कुणाच्या किती चुका?

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 13 जून 2017

जीवन हे प्रायोगिकरीत्या जगायचं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल हे गरजेचं नाही. चुकांमधून शिकायला हवे हे नक्की, परंतु चुका करणारी व्यक्ती तुम्ही असो वा दुसरा कुणी, त्याला आजन्म दोषी ठरविण्याचं कारण नाही

चुकांबद्दल फार गैरसमज आहेत. खासकरून आपल्या आधुनिक भारतीय संस्कृतीमध्ये चूक करणे हीच सर्वात मोठी चूक समजली जाते. चूक करणारा वाईट अशी ठाम समजूत लोकांमध्ये दिसते. "चुका आणि चुका करणाऱ्यांबाबत तुमचे काय विचार आहेत?' मी असे प्रश्न वारंवार विचारते, कारण कुठलीही गोष्ट आपण स्वतःला लागू करू शकत नसलो तर तिला आपल्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. म्हणून काहीही वाचत असताना आत्मपरीक्षण सर्वात महत्त्वाचे. चुकांबद्दल विचार करणे यासाठी महत्त्वाचे आहे, की चुकांबद्दलच्या गैरसमजुतींमुळे आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना बऱ्याचदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बरेच पालक मुलांना किरकोळ चुकांवरून इतकं बोलतात की पुढं आयुष्यभर ती मुलं आपण चूक असल्याच्या न्यूनगंडात जगतात.

पण चुका म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे, "आपण कुठला तरी प्रयत्न केल्यानंतर तो यशस्वी न झाल्यास, मिळालेला परिणाम म्हणजे चूक.'
पुन्हा एकदा ही व्याख्या पाहा. एका वाक्‍यातच दोन शक्‍यता समोर येतात. 1) आपण अपेक्षित केलेला परिणाम न मिळणे ः प्रत्येक प्रयत्नात आपण अपेक्षित केलेले परिणाम मिळतीलच हा अट्टहास चुकीपेक्षा जास्त त्रासदायक असतो. मग चुकला कोण? प्रयत्न करणारा की दरवेळी परिपूर्णतेची अपेक्षा बाळगणारा?
2) आपण प्रयत्न करतो म्हणून चुका होण्याची शक्‍यता असते ः म्हणजेच जो चुका करतो तोच प्रयत्न करतो हे लक्षात येतं. मुलांनी खूप अभ्यास केला तर त्याला मार्क जास्त मिळतीलच याची खात्री नाही. कारण मार्क फक्त किती अभ्यास केला किंवा कुठला मुलगा महागड्या शाळा- ट्युशनला गेला यावर अवलंबून नसतात. परंतु, त्याच मुलाने परीक्षाच दिली नाही, तर त्याच्याकडून परीक्षेत चुकाच होणार नाहीत. ते आपल्याला चालण्यासारखे आहे काय?

कुणाला समजावून सांगू नये किंवा मुलांना अधिक मेहनत घ्यायला प्रोत्साहन देऊ नये असे मुळीच नाही. परंतु, आपल्या किंवा कुठल्याही प्रयत्नांनंतरही फलनिष्पत्ती मनासारखी मिळत नसेल तर त्यात इतकं जास्त वाईट वाटायचं किंवा प्रयत्न करणाऱ्याला दोष देणे खरंच महत्त्वाचं आहे काय याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

जीवन हे प्रायोगिकरीत्या जगायचं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल हे गरजेचं नाही. चुकांमधून शिकायला हवे हे नक्की, परंतु चुका करणारी व्यक्ती तुम्ही असो वा दुसरा कुणी, त्याला आजन्म दोषी ठरविण्याचं कारण नाही. कारण ज्यांच्या चुकांवर सतत बोट ठेवलं जातं ते मग बऱ्याचदा प्रयत्न करायचंच सोडून देतात. त्यांचा आत्मविश्वास संपतो आणि ते निराशेत जीवन जगतात.
महान वैज्ञानिक एडिसन आपल्या चुकांबद्दल म्हणाले, ""मी 999 वेळा बल्ब कसा नाही बनवायचा ते शिकलो, म्हणून हजाराव्यावेळी बल्ब बनवण्यात यशस्वी झालो.'' तुमच्या चुकांपासून बोध घ्या आणि आपल्या जवळच्यांनाही चुकांपासून प्रेरणा घ्यायला प्रेरित करा.

Web Title: sapna sharma writes about life

टॅग्स