राजधानी दिल्ली : मोहक प्रचार, दाहक वास्तव

राजधानी दिल्ली : मोहक प्रचार, दाहक वास्तव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात अनेक अढचणी येत आहेत. दिल्लीश्वर निवडणुकांच्या रणधुमाळीत मग्न राहिल्याने आणि पूर्वतयारीचा अभाव असल्याने ही स्थिती ओढवली. महाराष्ट्राला पुरेशी औषधे व लस पुरविली गेली नाही, हेही आता उघड झाले आहे.

सक्षम, संवेदनशील आणि द्रष्ट्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाचा पराभव केल्याचे अभिमानाने सांगता येईलच; परंतु करोनाच्या विरोधातील लढाईत विजयप्राप्ती करुन जगाला भारताची अभिमानास्पद ओळख करुन दिल्याबद्दलही पंतप्रधानांचे नेतृत्व गौरवपात्र ठरते !'' फेब्रुवारी महिन्यातच सत्ताधारी पक्षातर्फे एका विशेष ठरावाद्वारे पाठ थोपटून घेण्याचा लोकप्रिय कार्यक्रम करण्यात आला होता. खुद्द पंतप्रधानांनी २८ जानेवारीला दावोस जागतिक आर्थिक मंचावरुन बोलताना, ''भारताने केवळ स्वतःच्या समस्येची सोडवणूक केली असे नसून जगालाही या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी साह्य केले'' असे सांगितले होते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या उद्रेकाची भाकिते होत असताना सत्तारूढ मंडळी कोरोनावर मात केल्याबद्दल एकमेकांना टाळ्या देत होती. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे रचण्यात ते मश्गूल होते. मार्चमध्येच करोनाने आपले सुधारित अक्राळविक्राळ स्वरुप सादर करुन सर्वांचे धाबे दणाणून सोडले. परंतु पाच राज्यांच्या निवडणुका आणि तेथे आपले सरकार कसे स्थापन करता येईल, या महत्त्वाकांक्षेने आसुसलेल्या दिल्लीश्वरांना करोनापेक्षा ममता बॅनर्जी यांचे सरकार अधिक धोकादायक वाटत होते. परिणामी कोणत्या पूर्वतयारीशिवाय भारतीय नागरिकाला कोरोनाचा हा दुसरा हल्ला झेलावा लागत आहे.

राजधानी दिल्ली : मोहक प्रचार, दाहक वास्तव
कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

पूर्वतयारीचा अभाव

मार्च २०२० आणि एप्रिल २०२१ मधील परिस्थितीत फारसा बदल आढळत नाही. त्याचे कारण पूर्वतयारीचा अभाव हे त्यातील समान सूत्र आहे. गुरुवारी एका दिवसात करोनाबाधितांची संख्या विक्रमी दोन लाखांवर गेली. या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारच्या भूमिकेचा आढावा घ्यावा लागेल. कारण लसीकरण असो किंवा करोना उपचारांशी निगडित औषधे असोत सर्वांवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच राज्यांना या गोष्टींसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागत आहे. केंद्रीकरणातून जेव्हा पक्षपात होऊ लागतो, तेव्हाच त्यामागील हेतूंबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागतात. त्यातून ज्या राज्यात भाजपेतर सरकारे असतील त्यांना सावत्र वागणुकीचे प्रकारही घडू लागतात, तेव्हा या हेतुवर शिक्कामोर्तब होते.

करोनाचा अधिक शक्तिशाली विषाणू (डबल म्युटंट) महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबात सापडल्याच्या बातम्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. याआधी महाराष्ट्रात कोरोनाचा कसा हाहाकार झाला आहे, त्याची रसभरित वर्णने सर्व पाळीव माध्यमांमधून प्रसारित केली गेली आणि केली जात आहेत. याला योगायोग म्हणावे की योजनाबद्ध डाव? याच काळात हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांचे पाठीराखे केंद्र सरकार सढळ हाताने आर्थिक तरतूदही करतात. कोरोना आटोक्यात आलेला नसताना आणि तज्ज्ञांनी दुसऱ्या कोरोना आक्रमणाबाबत इशारे दिलेले असताना कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात का आले, हा साधा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारावासा वाटतो. गेल्यावर्षी तबलिघी जमातवर कोरोना प्रसाराचे खापर फोडण्याचे कुभांड रचण्यात आले होते. आता कुंभमेळ्यात दोन-तीन आखाड्यांचे प्रमुख कोरोनाचे बळी ठरले. काही साधू मृत्यमुखी पडल्यानंतर शहाजोगपणे कुंभमेळा प्रतीकात्मक रीतीने साजरा करण्याचे आवाहन हे ढोंग व भोंदूपणा आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी धार्मिक राजकारणाचे पाप जे करतात, त्यांच्यासाठी हा एक धडा आहे.

राजधानी दिल्ली : मोहक प्रचार, दाहक वास्तव
एका दिवसांत चार सेलिब्रेटींना झाला कोरोना

कोरोनाची दुसरी लाट आणि करोना विषाणूचा नवा आणखी सशक्त अवतार महाराष्ट्र, पंजाब व दिल्लीत सापडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. किंबहुना महाराष्ट्र व दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस हा नवा सशक्त विषाणू कारणीभूत असल्याची चर्चा केली जाऊ लागली आहे. हे खरे असल्यास ती चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे केवळ दुसऱ्या टप्प्यावरील चाचण्यांनंतर भारतीय नागरिकांना लसीकरणाची सक्ती केली जाऊ लागली आहे. ताज्या माहितीप्रमाणे तिसरी व अंतिम चाचणी आता सुरु झालेली आहे. भारत बायोटेकच्या मूळ अर्जानुसार तीन चाचण्या होण्यास ऑक्टोबर-२०२१ उजाडणार होता. भारतात लस उत्पादनात अग्रगण्य असलेल्या हाफकिन संस्थेला या नव्या लशीच्या संशोधन व निर्मितीपासून लांब का ठेवण्यात आले, याचा उलगडा झालेला नाही. गळ्याला फास बसू लागल्यावर ‘हाफकिन’ला लसनिर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक लस ही तुलनेने प्रभावी व कमी त्रासाची असल्याचे मानले जाते. ती किंवा इतरही लशींच्या आयातीबाबत वेळेवर निर्णय करण्यात का आला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. यासंदर्भातील सरकारची भूमिका अनाकलनीय आहे.

राहूल गांधी यांची कितीही चेष्टा केली तरी त्यांनी अलीकडच्या काळात काही रास्त प्रश्न उपस्थित केले. त्यांनी भारतीय लस निर्यातीस बंदी करण्याची केलेली मागणी आणि परदेशी लशींच्या आयातीस परवानगी देण्याच्या केलेल्या मागणीची भाजपच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे टिंगल उडवली. सतत चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव असलेले कायदामंत्री रविशंकर प्रसाद नेहमीप्रमाणेच राहूल गांधी यांचे परदेशी आजोळ आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उगाळायला लागले. ते व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी नेहमीप्रमाणेच चेष्टेची खालची पातळी गाठून राहूल व सोनिया बहुधा इटालियन लशीची वाट पहात असावेत, अशी टिप्पणी केली. परंतु तीन-चार दिवसांनी त्यांच्याच सरकारने परदेशी लशींच्या आयातीस परवानगी देण्याचा निर्णय केला. त्यानंतर रविशंकर आणि त्यांचे अन्य सहकारी दातखीळ बसलेल्या अवस्थेत आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचा कुप्रसिद्ध आयटी सेलदेखील चूपचाप अवस्थेत आहे. काँग्रेस पक्षाने मोदी-शहा जोडगोळीबद्दल जेव्हा ते आहेत कुठे ?’ अशा आशयाचा ट्वीटरवर मारा सुरु केल्यानंतर बचावाच्या पवित्र्यात गेलेल्या भाजपच्या आयटी सेलने ‘सारा देश पंतप्रधानांच्या मागे एकजूट आहे’, ‘आजही मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आहेत’ असल्या सवंग ट्वीटने कातडी वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला.

राजधानी दिल्ली : मोहक प्रचार, दाहक वास्तव
व्वा रे चोर ः पुण्या-मुंबईतील बुलेटशिवाय ते दुसऱ्या गाडीला हातही लावत नाहीत!

ज्याप्रमाणे ‘मोदी-०२’ म्हणून जोरात प्रचार सुरू करण्यात आला होता. त्याच चालीवर जर ‘कोरोना लाट -२’चे मूल्यमापन करायचे झाल्यास यावेळीदेखील केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात गाफील राहिले आहे, असे अनुमान काढावे लागेल. याचे कारण स्पष्ट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज डिसेंबरपासून केला जात होता. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तज्ज्ञांनी याबाबत स्पष्ट इशारे दिले होते. परंतु सरकारने त्यादृष्टीने पूर्वतयारी केली नाही. मोदी व शहा यांना पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्यात कसेही करुन पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार कसे येईल, यासाठी जिवाचा आटापिटा करायचा होता व तो ते करीतही आहेत. महाराष्ट्राने लस आणि इतर औषधांचा पुरवठा नसल्याचे व त्यामुळे त्यांची उपलब्धता नसल्याचे सांगितल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी लस किंवा औषधांचा साठा पुरेसा असल्याची ग्वाही दिली होती. परंतु ज्या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याचा ढोल केंद्र सरकार पिटत होते त्या महाराष्ट्राला पुरेशी औषधे व लस पुरविली गेली नाही, हे आता उघड झाले आहे. संघराज्याच्या मूळ गाभ्यावरच हा आघात आहे. पुन्हा केंद्र सरकारचा महाराष्ट्राबद्दलचा आकस स्पष्ट झाला आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com