
संपादकीय : किल्ले संगोपनाकडे लक्ष द्या
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची समृद्धी व श्रीमंती याविषयी काही वेगळे सांगायला नको. पण केवळ संवर्धन व देखभालीअभावी ते दुर्लक्षित असणे ही गोष्ट खेदाची आहे. यासंदर्भात राजस्थानातील चित्र पाहताना सारखे तुलनात्मक चित्र डोळ्यासमोर येत होते. तेथील स्वच्छता, देखभाल व संवर्धनामुळे ऐतिहासिक ठिकाणांकडे असलेला पर्यटकांचा ओढा तेथे वाढलेला दिसतो. प्रत्येक ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी शुल्क भरावे लागते; पण योग्य त्या देखभालीमुळे हा आपल्यावर भुर्दंड आहे, असे पर्यटकांना अजिबात वाटत नाही.
हे जर तिथे घडते तर कितीतरी पटींनी अधिक संपन्न वारसा असलेल्या महाराष्ट्राने पर्यटन विकास का करू नये, हा प्रश्न सतावतो. या पार्श्वभूमीवर सध्या नळदुर्गच्या किल्ल्याचे संवर्धन खूपच चांगल्या पद्धतीने सुरु आहे. तो ‘पॅटर्न’ राज्यभर वापरला तर पर्यटनात वाढ होऊन रोजगारसंधीही उपलब्ध होतील. तब्बल २५५ भुईकोट किल्ले या राज्यात असून त्याची महतीही मोठी आहे. राज्यभरातील केवळ रायगडावर सध्या संवर्धनाच्या दृष्टीने उत्खननाचे काम सुरु आहे. रायगड विकास प्राधिकरण व भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने ही मोहीम सुरु आहे. पण त्याच्या गतीबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे चिंतित आहेत. आपल्या पिढीला विकसित रायगड पाहण्याचे भाग्य लाभेल की नाही, असे त्यांना वाटत आहे. रायगडच्या उत्खननाची गती वाढविण्याची गरज त्यांनी प्रतिपादली आहे.
२०१४मध्ये तत्कालिन आघाडी सरकारने पर्यटनवृद्धी व ऐतिहासिक वास्तूंच्या संगोपनासाठी ‘महाराष्ट्र वैभव संगोपन दत्तक योजना’ हा उपक्रम दहा वर्षांच्या अटीवर प्रायोगिक तत्त्वावर सुरु केला. यासाठी खासगी, सामाजिक संस्था, उद्योजक, व्यावसायिक, बिल्डर व तत्सम संस्थांना आवाहन केले. केवळ नळदुर्ग येथील किल्ल्याच्या संगोपन व देखभालीचे काम ‘सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉन’ला मिळाले. अन्य किल्ल्यांसाठी प्रतिसाद शून्य होता. अपवाद वगळता महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांत अवैध व्यवसाय, अतिक्रमणे अन् गावगुंडांच्या साम्राज्याचे दुर्दैवी चित्र दिसते. नळदुर्ग किल्ल्याचे रुपडे पालटण्यासाठी ‘युनिटी मल्टिकॉन’ने व्यापक प्रयत्न केले.सात कोटींवर खर्च करून पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने वास्तूला धक्का न लावता किल्ल्यात बदल करण्यात आले.
किल्ल्यानजीकच्या बोरी नदीतून गाळ काढून लॅंडस्केपिंग, वाहनतळ, रस्ता, बागकाम या सुविधांची निर्मिती करताना किल्ल्याच्या भिंतीवरील प्रेमिकांचे संदेश पाण्याने धुवावे लागले. किल्ल्याला देखणे रूप आता दिले आहे. मुंबई-हैदराबाद महामार्गावर वसलेल्या नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे तब्बल १०४ एकर १६ गुंठे जागेवर मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या किल्ल्याची दयनीय स्थिती होती. अडीच किलोमीटरचा घेरा असलेला हा किल्ला चालुक्य काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. त्या काळात मातीच्या किल्ल्याची १३५१-८० मध्ये बहामनी राजाच्या काळात पुनर्बांधणी झाली. तीनही बाजूने पाण्याचे वेढलेल्या या किल्ल्याच्या चारही बाजूने डोंगर आहे. समुद्र सपाटीपासून २२ फूट उंचीवर हा किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा मिश्र किल्ला म्हणूनही याची नोंद आहे.
१४८१मध्ये विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकला. १५५८मध्ये या किल्ल्यास दगडी चिरांची मजबूत तटबंदी करण्यात आली. या किल्ल्याला ११४ बुरुजे असून त्यातील उपली बुरुज सर्वात मोठा आहे. नऊ, तुर्चा, संग्राम, फतेह, परंडा, पुणे बुरुज अशी अन्य बुरुजे आहेत. धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. खासगी, सामाजिक संस्था, शासकीय कंत्राटदार, बिल्डरांना आवाहन करुन राज्यातील इतर किल्ल्यांसाठी सरकारला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागणार आहेत. हजारो कोटींचे कंत्राट घेणाऱ्यांना तसेच काही संस्थांना पुढे आणावे लागेल, यातून या किल्ल्यांचे संगोपन, संवर्धन होईल. गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी जतन तर करता येईलच. त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होईल. मुंबई, पुण्याजवळील किल्ल्यांचे एक वेगळे महसुली उत्पन्नाचे मॉडेल तयार होईल.