esakal | भाष्य : प्रवास एका हरित चळवळीचा
sakal

बोलून बातमी शोधा

greenpeace Rainbow Warrior

भाष्य : प्रवास एका हरित चळवळीचा

sakal_logo
By
संतोष शिंत्रे

पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव पद्धतीने अहिंसक आंदोलने करणे आणि त्याद्वारे वसुंधरेच्या संरक्षणाला हातभार लावण्याचे कार्य ‘ग्रीनपीस’ने केले आहे. ही चळवळ पन्नाशीत पोहोचली असताना तिच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

अर्वाचीन पर्यावरण चळवळ 2021 मध्ये एकूणसाठ वर्षांची झाली. याच चळवळीतील सर्वात मोठी जागतिक संस्था असलेल्या ‘ग्रीनपीस’ने, 15 सप्टेंबर 2021 रोजी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला आहे. या दोनही घटना काही अभूतपूर्व सकारात्मक परिणाम पृथ्वीतलावर निश्चितच घडवून गेल्या आहेत. हा परिणाम अभ्यासणे, पुढील काळातील निसर्ग पर्यावरण संवर्धित, संरक्षित करण्यासाठी गरजेचे आहे.

रॅचेल कार्सन लिखित ‘द सायलेंट स्प्रिंग’ पुस्तक 1962 मध्ये प्रकाशित झाल्याने लाखो लोकांचा दबाव येऊन पहिलावहिला पर्यावरणविषयक कायदा अमेरिकी संसदेत मंजूर होणे ही आधुनिक पर्यावरण चळवळीची सुरुवात. पुढील वर्षात ती साठाव्या वर्षात प्रवेश करेल. तर 15 सप्टेंबर 1971 रोजी अलास्काजवळ आमचीटका बेटावर होऊ घातलेल्या पर्यावरण विनाशी आण्विक चाचणीला विरोध करण्यासाठी एका छोट्या बोटीतून सरसावलेल्या निसर्गस्नेही लोकांची छोटी मोहीम ही ‘ग्रीनपीस’ची सुरुवात. यावर्षी या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आजमितीला ती निसर्ग चळवळीतील जागतिक स्तरावरील सर्वात मोठी एकल संस्था म्हणून नावारूपास आली आहे. युरोप, दोनही अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि प्रशांत महासागरामधील 55 पेक्षा अधिक देशांत ती कार्यरत आहे. अॅमस्टरडॅम येथे तिचे आंतरराष्ट्रीय कार्यालय आहे. प्रादेशिक कार्यालये अनेक देशांमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची सल्लागार म्हणून तिची नेमणूक झाली असून नोबेल परितोषिकासाठी तिचे नामांकन केले होते.

स्वातंत्र्य शंभर टक्के अबाधित राहावे, यासाठी ‘ग्रीनपीस’ खासगी कंपन्या, सरकारे अथवा राजकीय पक्ष यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अर्थपुरवठा स्वीकारत नाही. व्यक्तिशः नागरिकांनी दिलेल्या देणग्या, त्यांच्या विविध उपक्रमांचा प्रचार, यातूनच ती आपला खर्च भागवते. ज्यात जहाजांचा ताफा, पदरच्या कर्मचाऱ्यांची वेतने आदींचा समावेश होतो. त्यांचा भर मात्र थेट, अहिंसक कृतीवर असतो. यात व्हेल मारणाऱ्यांच्या हार्पून आणि माशांच्यामध्ये आपली छोटी होडी नेऊन उभी करणे, समुद्रात विषारी औद्योगिक कचरा सोडणारे पाईप थेट बूच लावून बंद करून टाकणे अशा नाट्यमय कृतींद्वारा त्यांनी नागरिकांची मने जिंकल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्या‍च राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियामक संस्थांकडून त्यांनी पर्यावरण हितैषी असे अनेक निर्णय करवून घेतले आहेत.

अर्थात आजवर अनेक वेळा पर्यावरणीय आंदोलने, लढे पुढे नेत असतांना ‘ग्रीनपीस’ला हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. तरीही त्यांनी आपली महात्मा गांधी प्रणित अहिंसात्मक मूल्ये कधीही सोडली नाहीत. (ग्रीनपीस संस्थापक आपला या मूल्यांवरील विश्वास वेळोवेळी अनेक मुलाखतींमध्ये मांडत असतात). १० जुलै 1985 रोजी ‘ग्रीनपीस’चे रेनबो वॉरीयर हे जहाज न्यूझीलंडजवळील एका प्रवाळ साठ्यात होणाऱ्‍या फ्रान्सच्या घातक आण्विक चाचण्यांना विरोध करण्यासाठी निघाले होते. ऑकलंड बंदरात ते नांगरून ठेवले असताना, फ्रेंच गुप्तहेर यंत्रणांनी दोन बॉम्बस्फोट करून ते बुडवले. त्यात एक कार्यकर्ता जीवाला मुकला. तथापि हे मोठे नुकसान ‘ग्रीनपीस’चे मनोधैर्य खच्ची करू शकले नाही. 2011 मध्ये पर्यावरण संदेशांचा प्रचार-प्रसार करणे, प्रत्यक्ष मोहिमांमध्ये भाग घेणे यासाठीचे त्याच नावाचे नवे सुसज्ज जहाज त्यांनी पाण्यात उतरवले. ते आता जगभर प्रवास करून विविध कार्यात सहभागी होत असते. मागे ते भारतातही येऊन गेले आहे.

भारतात आजवर त्यांचे रचनात्मक काम पुरेसे असूनही सरकारी अवकृपेची ती धनी झाली. यात केडिया या बिहारमधील खेड्यात त्यांनी लोकसहभागातून 2016 मध्ये उभे केलेले पाच टन क्षमतेचे संपूर्ण सौर उर्जेवरील शीत साठवणगृह हे एक उदाहरण. महान नामक उत्तर प्रदेशमधील एक जंगल हिंडाल्को आणि एस्सार या दोन कंपन्यांना कोळसा उत्खनन करण्यासाठी देण्याचे घाटत होते. चार लाख वृक्ष आणि पन्नास हजार लोकांचे त्यावर अवलंबून असलेले जीवनमान त्यामुळे नष्ट होणार होते. ‘ग्रीनपीस’च्या सकारात्मक आंदोलनाने अखेर कोल इंडियाने हे हस्तांतर थांबवले. शतकभरातील ही महत्त्वाची पर्यावरणीय लढाई म्हणता येईल. आंदोलने करण्याचे त्यांचे मार्ग मोठे रोचक, परिणामकारक आणि व्यवहारचतुर असतात.

‘ग्रीनपीस’चे यश

भारतीय पर्यावरण चळवळीला त्यांच्यापासून सर्वाधिक काही शिकण्यासारखे असेल तर हे अभिनव मार्ग. कारण आजकाल समोरची बाजू जर संवेदनशील नसेल तर गुलाबाची फुले पाठवणे, उपोषणे इत्यादींचा परिणाम होत नाही. आठवा, गंगा शुद्धीकरणासाठी बेमुदत उपोषण करून निवर्तलेले जी. डी. अग्रवाल. जगभरातील आणि भारतातही त्यांनी दाखवलेल्या अशा कल्पकतेची काही उदाहरणे पाहू. पहिले आहे ते फेसबुकचाच वापर करून ‘ग्रीनपीस’ने फेसबुकलाच आपल्या उर्जास्रोतापैकी कोळसा आधारित स्त्रोत बंद करण्यास कसे भाग पाडले ते. फेसबुकचे अवाढव्य डाटा सर्व्हर्स कोळसा आधारित विजेवर चालत होते. 2011च्या वसुंधरा दिनाचा मुहूर्त साधत ‘ग्रीनपीस’ने फेसबुकवरच त्यांच्याविरुद्धची ‘अनफ्रेंड कोल’ नावाची मोहीम सुरू केली. हे ‘आंदोलन’ वीस महिने चालले. त्या पानाला सात लाख लाईक्स मिळाल्याचे पाहून अखेर फेसबुकने त्यांचे उर्जास्रोत पुनर्निर्माणक्षम केले. त्यांची अशी कैक उदाहरणे भारतीय पर्यावरण चळवळीने अभ्यासणे गरजेचे वाटते.

फेब्रुवारी 2006 मध्ये फ्रान्सचे एक विमानवाहू जहाज अलंग, भावनगर, गुजरात येथील जहाज तोडणी उद्योग कंत्राटी पद्धतीने तोडफोड करून देणार होता. त्यात असलेले घातक अॅजबेस्टोस आणि विषे भारतीय समुद्रात गडप होणार होती. ‘ग्रीनपीस’ने आवाहन केलं की, ते त्यांचा कचरा आपल्या इथे फेकणार आहेत; तर आपण दिल्लीतील घनकचरा त्यांच्या वकिलातीत नेऊन टाकू. एका आठवड्याच्या आत आपल्या आणि फ्रेंच न्यायालयांनी उलटे निकाल देऊन ते मागे बोलावलं!

‘ग्रीनपीस’लाही भरपूर टीकाकार आहेत. विशेषतः त्यांनी आपली जनुकीय बदल केलेल्या बियाण्यांबाबत भूमिका बदलावी असे आवाहन त्यांना 107 नोबेल विजेत्या वैज्ञानिकांनी केले होते. पण आपल्यासाठी हे सर्व, टिळक-आगरकर भांडणाबाबत गडकरी जे म्हणाले होते तसे आहे, ‘ह्या आकाशस्थ नक्षत्रांच्या शर्यती, आम्ही त्या जमिनीवरून पहाव्यात’. आपल्यासाठी ग्रीनपीस आणि पर्यावरण चळवळ दोन्हींचे आजवरील यश काय तर : १. सृष्टीचे मानवेतर घटक आणि त्यांचे जगणे सक्षम करूनही अंगिकारता येणारी धारणाक्षम विकासाची प्रारूपे, दिशा व त्यासाठी आवश्यक संवर्धन विज्ञान सुस्पष्ट रीतीने समोर आले आहे. २. निरंकुश, बेबंद असे भांडवलखोरांचे तांडव थोपवू शकणारी एकमेव अर्थपूर्ण चळवळ म्हणून ती चहू अंगानी वाढते आहे. ३. पन्नास वर्षात अनेकदा माणसाला अनेक विनाशकारी निर्णय घेण्यापासून अनेक वेळा रोखले आहे; निसर्ग राखला आहे. ४. पृथ्वीतलावरचे जैववैविध्य निदान काही प्रमाणात तारले आहे. ५. नैसर्गिक संसाधने वाचवून सामान्य लोकांचे राहणीमान काहीसे स्वस्ताईचे केले आहे. ६. याच मूलस्रोतांना खासगीकरणाच्या गोंडस नावाखाली मूठभर धनदांडग्यांच्या कह्यात जाण्यापासून वाचवले आहे. ७. पृथ्वीवरचा (निदान) 14.5% भूभाग मानवी हस्तक्षेपापासून संरक्षित ठेवायला भाग पाडून सृष्टीच्या मानवेतर घटकांना जगवले आहे. ८. अनेक प्रजातींचे समूळ नामशेष होणे रोखले आहे. एखाद्या चळवळीचं यश आणखी काय असतं?

loading image
go to top