ॲमेझॉन अग्नितांडवाचा अन्वयार्थ

Berlin
Berlin

जैववैविध्याने समृद्ध असलेल्या ॲमेझॉनच्या खोऱ्यात विकासाच्या हव्यासातून लावलेल्या आगींमुळे अमूल्य मूलस्रोत नष्ट होत आहेत. यासंदर्भात ब्राझीलच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

पृथ्वीची फुफ्फुसे, म्हणजेच ॲमेझॉन पर्जन्यवने अभूतपूर्व   वेगाने जळून नष्ट होत आहेत. अगदी आत्ता, या घडीला.  ही वने पृथ्वीतलावरील एकूण वृक्षनिर्मित प्राणवायूपैकी सोळा टक्के प्राणवायू निर्माण करतात. प्रतिवर्षी दोन अब्ज मेट्रिक टन कार्बन शोषून घेतात. (या आगींमुळे मृत वृक्ष १.९ अब्ज टन तो आता पुन्हा वातावरणात सोडतील!) इतका अमूल्य मूलस्रोत मानव आपल्या मूर्ख विकासवेडाने संपवतो आहे. याच महिन्यापासून ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्याच्या मुख्य भागात ९५०० आगी लावून ते पेटवले जात आहे आणि मुख्यत्वे या विनाशाला विकासोन्माद हाच कारणीभूत आहे. सुमारे साडेपाच कोटी चौ. कि. मी. व्याप्ती असलेली ही वने नऊ देशांमध्ये विभागली आहेत. ब्राझील (६० टक्के), पेरू (१३ टक्के), कोलंबिया (१० टक्के) आणि व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, सुरिनाम, गयाना आणि फ्रेंच गयाना या देशांमध्ये १७ टक्के अशी ती पसरली आहेत. रुंद, मोठ्या पानांचे सदाहरित, मोठे वृक्ष असलेले हे विषुववृत्तीय पर्जन्यवन. 

ॲमेझॉनमधले जैववैविध्य थक्क करणारे आहे. पक्ष्यांच्या १२९४ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या ४२७ प्रजाती, ४२८ जातींचे उभयचर, तर ३७८ प्रजाती सरपटणाऱ्या प्राण्यांच्या. वनस्पतींच्या १६ हजार आणि कीटकांच्या २.५ कोटी इतक्‍या प्रजातींचे हे माहेरघर. मानवी स्थानिक, आदिम जमातींच्या ४००-५०० जाती आणि त्यातल्याही ५० जमाती बाहेरील जगाशी संपर्क कधीही न आलेल्या. जगातील पक्ष्यांच्या एकूण प्रजातींपैकी प्रत्येक पाचात एक इथली असते. मत्स्यकुळातही हीच आकडेवारी. संपूर्ण ॲमेझॉन खोऱ्यातील वृक्षांची एकूण संख्या आहे ३९० अब्ज. वर्षातील बहुतेक काळ ही वने ओली आणि आर्द्र असतात. जुलै आणि ऑगस्ट हेच महिने मात्र तिथल्या हवामानचक्रानुसार सर्वाधिक शुष्क आणि कोरडे असतात. या महिन्यांमध्ये काही प्रमाणात वणवे, आगी लागतातच. शेती आणि जंगलतोड करून कुरणांची निर्मिती यासाठी त्या समाजकंटकांकडून लावल्याही जातात. पण, गेल्या वर्षी विकासोन्मादी सरकार तिथे सत्तारूढ झाले तेव्हापासून निव्वळ मागच्या एका वर्षात ७३ हजार आगी लागल्या, हा योगायोग असूच शकत नाही. सध्याचा अग्निप्रलय हा २०१३ नंतरचा सर्वाधिक मोठा आणि आधीच्या वर्षापेक्षा तब्बल ८३ टक्के जास्त आहे. ब्राझीलच्या चार राज्यांमध्ये आग सर्वाधिक पसरली आहे. ॲमेझेनास, रोन्डोनिया, पारा आणि मतो ग्रासो ही ती राज्ये. गेल्या आठवड्यात आगीपासून २७०० कि. मी. लांब असलेल्या सावो पावलो शहराचे आकाशही प्रदूषक आणि धूर यांमुळे काळवंडले होते, इतके प्रदूषण झाले आहे. मूळ जंगलविनाश तर आहेच; पण अतिघातक सूक्ष्मकण, कार्बन मोनोक्‍साइड, नायट्रोजनची ऑक्‍साइडे, मिथेन-विरहित सेंद्रिय प्रदूषके या आगी प्रचंड प्रमाणात वातावरणात सोडत असल्याने अपरिमित हानी होत आहे. ‘युरो’ संघटनेच्या कोपर्निकस उपग्रहाधारित निरीक्षण प्रणालीनुसार ॲमेझॉन जंगलांमधून या वर्षी अशा आगींमुळे २२८ टन कर्ब वायू वातावरणात सोडला गेला आणि २०१० नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे.

जितक्‍या अधिक प्रमाणात ही वने जळून नष्ट होतील तितक्‍याच प्रमाणात शेती, पर्जन्यमान अन्‌ पिण्याच्या पाण्यावर त्याचे परिणाम होतील. जंगलातील आगी-वणवे आणि तापमानवाढ, वातावरण बदल हे परस्परपूरक एका दुष्टचक्राचे भाग असतात. आगी-वणवे वाढले, की त्यामुळे तापमानवाढ घडवून आणणारे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमान आणखी वाढते. मग आगी लागण्याची शक्‍यताही वाढते. अशा वाढलेल्या तापमानामुळे दुष्काळासारख्या संकटांना आपसूक आमंत्रण मिळते. (संदर्भ : ग्रीनपीस अहवाल) अशा वायूंची उत्सर्जने वाढण्याबरोबरच ‘बाधित क्षेत्रा’तील पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होतात. परिणामी, उन्हाळ्याचा शुष्क, कोरडा काळ वाढतो की पुन्हा आग-वणवे ही शक्‍यता, असे हे चक्र.

या वर्षी ॲमेझॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागातील उन्हाळ्याचा कालावधी, तीस वर्षांपूर्वीच्या त्याच कालावधीपेक्षा वीस दिवस जास्त होता. तज्ज्ञांच्या मते हा कालावधी आणखी तीन-चार आठवडे पुढे गेला, तर कडेलोटाची परिस्थिती येईल आणि तो एकूण चार महिन्यांपुढे गेला तर तिथल्या कमाल-किमान तापमानातला फरक (क्‍लायमेट एनव्हलप) गवताळ प्रदेशाप्रमाणे होऊन जंगलावर परिणाम होईल. 

ब्राझील सरकारच्या निर्लज्ज निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर शेजारील बोलिव्हियाची तातडीची कृती ठळक उठून दिसते. तिथले अध्यक्ष एव्हा मोरेल्स यांनी ताबडतोब ‘बोइंग ७४७’चे ‘सुपरटॅंकर’ विमान भाडेतत्त्वावर मागवून कार्यवाही सुरू केली. हे विमान आपल्याबरोबर एक लाख पंधरा हजार लिटर पाणी साठवून उडू शकते. ते खाली फवारूही शकते. ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो हे या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्याहूनही टीकेचा विषय होत असलेले राजकारणी ठरले. एकतर इतकी महाप्रचंड आग भडकल्याचे कळूनही बोल्सोनारो महाशय एका ‘स्टॅंड अप कॉमेडी’मध्ये रममाण झाले होते. ‘या आगी पर्यावरणवादी संस्थांनीच चालू विकास न बघवल्याने आणि मी त्यांच्या देणग्या थांबवल्याने लावल्या,’ अशी त्यांची मुक्ताफळे त्यांचा एकूण वकूब स्पष्ट करतात. जगभरात त्यांच्यावरील रोष आणि संताप पराकोटीला गेला तेव्हा त्यांनी उपकार केल्यासारखे ४४ हजार सैनिक संकट निवारण्यासाठी पाठवले. 

ॲमेझॉन जंगले हा ब्राझीलच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आहे, हे स्वतःचे अतिनिंद्य मत बोल्सोनारो यांनी कधीही लपवलेले नाही. पर्यावरणाला हानिकारक ठरत असल्यामुळे ठप्प झालेले जल-विद्युत प्रकल्प त्यांनी सत्तेवर आल्यावर तत्काळ मंजूर करून घेतले. निसर्गसंरक्षणाच्या तरतुदींमध्ये ९५ टक्के कपात केली. ‘इबामा’ ही ब्राझीलची अधिकृत पर्यावरण संरक्षण संस्था. तिच्या २७ पैकी २१ सभासदांची त्यांनी हकालपट्टी केली. ब्राझीलच्या उपग्रह संस्थेचे प्रमुख उपग्रहाद्वारे या आगी जगापुढे मांडू लागल्यावर त्यांना हाकलून दिले. मग साक्षात ‘नासा’नेच उपग्रह प्रतिमांद्वारे या संकटाचे भयावह स्वरूप जगासमोर आणले. या पार्श्वभूमीवर वनजमीन गिळण्यासाठी आतुर सोयाबीन उत्पादक, चोरटे लाकूडतोडे, ॲमेझॉन वने साफ करून विनाशकारी उद्योग उभे करण्यासाठी हपापलेले उद्योगपती हे सर्व त्यांचे घनिष्ठ मित्र. त्यांच्या बेमुर्वतखोर, उथळ आणि बेजबाबदार वागण्याची तीव्र प्रतिक्रिया जगभरातून उमटणे स्वाभाविक होते. नॉर्वे आणि जर्मनी मिळून १.२ अब्ज डॉलर खर्चून ब्राझीलमध्ये मोठा निसर्गसंवर्धन प्रकल्प राबवणार होते, तो धोक्‍यात आला. ‘युरो’ आणि निवडक दक्षिण अमेरिकी देश (ज्यात ब्राझील होता) मिळून मोठा व्यापारी करार करीत होते, तो थांबला. या करारासाठी वाटाघाटी गेले दशकभर चालल्या होत्या. ब्राझील सरकारला आपल्या देशबांधवांचा आक्रोश, वन्य जमातींचा तळतळाट ऐकू येत नसला, तरी निर्यातीच्या शेतीमालावर बहिष्काराची भाषा तेवढी बरोबर कळते. ‘युरो’ने तसे केले तर ब्राझीलचे कंबरडेच मोडेल, हे तिथल्या विकास लॉबीलाही चांगले माहीत आहे. अर्थात सरकार, बोल्सोनारो हे एका बाजूला आणि सर्वसामान्य जनता दुसऱ्या बाजूला, जी ॲमेझॉनवर प्रेमच करते. त्यामुळे ब्राझीलवर निर्बंध, बहिष्कार घालतानाच खरी गरज आहे ती सह-अनुभूती आणि मदतीची आणि ॲमेझॉन वाचवण्याच्या ठोस उपाययोजनेची. ‘जी-७’ देशांच्या परिषदेत फ्रान्सच्या अध्यक्षांनी दोन कोटी युरो इतकी मदत देण्याची मांडलेली योजना बोल्सोनारोंनी धुडकावली. हा प्रस्ताव त्यांना ‘ब्राझीलच्या अंतर्गत बाबीतली ढवळाढवळ’ वाटतो हे त्यांनी तत्काळ सांगून टाकले. आग थांबवण्यासाठी विमाने, जंगल पुनर्निर्माण असे उपाय त्यात होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर आणि ॲमेझॉनमधील आगी, यातले समान सूत्र म्हणजे ‘जीडीपी’ आधारित आभासी विकासाची हाव. ती न सोडल्यास आज ते ‘जात्यात’ आहेत; पण आपण ‘सुपात’ आहोत, ही जाणीव असणे इष्ट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com