हौस ऑफ बांबू : ‘पंचतारांकित’ मराठी!

पत्र लिहिण्यास कारण की हल्ली निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी मंडळी फाइव स्टार हॉटेलांमध्ये जाऊन राहण्याची फ्याशन आली आहे.
Hous of bamboo
Hous of bambooSakal
Summary

पत्र लिहिण्यास कारण की हल्ली निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी मंडळी फाइव स्टार हॉटेलांमध्ये जाऊन राहण्याची फ्याशन आली आहे.

नअस्कार!

प्रिय उषाताई, मा. अध्यक्षा, मराठी साहित्य महामंडळ, यांसी शि. सा. न. विनंती विशेष. कशा आहात? फारा दिवसात गाठभेट नाही. मे महिन्याच्या पहिल्या तारखेला तुम्ही महामंडळाचा चार्ज घेणार आहात, असं कळलं होतं. घेतला का?अभिनंदन. बाय द वे, दर तीन-चार महिन्यांनी होणारं अखिल भारतीय साहित्य संमेलन यंदा वर्ध्यात होणार असल्याचं कळलं. कळून फार आनंद झाला. (वर्ध्याऐवजी मुंबई म्हटलं असतं तरी आनंदच झाला असता.) आता वर्ध्यातच भेटू! मायमराठीचा उगम वऱ्हाडात झाल्याचं काही (वऱ्हाडातले) भाषा संशोधक सांगत असतात. त्या भूमीत पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचा मांडव पडणार, हे किती छान! अर्थात तुमच्या आधी महामंडळाच्या अध्यक्षपदी बैसलेले मराठी साहित्यग्रामाचे सरपंच कौतिकराव यांनी मात्र मराठीचा उगम मराठवाड्यात झाल्याचं मध्यंतरी ठासून सांगितलं होतं. वऱ्हाड वि. मराठवाडा हा वाद जुना आहे. त्यात पडायला नको. मी वाद घालणार होते, पण त्यांनी मुकुंदराजाच्या ‘विवेकसिंधू’त तसा पुरावाच आहे मुळी, असं सांगितल्यानं मागे फिरल्ये. मी विवेकसिंधू वाचलेला नाही. मराठी समीक्षकांनीही तो वाचला असेल असं वाटत नाही. तेव्हा हा विषय इथंच थांबलेला बरा. असो.

पत्र लिहिण्यास कारण की हल्ली निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी मंडळी फाइव स्टार हॉटेलांमध्ये जाऊन राहण्याची फ्याशन आली आहे. फाइव स्टार हॉटेलमध्ये राजकीय डावपेच चांगले सुचतात, असं दिसतं. (हॉटेलवाल्यांनाही बल्क बुकिंग भेटत असल्यानं तेही खुश!) ते स्वाभाविकच आहे. पूर्वीच्या काळी काही नाणावलेले प्रकाशक आपल्या गोटातल्या सराईत लेखकास हाटेलीत डांबून ठेवत, आणि त्याच्याकडून सटासट कादंबरी लिहून घेत. एका बुजुर्ग कविवर्यास मुंबईत गाणे लिहिण्यासाठी असेच हाटेलच्या खोलीत (बाहेरुन) कडी घालून ठेवलं होतं. पण कविवर्यांस अजिबात काही सुचेना, हे बघून (खरे तर हॉटेलचं बिल बघून) त्यांना सोडून देण्यात आलं. (सोडल्यानंतर लागलीच कविवर्यांस काव्य सुचलं म्हणे.) काही लेखक मंडळी दिवाळी अंकांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी कुठेतरी खोली घेऊन राहात, आणि अर्धा डझन कथा घेऊनच स्वगृही परतत असत. सारांश, हाटेल आणि साहित्य यांचा फार जवळचा संबंध होता.

मराठी साहित्य संमेलनासाठी निवडणुका घेण्याचीही लोकशाही परंपरा होती. पण काही वैचारिकांच्या आग्रहापोटी अध्यक्ष बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. (आमचे लक्ष्मीकांत देशमुखसाहेब हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले शेवटचे!) निवडणुका का एवढ्या वाईट असतात? साहित्याच्या क्षेत्रातही व्यवस्थित निवडणुका वगैरे घेऊन अध्यक्ष निवडला तर राजकारण्यांनी सुरु केलेली ‘हॉटेल थेरपी’ साहित्यालाही (लोकशाहीप्रमाणंच) सुदृढ करेल, याबाबत मला तरी शंका वाटत नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोघे-तिघे उमेदवार रिंगणात आहेत, आणि आपापल्या गोटातल्या साहित्यिकांना त्यांनी (मतदानापर्यंत) हाटेलीत डांबून ठेवलं आहे, डांबलेले साहित्यिक आपापल्या खोलीत बसून सटासट कथा-कादंबऱ्या लिहीत आहेत, किंवा एखाद्या साहित्यकृतीचे गहन मूल्यमापन किंवा चर्चाविमर्श करत आहेत, हे चित्रच मुळी लोभस आहे. अध्यक्षीय निवडणुकांचं रुपांतर नियुक्तीमध्ये झालं, आणि मराठी साहित्याच्या विकासाची ही संधीच आपण गमावली. नाहीतरी हल्ली राजकारणी लोक साहित्य संमेलनाच्या मांडवात (ठणकावून) वावरतातच. निवडणुकीनंच काय घोडं मारलं आहे?

तेव्हा, औंदा होऊन जाऊ द्या. निवडणुका, हॉटेल निवास, गुप्तमतदान...घोडेबाजार की काय म्हंटात तो...होज्जाने दो! बाकी सर्व भेटीअंती. कळावे. आपली.

- कु. सरोज चंदनवाले

ता. क. : वर्ध्यात फाइव स्टार हॉटेल नसली तरी हरकत नाही! नागपूर काय वाईट आहे? कु. स.चं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com