esakal | हौस ऑफ बांबू : माझी मराठी, माझे विद्यापीठ!
sakal

बोलून बातमी शोधा

हौस ऑफ बांबू : माझी मराठी, माझे विद्यापीठ!

हौस ऑफ बांबू : माझी मराठी, माझे विद्यापीठ!

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! वरचा मथळा वाचलात ना, ते अक्चुअली आमच्या भावी मराठी भाषा विद्यापीठाचं घोषवाक्य आहे! नजीकच्या भविष्यकाळात मराठी भाषेचं स्वत:चं विद्यापीठ असेल, अंहं, -मराठी भाषा विकास प्राधिकरणही असेल, (आणि त्यावर मेंबर म्हणून माझीही नियुक्ती होईल) -असं माझं किनई जुनं स्वप्न आहे. जस्ट इमॅजिन, ‘मराठी लँग्वेज डेवलपमेंट ऑथॉरिटी’ची बांद्रा-कुर्ला काँम्प्लेक्समधली उत्तुंग, काचेरी इमारत! त्या इमारतीतून चालणारा मराठीचा विकास! अहाहा!!

मराठी भाषा विद्यापीठाचं स्वप्नही आता दूर नाही. पूर्वी ते दुपारच्या सुमारास वामकुक्षीच्या काळात पडायचं. जेवण अगदीच जड झालं तरच पडायचं! पण नंतर नंतर ते पीएमटीच्या बसमध्ये डुलक्या घेतानाही पडायला लागलं. दोन वर्षापूर्वीपर्यंत ते मध्यरात्रीच्या ठोक्याला पडत असे. आता तर गेल्या आठवड्यापास्नं चक्क साखरझोपेत…जाऊ दे!

मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ असावं ही मागणी-कम-स्वप्न का आजचं आहे? गेली ऐंशी वर्षं ते अनेकांना पडत आलंय. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, भिषग्वर्य वि. भि. कोलते यांच्यापासून ही मागणी चालू आहे. कितीतरी साहित्यिकांनी वेळोवेळी ‘मराठी विद्यापीठ आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या * * *!’ अशा वैचारिक घोषणा दिल्या. पण व्यर्थ! अखेर मराठीचा तारणहार म्हंजेच आमचे सर्वांचे आवडते (पक्षी : कौतिकाचे) रा. (थोरले) कौतिकराव यांना तलवार उपसून रणांगणात उडी घ्यावी लागली आहे.

‘‘मराठीची अशीच परवड सुरु राहिली तर मराठीची राजस्थानी आणि पंजाबी व्हायला वेळ लागणार नाही,’’ असे जळजळीत उद्गार थोरल्या कौतिकरावांनी परवा ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात (स्थळ : अर्थात पुणे) बोलताना काढले. निमित्त होतं, ‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेच्या पत्रकार परिषदेचं. मराठी विद्यापीठ पुढल्या शैक्षणिक वर्षापासून सुरु झालेच पाहिजे या मागणीसाठी २४ मराठी संस्था एकत्र आल्या आहेत, त्यांची शिखर संस्था म्हंजे ‘मराठीच्या भल्यासाठी’! आणि या शिखरावर (थोरले) कौतिकराव आक्रमकपणाने ठाले आहेत! ते म्हणाले, ‘‘ मराठीला फक्त बोली भाषेचं स्वरुप यायला नको असेल तर प्रयत्न केले पाहिजेत. हल्ली तरुणांची भाषा बदलते आहे. (ती अशीच बदलत राहिली तर-) पंधरा वर्षांनी महानगरीय मराठी लेखक जन्मालाच येणं दुष्कर होईल. (देवा! म्हंजे मराठी लेखक जन्माला घालणारं नवं प्रजोत्पादन केंद्र काढावं लागणार!!) मराठी विद्यापीठ स्थापन झालं नाही तर मराठीची अवस्था राजस्थानी आणि पंजाबीसारखी होईल.’’

(ओए, रब्बा!) हल्ली राजस्थानी म्हटले की ‘म्हारे हिवडामां नाचे मोर’ किंवा ‘पधारो म्हारे देस..’ असलंच काही आठवतं. (‘हिवडा मां’ म्हंजे नेमके कुठे मोर नाचतो, हे मला बरीच वर्ष कळत नव्हतं. म्हणून मी हे गाणं कधी गुणगुणत नसे. असो.) पंजाबी भाषेत तर फक्त ‘ ब्राऊन मुंडे’ किंवा ‘काला चश्मा जंचदा है…जचदा हैगोरे मुखडे पे’ किंवा ‘ धक धक धक धक धडके ये दिल, छनछन बोले अम्रितसरी चूडियां’ असली दिलफेक गाणीच असतात, दुसरे काही साहित्यच निर्माण होत नाही, असा माझा समज होताच.

पण मराठीत हे कुठलं? ते काहीही असो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल, तेव्हा मिळेल, परंतु, प्राधिकरण आणि विद्यापीठ या दोन्ही गोष्टी आता मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आता मैदानात थेट आमचे थोरले कौतिकराव आणि त्यांची मराठी फौज उतरली आहे. ‘मराठी भाषा विकास प्राधिकरणासह, मराठी विद्यापीठ स्थापन झालेच पाहिजे!’ ही आता मराठी साहित्यिकांची नवी घोषणा आहे…आणि त्या आगामी विद्यापीठाचं घोषवाक्य मथळ्याला दिलं आहेच. लगे रहो!

loading image
go to top