उत्सव "अश्‍वशक्ती'चा...

horse-fair
horse-fair

नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्‍यातील सारंगखेडा इथे महानुभाव संप्रदायाचे एकमुखी श्रीदत्त मंदिर आहे. दरवर्षी दत्त जयंतीला याठिकाणी यात्रा भरते आणि ती महिनाभर सुरू राहते. सातपुड्याच्या कुशीत अन्‌ तापीच्या काठावर वसलेल्या या स्थानाचा ठसा आता भारताच्या नि जगाच्याही नकाशावर ठळकपणे उमटू लागला आहे, तो इथल्या घोडेबाजारामुळे! सारंगखेड्यात यात्रेनिमित्त भरणाऱ्या या अनोख्या बाजाराला सुमारे 350 वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांपासून या घोडेबाजाराचेही रूपडे पालटू लागले आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे नंदुरबारचे पालकमंत्रीही असल्याने त्यांनी पुढाकार घेत या यात्रेचे पर्यटनाच्या दृष्टीने "ब्रॅंडिंग' सुरू केले. पर्यटन विकास महामंडळाने गेल्या वर्षीपासून घोड्यांचा बाजाराला "चेतक फेस्टिव्हल'ची व्यापकता आणली. परिणामी पारंपरिक "यात्रे'ची जागा सुनियोजित "इव्हेन्ट'ने घेतली आणि उत्सवाला "फेस्टिव्हल'ची झळाळी आली. त्यामध्ये आता जातिवंत अश्‍वांच्या प्रदर्शन- विक्रीबरोबरच त्यांच्या शर्यती आणि अगदी सौंदर्य- नृत्य स्पर्धाही होतात. देशातील बहुतांश प्रांतांतील विविध जातींचे अश्‍व यात सहभागी होत असले, तरी आजही पंजाबी, मारवाडी व काठियावाडी अश्‍वच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.

पूर्वी देशभरातील अनेक संस्थानिक, वतनदार घोड्यांच्या खरेदीसाठी सारंगखेड्याला यायचे, आता ती जागा राजकीय नेते, उद्योगपती अन्‌ सिनेअभिनेत्यांनी घेतली आहे. साधारण दोन हजार अश्‍वांचा सहभाग आणि किमान एक ते सव्वा हजार अश्‍वांच्या विक्रीतून या यात्रेत कोट्यवधींची उलाढाल होते. त्याशिवाय, खानदेश आणि राज्य स्तरावरील अनेक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे या फेस्टिव्हलचे आणखी एक वैशिष्ट्य. विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकार या महिनाभराच्या काळात सारंगखेड्यात येऊन आपली कला सादर करतात. अनेक देशांचे सांस्कृतिक प्रतिनिधी, छायाचित्रकार, पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे तर आता पुष्कर मेळ्याप्रमाणे ही यात्रा नि इथला घोडेबाजारही ग्लोबल होतो आहे. घोडेबाजाराची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सारंगखेड्यात "अश्‍व संग्रहालय' उभारण्याची घोषणा गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेदरम्यान केली होती. यंदाच्या यात्रेत या संग्रहालयाचे भूमिपूजन होणार आहे. एका अर्थाने "चेतक फेस्टिव्हल'मुळे खानदेशातील आणि त्यातही नंदुरबारसारख्या दुर्गम, आदिवासी भागातील एक लोकोत्सव जगभरात पोचला आहे. हिवाळी पर्यटनासाठी नव्या स्थळाच्या शोधात असणाऱ्यांना तोरणमाळच्या सान्निध्यातील सारंगखेड्यात पडू लागलेल्या घोड्यांच्या टापा नक्कीच खुणावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com