संपादकीय : वारसा विचारसमृद्धीचा | Sampadakiy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लेटो
संपादकीय : वारसा विचारसमृद्धीचा

संपादकीय : वारसा विचारसमृद्धीचा

माणूस विचार करतो तो प्रामुख्याने दोन कारणांसाठी : एक म्हणजे जेव्हा समोर काहीतरी प्रश्न निर्माण होतो तेव्हा; किंवा जे अज्ञात आहे त्यासंबंधीच्या जिज्ञासेमुळे. प्रश्नांच्या अनुषंगाने जो विचार आपण करतो, त्याचे उद्दिष्ट प्रश्नाचे उत्तर शोधणे, अडचणीवर मात करणे हे असते. असा विचार बहुतेक वेळा प्रत्यक्ष जगण्याशी, व्यवहाराशी निगडित असतो. उत्तर सापडले, अडचणीवर उपाय शोधला की, तो विचार थांबतो किंवा मागे पडतो.

टाळेबंदीमुळे गृहिणींच्या बेसुमार वाढलेल्या कामांचा भार कमी कसा करता येईल, याचा विचार करून त्यावर उपाय शोधले गेले. कामे वाटून घेतली गेली, यंत्राची खरेदी झाली. अनेकांना, गृहिणींच्या न संपणाऱ्या कामांची जाणीव झाली. त्यांचे घरातील योगदान जाणवले. काही घरात नवा विचार आणि त्याला जोडून आलेली मूल्ये स्वीकारली गेली. पण परिस्थिती पहिल्यासारखी झाल्यावर याबाबतची विचारप्रक्रिया बहुतेक थंडावून गेली. जे नवे बदल अंगवळणी पडले, ते टिकले; जे टोचत राहिले ते कळत-नकळत टाकले गेले.

हेही वाचा: पुण्यात बाधितांपैकी फक्त ५.४८ टक्केच लोकं रुग्णालयात दाखल

जिज्ञासेपोटी केलेला विचार मात्र प्रत्येक वेळी व्यावहारिक समस्येशी जोडलेला नसतो. त्याच्या मुळाशी जे अजून ज्ञाताच्या प्रदेशात आलेले नाही, त्याच्याबद्दलचे अपार कुतूहल असते. कुतूहल ही गोष्ट खरे तर कधीच न संपणारी आहे. कारण एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दलचे कुतूहल भागते, तेव्हा आपल्या ज्ञानाची क्षितिजे रुंदावतात. त्याचबरोबर अज्ञाताच्या कक्षाही विस्तारल्या आहेत, हे लक्षात येते. वरकरणी हा विरोधाभास वाटतो, पण तो तसा नाही हे खोलात गेल्यावर लक्षात येते. क्षितिज म्हणजे जिथे धरती आणि आकाश एकमेकांत मिसळतात असे वाटते ती काल्पनिक रेषा नसते, तर आपल्या दृष्टीचा पल्ला कुठपर्यंत आहे, त्याची मर्यादा जाणवून देणारी रेषाही असते. आपण जेवढे उंचावर जाऊ, तेवढे क्षितिज अधिक विस्तीर्ण होते. ज्ञानाची किंवा विचारांची उंचीही जेवढी वाढते, तेवढीच जे अद्याप अज्ञात आहे, त्याच्या विस्ताराची लांबी-रुंदी-खोलीही नजरेत भरते. विचार करण्यामागच्या या दोन प्रेरणांत फरक असला, तरी व्यावहारिक प्रश्नांचा हात धरून चालणारा विचार आणि निखळ जिज्ञासेतून उमलणारा विचार प्रत्यक्षात एकमेकांत गुंतलेले असतात. कधी प्रश्नच कुतुहलाला जन्म देतात आणि कधी कुतुहलातून जन्माला आलेले विचार उत्तरांची दिशा दाखवतात. आर्किमिडिजची गोष्ट हेच दर्शवते. या इतिहासात माणसाची जैविक जडणघडण महत्त्वाची आहे.

या जडणघडणीतच माणसाची विचारक्षमता आणि सामाजिकता यांची बीजे आहेत. प्रत्येक साधारण व्यक्तीला विचार करायची क्षमता असतेच, पण मनुष्यजात म्हणून आपण आज जे काही साध्य केले, ते आपल्या सामाजिकतेच्या बळावर. साधारणपणे सत्तर हजार वर्षांपूर्वी भाषा निर्माण झाल्यानंतर विचारांच्या विकासाला वेग आला. विचार काळाच्या ओघात नष्ट होऊ न देता त्यांना जपून ठेवणे, एकमेकांबरोबर वाटणे भाषेमुळे शक्य झाले. यामुळे प्रत्येक पिढीला आपली जिज्ञासा भागवण्यासाठी शून्यातून सुरवात करण्याची गरज राहिली नाही. आपल्या पूर्वजांनी जो विचार आधीच केला, त्यांच्या आधारे पुढे जाणे शक्य झाले. विचारांचे आदान-प्रदान होत राहिल्याने विचारांच्या विकासास मदत झाली.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

या प्रवासाची सुरवात झाली ती तत्त्वज्ञानापासून. सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो. तत्त्वज्ञान ‘जिज्ञासेचे अपत्य’ आहे असे म्हणतात. या जिज्ञासेला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. निसर्ग, समाज, माणूस आणि त्यांच्यामध्ये असलेले संबंध हे सगळेच पूर्णपणे जाणून घेण्याची आकांक्षा बाळगणारी ही जिज्ञासा होती. त्या आकांक्षेचे प्रतिबिंब निरनिराळ्या संस्कृतींमध्ये आरंभीच्या काळात झालेल्या तत्त्वचिंतनात दिसून येते. यातूनच पुढे अनेक शास्त्रांची निर्मिती झाली, म्हणूनच तत्त्वज्ञानाला ‘सर्व शास्त्रांची जननी’ म्हटले जाते. काही हजार वर्षांत एक ज्ञानशाखा म्हणून ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचा झालेला विकास रोचक नि विचारसमृद्ध करणारा आहे. काही वेचक विचारांचा परिचय आपण करून घेऊ.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top