अनाठायी संकोच 

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

एखाद्या अनोळखी ठिकाणी वाट चुकणे स्वाभाविक आहे; परंतु मला बरीच अशी मंडळी भेटतात की ज्यांना ‘कुणाला तरी विचारून घेऊ’ असं सुचवलं की हमखास राग येतो. ‘मी शोधतोय ना? मग कशाला कुणाला विचारायला हवं?’ कितीही मौल्यवान वेळ गेला किंवा त्रास झाला तरीही ही मंडळी कुणाचीही मदत घ्यायला तयार नसतात. 

एखाद्या अनोळखी ठिकाणी वाट चुकणे स्वाभाविक आहे; परंतु मला बरीच अशी मंडळी भेटतात की ज्यांना ‘कुणाला तरी विचारून घेऊ’ असं सुचवलं की हमखास राग येतो. ‘मी शोधतोय ना? मग कशाला कुणाला विचारायला हवं?’ कितीही मौल्यवान वेळ गेला किंवा त्रास झाला तरीही ही मंडळी कुणाचीही मदत घ्यायला तयार नसतात. 

माझ्याकडे समुपदेशनासाठी येणारी बरीच मंडळी कुणा नातेवाइकांसाठी किंवा मित्रासाठी मदत मागायला येतात. ते पीडित व्यक्तीला जबरदस्तीने आणायलाही तयार असतात; परंतु मला त्यांना सांगावं लागतं, की ‘जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच स्वतःला मदत करायला तयार नसेल तोपर्यंत कुणीही तिला मदत करू शकत नाही.’ हेच आयुष्यातील मोठं सत्य आहे. 

सर्व प्रकारच्या समस्यांवर प्रत्येकाकडे उपाय नसतात. बरेचदा त्या समस्येचा आकारच इतका मोठा असतो की ते पाहूनच भल्याभल्यांचे त्राण नाहीसे होते. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा किंवा पैसा पणाला लागलेला असतो; तर कुठे कुठे महत्त्वाची नाती त्रिशंकूसारखी टांगलेली असतात. अशा वेळी कुठलाही एक उपाय उपयुक्त ठरेल, अशी हमी नसते आणि शक्‍य असलेले उपाय आपण कितपत अमलात आणू शकतो, याबद्दलही शंका असू शकते. 

अशा वेळी कुणीतरी समजूतदार, निःपक्षपाती, जाणकार व्यक्ती आपल्या समस्येकडे नव्या नजरेने पाहून आपल्याला ते दाखवू शकते, जे आपण आपल्या जागेवरून पाहण्यास असमर्थ असतो. कुणीतरी ती मदत करू शकतो, ज्याच्याशिवाय आपण कदाचित पुढे सरकूच शकत नाही. काहीच नाही तर अशा कठीण वेळी कुणी तरी आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला धीर दिला तरी आपण दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने समस्येला सामोरे जाऊ शकतो. 

आपली संस्कृती पूर्वी तशीच होतीही. प्रत्येकासाठी कुणीतरी नक्कीच होतं; परंतु आज आपण इतके एकलकोंडे झालो आहोत की एक भाऊ दुसऱ्या भावाला आपली समस्या सांगायला धजत नाही. कुठं खोटी प्रतिष्ठा; तर कुठे शंका, पण परिणाम मात्र एकच- आपण सगळे आपापल्या समस्येखाली दबून जातो.

माझा मुलगा नापास झाला, हे सांगायला लाज वाटते आहे, म्हणून पालक आपल्या नातेवाइकांशी खोटं बोलतात. मुलीचं प्रेमप्रकरण आहे हे कुणाला कळू नये, या भीतीपोटी पालक आपल्याच मुलीला त्रास देतात. माझं काम खूप चांगलं सुरू आहे, हे दाखवण्यासाठी आपण कुणाचाही मौल्यवान सल्ला घेत नाही.  काही व्यक्ती मतलबी असू शकतात; पण सगळे तसे नसतात. आपला मुलगा अभ्यास न केल्यामुळे नापास झाला, याची लोकांनी चर्चा केली तरी काय हरकत आहे? ती गोष्ट खरीच आहे ना? मग लपवून उगाच उसनं अवसान आणून सतत तणावाखाली का जगतो आपण?

कुणाशी तरी बोला आणि त्यांचा आधार किंवा मदत मागितली तर लगेच तुम्ही दुबळे होत नाही. मदत चारही बाजूंना आहे, फक्त ती मागण्याची तुमची तयारी हवी.

Web Title: sapna sharma article