पाटीदार

सेंद्रिय शेतीतीतील हुकुमचंद यांचे योगदान पाहता इंडियन ॲग्रीकल्चर अँड रिसर्च कौन्सिलने (आयसीएआर) अभ्यासक्रमासाठी त्यांची मदत घेतली आहे.
हुकुमचंद पाटीदार
हुकुमचंद पाटीदारPicasa

दहावीचे शिक्षण अर्धवट सोडून सेंद्रिय शेतीत क्रांती घडवून आणणारे आणि स्वामी विवेकानंद सेंद्रिय कृषी संशोधन केंद्राचे संस्थापक हुकुमचंद पाटीदार आता देशभरात कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी मदत करणार आहेत. वास्तविक हुकुमचंद यांच्या सेंद्रिय शेतीच्या तंत्राने देशाचेच नाही, तर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सेंद्रिय शेतीतीतील हुकुमचंद यांचे योगदान पाहता इंडियन ॲग्रीकल्चर अँड रिसर्च कौन्सिलने (आयसीएआर) अभ्यासक्रमासाठी त्यांची मदत घेतली आहे.सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारे पाटीदार यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने २०१८ रोजी पद्मश्री पुरस्काराने गौरव केला आहे.

हुकुमचंद पाटीदार यांचा जीवनपट प्रेरणादायी आहे. शिक्षण सोडून शेतीकामात झोकून देणारे पाटीदार यांनी झाडावाड जिल्ह्यातील मानपुरा गावात २००४ पासून एक हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली. त्यावेळी सेंद्रिय शेतीसाठी कोणतेच पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गावातील लोक देखील सेंद्रिय शेतीवरून साशंक होते. ते त्यांची खिल्ली उडवायचे.

हुकुमचंद पाटीदार
परळी : झेडपी शिक्षकाचं धनंजय मुंडेंकडून कौतुक

‘पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेतीने उत्पन्न वाढणार आहे की नाही, पीक येणार की शेती अशीच उजाड राहील’, अशा शब्दांत त्यांची हेटाळणी केली जायची. परंतु ते डगमगले नाहीत. सुरवातीला त्यांना ६० टक्केच उत्पादन मिळाले. परंतु त्यांनी खचून न जाता दुसऱ्या वर्षी चाळीस एकर जमिनीवर सेंद्रिय शेतीचा पुन्हा प्रयोग केला. उत्पादन वाढीबरोबरच जादा मूल्य मिळाल्याने दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळाली. निसर्गाला वाचवायचे असेल तर सेंद्रिय शेतीचे अनुकरण करावे लागेल, असे पाटीदार म्हणतात. पाच दशकांपूर्वी किटकनाशकाचा वापर न करता शेती केली जायची. त्यावेळी देखील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. त्यांचे आयुष्य आरोग्यदायी असायचे. त्यामुळे आपणही किटकनाशकांचा वापर न करता पीक घेऊ शकतो, यावर पाटीदार यांचा ठाम विश्‍वास होता.

निसर्गात एक जीव दुसऱ्या जिवावर अवलंबून असतो. शेतात जर जीव राहिला नाही तर उत्पादन वाढणार नाही, असे ते म्हणत. त्यांनी सेंद्रिय शेतीतील अडचणींवर मार्ग काढला. आपल्याच शेतात त्यांनी खत, शेणखत, जीवामृत, पंचगव्यासह आणखी काही सेंद्रिय औषधी तयार केली. यासाठी त्यांनी कंपोस्ट युनिट तयार केले. या कामी महाराणा प्रताप कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सहकार्य केले. कालांतराने त्यांच्या पदरात परिश्रमाचे फळ पडू लागले. सेंद्रिय शेतीची व्याप्ती वाढत गेली.

हुकुमचंद पाटीदार
पुण्यातील पाच स्टार्टअपला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार

आजच्या घडीला जगातील सात देशांत त्यांच्या सेंद्रिय खाद्यांना मागणी असून, त्यांची शेती देखील बहरलेली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून साडेतीनशेपेक्षा अधिक हेक्टरवर सेंद्रिय शेती होत आहे. पाटीदार यांनी सेंद्रिय पद्धतीतून धने, मेथी, लसूण, गव्हाचे यशस्वीपणे पीक घेतले. गावातील अन्य शेतकऱ्यांनीही पाटीदार यांचा कित्ता गिरवला आणि सेंद्रिय शेती विकसित केली. पीक घेण्यासाठी रासायनिक पदार्थ आणि किटकनाशकांचा वापर करणार नाही, असे ठरविले आणि ही भूमिका त्यांनी कायम ठेवली. परिस्थिती कशीही असली तरी हार मानली नाही तर यश निश्‍चितच मिळते, यावर त्यांचा विश्‍वास होता. त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली.

आता कृषी विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी हुकुमचंद पाटीदार यांची मदत घेतली जाणार आहे. ‘आयसीएआर’ने इंफाळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौदा सदस्यीय समिती नेमली. ही समिती दोन महिन्यांत अभ्यासक्रम तयार करणार असून, तो अभ्यासक्रम ‘आयसीएआर’ला सुपूर्द केला जाणार आहे. या समितीत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सामावून घेतले आहे. यात हुकुमचंद पाटीदार यांच्याबरोबरच अन्य काही शेतकरी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com