ग्रॅमी पुरस्कारांमध्ये तिरकिट धा!

sandeep das
sandeep das

जागतिक संगीताच्या क्षेत्रात ग्रॅमी पुरस्काराचे महत्त्व तेवढेच, जेवढे चित्रपट क्षेत्रात "ऑस्कर'ला. जगातले नामवंत असे दिग्गज कलावंत आपापल्या उत्कृष्ट कलाकृतींसह येथे रिंगणात उतरतात. तिथे स्वत:ला सिद्ध करणाऱ्याचा "बेडा पार' झाला असे समजायला हरकत नसते. यंदा ख्यातनाम भारतीय तबलावादक संदीप दास यांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले. भारतीय कलावंतांसाठी नि:संशय हा एक मोलाचा आणि आनंदाचा क्षण होता. अवघ्या 45 वर्षांचे संदीप दास वयाच्या नवव्या वर्षापासून तबल्याची साधना करीत आहेत. पं. किशन महाराज यांचा हा पट्टशिष्य लहान वयातच इतका तयार झाला, की वयाच्या 15व्या वर्षी त्याने पदार्पण केले ते थेट सतार औलिया पंडित रविशंकर यांच्या साथीला बसून! ही धिटाई फार दुर्मीळ असते. किशन महाराजांच्या बनारस घराण्याचे त्यांच्या शिष्याने खऱ्या अर्थाने नाव रोशन केले. त्यासाठी नियमितपणे पाटण्याहून बनारसला खेटे घालण्याची मेहनतही त्यांनी बालपणी केली आहे. त्या मेहनतीचे रंग आता दिसू लागले आहेत, इतकेच. परदेशात तबल्याचे शिक्षण देता देता त्यांनी फ्यूजन संगीतातही आपली वाटचाल चालू ठेवली. न्यूयॉर्क फिलहार्मोनिकमध्ये तबला वाजवण्याचा मान त्यांना खूप आधी मिळाला होताच. "सिल्क रोड' नावाचा एक कलावंतांचा मेळा (ऑन्सांब्ल) जमवून त्यांनी विविध प्रयोग केले. "सिंग मी होम' हा आल्बम म्हणजे त्याचेच फळ होते. "सिंग मी होम'ने संदीप दास यांना संगीतदिवाण्यांच्या घराघरांत पोचवले. यंदा त्यांना जो ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तो "यो यो मा' या स्वरकलाकृतीसाठी. भारतीय कलावंत आता जागतिक अभिजात संगीताच्या क्षेत्रात सहजतेने वावरू लागले आहेत, असाच याचा आपण अर्थ घ्यायचा. वास्तविक हे लोण सुरू केले, पं. रविशंकर यांनी. त्यानंतर सातत्याने भारतीय संगीतकारांचे नाव अभिजात संगीतात आदराने घेतले जाऊ लागले आहे. त्याच कलावंतांच्या मांदियाळीतील ताजे नाव संदीप दास यांचे. ""भारतीय संगीत अधिक दृढमूल होत चालल्याचे हे लक्षण आहे. हिंदुस्थानी संगीत अधिकाधिक संपन्न होण्यासाठी कलावंतांनी राबलं पाहिजेच, पण माध्यमांनीही आपला वाटा उचलायला हवा. सोन्याचे दिवस दूर नाहीत..,''असे उद्‌गार संदीप दास यांनी पुरस्कार पटकावल्यावर काढले खरे, पण ही फारच मोठी अपेक्षा झाली, असे म्हणण्याची पाळी येऊ नये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com