भाष्य : सागराचा प्राण तळमळला

संतोष शिंत्रे
Tuesday, 16 February 2021

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध धातूंसाठी सागरी खाणकाम करण्याचे घाटत असल्याच्या चर्चेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे पुष्टी मिळाली आहे. यात असलेले दूरगामी धोके आणि हानी लक्षात घेण्याची गरज आहे. सागराच्या नैसर्गिक व्यवस्थेला धक्का लावण्याने तेथील अनाघ्रात, सुंदर असे जग नष्ट होईल.

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध धातूंसाठी सागरी खाणकाम करण्याचे घाटत असल्याच्या चर्चेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे पुष्टी मिळाली आहे. यात असलेले दूरगामी धोके आणि हानी लक्षात घेण्याची गरज आहे. सागराच्या नैसर्गिक व्यवस्थेला धक्का लावण्याने तेथील अनाघ्रात, सुंदर असे जग नष्ट होईल.

अर्थसंकल्पात सागरी जैववैविध्याचा खोल समुद्रात जाऊन शोध घेणे, तेथील ‘जैविक आणि अजैविक’ मूलस्त्रोत अभ्यासण्यासाठी अचानक चार हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली दिसते. जमिनीवरील जैववैविध्यासाठी जेमतेम ४८ कोटी देणाऱ्या, व्याघ्र तसेच हत्ती प्रकल्पांच्या तरतुदींमध्ये कपात करणाऱ्या; तसेच एकूण अर्थव्यवस्थेच्या ०.०००००१६% पेक्षाही कमी निधी पर्यावरण खात्याला देणाऱ्या सरकारला हे भरते येण्याचे खरे कारण वेगळेच आहे. जल, जंगल, जमीन हे मूलस्त्रोत अनिर्बंध वापरून झालेल्या हानींनंतर सरकारची वक्रदृष्टी आता भारतीय समुद्र-तळांकडे तिथे खाणकाम करण्यासाठी वळली आहे. सागरी जैववैविध्य वगैरे फक्त बोलाची कढी. ‘डीप ओशन मिशन’ ह्या नावाने हा प्रकल्प पुढील काही वर्षात रेटला जाण्याचे घाटते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तांबे, झिंक, इतर धातू इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीजसाठी तसेच पवन ऊर्जेची टर्बाईन्स आणि सौर ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असतात. लिथियम, स्कॅन्डियम हे धातू संबंधित ईलेक्ट्रोनिक उत्पादनांसाठी आवश्यक असतात. हे सर्व धातू मिळणारी दुभती गाय म्हणजे समुद्रतळ. तिथे खोलवर धातू-बहुल, बहुविध धातूमिश्रित असणार्‍या गुठळ्या( polymetallic nodules) मिळतात.बटाट्याप्रमाणे गोलसर, आकाराने काही मिलीमीटर ते सेंटिमीटर असणाऱ्या ह्या गुठळ्यांमधे मॅनगेनीज, निकेल, कोबाल्ट,आयर्न हायड्रोक्साईड अशी मूल्यवान धातू-खनिजे असतात. समुद्र तळाशी सुमारे सहा हजार मीटर इतक्या खोलीवर ती विखुरलेली असतात. स्मार्टफोन्सपासून ते सौर फलकांपर्यंत सर्वत्र ह्या धातूंचा वापर केला जात असल्यानेच समुद्रांवर हे संकट घोंगावू लागले आहे. हे ‘मिशन’ सोपवले आहे इस्रो, डीआरडीओ, अणू-ऊर्जा, सीएसआयआर, खनि-कर्म मंत्रालय अशा खाती/यंत्रणांकडे! ह्या यंत्रणा जैववैविध्य काय शोधणार? पर्यावरण खात्याला सदर ‘मिशन’मधे भूमिकाच नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे  नैसर्गिक मूलस्त्रोत संपवत गेल्याने आता पॅरिस कराराची उद्दिष्टे गाठण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेवर अधिकाधिक विसंबून राहावे लागते आहे. विजेवरील वाहने काय किंवा सौर विद्युत उत्पादनाचे साहित्य काय, ह्यात प्रचंड प्रमाणावर काही धातू आणि खनिजे वापरली जातात. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हवामान बदल रोखून तापमान दोन अंशांपेक्षा कमी ठेवण्यासाठी गरजेच्या सौर, पवन ऊर्जानिर्मिती आणि ऊर्जासंचय करणाऱ्या साहित्याच्या उत्पादनासाठी तीन अब्ज टन इतके महत्त्वाचे धातू लागणार आहेत.

संकटांना आमंत्रण
जर तापमानवाढ आपण १.५ अंश इतकी रोखण्यात यशस्वी झालो, तरीही कोबाल्टची मागणी उपलब्ध साठ्यांपेक्षा २०५०पर्यंत ४२३% इतकी वाढेल; निकेलची १३६% आणि लिथियमची मागणी २८०% इतकी वाढेल. विजेवर ७५ किलो वॅटची बॅटरी वापरून चालणार्‍या वाहनामधे ५६ किलो निकेल, १२ किलो मॅगेनीज, सात किलो कोबाल्ट आणि वायरिंगसाठी तब्बल ८५ किलो तांबे वापरले जाते. पेट्रोल/डिझेल वर चालणाऱ्या मोटारीच्या सातपट जास्त धातू विजेवरील वाहने वापरतात. जागतिक पातळीवर अशा वाहनांचे उत्पादन आजमितीला असलेल्या ५० लाखांवरून २०३०पर्यन्त २४.५ कोटी,म्हणजे जवळपास ३० पटींनी वाढले असेल. त्यामुळे सर्वच राष्ट्रांनी खनिजे मिळवण्यासाठी समुद्रांकडे मोर्चा वळवला. दुसरी एक महत्त्वाची बाजू आहेच. विकासोन्मादात जग तिच्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करते आहे. २०० मीटरपेक्षा अधिक खोली असलेले समुद्रांचे तळभाग, एकूण सागरी विस्ताराच्या ९५ टक्के इतका आवाका व्यापतात. त्यामुळेच त्यांना सजीवांचा सर्वात मोठा एकल अधिवास म्हटले जाते. ते खरेही आहे. हे भाग अति-थंड,अत्यंत अंधारे आणि वातावरणाचा प्रचंड दाब असलेले जरी असले, तरी एकमेवाद्वितीय अशा कित्येक प्रजाती,अधिवास आणि सृष्टिव्यवस्था तिथे समृद्धपणे नांदत आहेत. हे खोल भाग, सागरी जीवशास्त्राने आजवर जेमतेम ०.०००१% इतकेच तपासले आहेत. तिथल्या अनेक प्रजाती अद्याप मानवाला माहीतही नाहीत. त्यांच्यावर अशा उचापतींचे काय परिणाम होतील, ही तर दूरची गोष्ट-त्यांची माहितीही आपल्याला झालेली नसतांना थेट असले विनाशकारी उपक्रम सुरू करणे म्हणजे संकटांना आमंत्रण.

सर डेविड अॅटेनबरो,‘आययूसीएन’ ही संस्था आणि ‘ग्रीनपीस’ ह्या सर्वांनी समुद्राचे तळ भोसकणे थांबवणे का गरजेचे आहे, ह्याची कारणे सांगितली आहेत. काय आहेत ही कारणे? अशा उचापतींमुळे हवामान-बदलाविरुद्धच्या लढ्यातील आपला एक सर्वात महत्त्वाचा जोडीदार म्हणजे समुद्र आपण जोडीदार म्हणून कायमचा गमावू. हे पहिलं कारण. निव्वळ २०१७ ह्या एकाच वर्षात मानवी उठाठेवींमुळे तयार झालेल्या कार्बनपैकी समुद्री भागाने २.६ अब्ज टन (पेंटाग्रॅम) इतका कार्बन शोषून घेतला होता. तळाशी साठा झालेला हा कार्बन,समुद्री खाणकामाच्या यंत्रांमुळे पुन्हा वातावरणात सोडला जाईल. दुसरे कारण म्हणजे अशा उचापतींमुळे सागरी अन्न-साखळ्या फार मोठ्या प्रमाणावर धोक्यात येतील. हे खाणकाम आपल्याला मिळावे म्हणून डोळे लावून बसलेल्या कंपन्यांनाही ह्या मोठ्या धोक्याची खरे तर जाणीव आहे. त्यांच्याच एका परिषदेत अत्यंत दुर्मिळ असलेल्या प्रजातींच्या नामशेष होण्याच्या धोक्याची जाणीव त्यांना असल्याची कबुली दिल्याचे ‘ग्रीनपीस’ने निदर्शनास आणले. संपूर्ण सागर ढवळले जाऊन अन्नसाखळ्या आणि त्यांची स्थिरता भंग पावेल. तिसरे कारण. अन्य कुठेही न आढळणार्‍या प्रजातींचे लुप्त अथवा नामशेष होणे. ह्या कुठल्याच प्रजाती अद्याप आपल्याला धड माहीतही झालेल्या नाहीत.  

लागणारा प्रत्येक शोध, नवे काहीतरी सामोरे घेऊन येतो आहे. उदाहरणार्थ, २००२मध्ये शोधले गेलेले, ‘झोंबी वर्म्स’ नावाने ओळखले जाणारे ‘सी अॅनिमोन्स’ आपल्या वजनाच्या सहापट किडे खाऊन फस्त करतात. न जाणो मानवासाठी काही बऱ्या गोष्टींचा शोध उद्या त्या प्रजातींमधून लागू शकेल. ती शक्यता नष्ट होण्याचा धोका आहे. खाणकामाच्या प्रस्तावित जागांमधले ८५% समुद्री जीव अन्यत्र आढळत नाहीत. 

खाणकामाची यंत्रे ज्या प्रकारे तळ उपसतील, त्यामुळे अनेक वर्षे त्या वातावरणात राहायला सरावलेल्या अनेक प्रजाती नामशेष होतील.त्यांच्या जीवनक्रमात धातू-बहुल गुठळ्यांचाही काही वाटा असतो. एकदा उपसल्यावर पुन्हा अशा गुठळ्या तयार व्हायला काही कोटी वर्षे लागतील. तसे झाले तर ह्या प्रजाती तग धरूच शकणार नाहीत.चौथे कारण म्हणजे जैविक वैविध्य शून्य टक्के नाश न पावता हा धंदा होऊ शकत नाही. समुद्रतळाशी असलेल्या पर्वतरांगा, प्रवाळभिंती हे अनेक सागरी वन्यजीवांचे आश्रयदाते. त्यांच्याच आधारे तगू शकणारे हे अनाघ्रात, सुरेख जग नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. इथले शार्क व बाकी प्राणी मंदगतीने वाढतात;जगतातही शंभराहून अधिक वर्षे. खाणकामातील यंत्रांनी ह्या व्यवस्था बिघडवल्या तर संतुलन ढासळेल. ‘आययूसीएन’च्या अहवालानुसार,  सदर उचापतींचा खर्च आणि त्यांपासूनची हानी  मिळणाऱ्या खनिजांच्या किमतीपेक्षा कैक पटींनी जास्त आहे. त्यामुळे सागरांचा प्राण तळमळू देता कामा नये!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Shintre Writes about Unconventional energy