हौस ऑफ बांबू : आता कशाला ‘उद्या’ची बात?

Hous-of-Bamboo
Hous-of-Bamboo

नअस्कार! सर्वप्रथम आमचे लाडके लेखक रा. अनंताजी खरे यांचे ‘उद्या’साठी ‘आज’च मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा मानाचा पुअस्कार मिळाला, त्याबद्दल एकदा अभिनंदन, आणि त्यांनी तो विनाविलंब नाकारला, याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खरे तर मला त्यांचा हेवाच वाटतो. इतकी सुरेख कादंबरी आपल्या हातून लिहून व्हावी. रसिकजनांची वाहवा मिळवावी, नंतर साहित्य अकादमीनं तिला पुरस्कार द्यावा, आणि आपण तो नम्रपणे नाकारावा, असे कुठल्या लेखकाला वाटणार नाही? एखादा पुरस्कार नाकारावा, असं मलाही भारी वाटतं. किंबहुना आमचं ते एक जुनं स्वप्न आहे. पण…
मगर ये हो न सकाऽऽ..आमच्या या इच्छेचा सुगावा इतरांना लागला असावा.कारण कुणी देतच नाही पुरस्कार, मग नाकारणार कसा? पण ते असू दे.

गेले काही दिवस आ‘नंदा’च्या भरात ‘नंदाघरी नंदनवन फुललेऽऽ… फुल्लले… फुलल्ले… फुल्लल्ले…!’ हे गीत गुणगुणत्ये आहे. सकाळी जाग येत्ये तीच मुळी या गाण्याच्या ओळींनी! दिवसभर मनात हेच बोल घोळत असतात. ही किमया आमच्या रा. अनंताजींची! अनंताजी खरे यांच्या लिखाणाकडे मी कायम गगनचुंबी इमारतीकडे एखाद्याने डोकीवरची टोपी पडेपर्यंत पाहावे, तसे पाहात आल्ये आहे. केवढं टोलेजंग काम! व्वा!! रा. अनंत यशवंत खरे उपाख्य नंदा खरे हे (खरे) तर इंजिनीअर. आता दगडविटावाल्या सिविल इंजिनीअराने डोकीवर शिप्तर चढवून बांधकामाच्या साइटवर उभे राहावे की नै? पण रा. अंताजी ऐक्कायला तयार नाहीत! ते सरळ मराठी साहित्यसृष्टीच्या साइटवर हजर!!

‘दगडावर दगड, विटेवर वीट’ असं आयुष्य काढता काढता त्यांनी अधूनमधून घमेलं आणि थापी बाजूला ठेवून हातात कागद-पेन घेतलं आणि मराठी साहित्याच्या साइटवर बरंच बांधकाम घडवून आणलं. ‘‘मला समाजानं भरपूर दिलंय, आणखी काही नको!’’ असे सांगून त्यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या नाकावर दार हापटले. आता साहित्य अकादमीवाले साबणचुरा विकणारे सेल्समन आहेत का? त्यांनी घाईघाईने पुन्हा दाराची घंटी वाजवली. ‘नही मंगताय’ असा आतून आवाज आला. पण रा. अंताजी हे गृहस्थ मुळात अतिशय प्रेमळ, आखीव रेखीव आयुष्य जगणारे. त्यांनी बऱ्याच वेळाने दार उघडून ‘‘पुरस्कार घ्यायचा नाही, हे मी चार वर्षापूर्वीच ठरवलं आहे…’’ असे सांगून पुन्हा दार हापटले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आम्ही पुन्हा कधी येऊ?’’ असे अकादमीने आर्जवाने विचारले, त्यावर रा. अंताजींनी ‘उद्या’ असेच उत्तर दिले. आता बोला! उद्या गेलो तरी हेच उत्तर मिळणार, अशी भीती असल्याने हातातला पुरस्कार घेऊन जायचे कुठे? या विचारात अकादमीवाले अन्यत्र हिंडत आहेत, असं कळतं. एरवी धरणंबिरणं, पूलबिल बांधण्यात आयुष्य वेचणाऱ्या रा. अंताजी इंजिनीअरांनी कादंबरीचं टायटलच ‘उद्या’ असं ठेवलं आहे, हे अकादमीवाल्यांच्या लक्षात आलं नाही का?

रा. अंताजी हे आमच्या मराठी साहित्य जगतातील आमीर खान आहेत, असे मला वाटते. आमीर खानसुद्धा कुठलेही पुरस्कार घेत नाही. एरवी सिनेमात काम करायचे सोडून पाण्यासाठी खड्डे खोदण्याचे उद्योग करतो. हे रा. अंताजींसारखेच! त्यांनी कुदळ-फावडी, घमेलं-थापी टाकून साहित्य कंस्ट्रक्शन सुरु केले. आमीर खानाने मेकप पुसून हातात कुदळ-फावडी घेतलीन! दोघेही आपापल्या क्षेत्रात स्टार आहेत, स्टार! रा. अंताजी ऊर्फ नंदाजी यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
एकूण काय पुरस्कार स्वीकारण्यापेक्षा नाकारण्यातच शान आहे. आता कशाला ‘उद्या’ची बात? ‘नंदाघरी नंदनवन फुललेऽ….फुल्लले…फुलल्ले..फुल्लल्ले!’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com