esakal | हौस ऑफ बांबू : पीडीएफ : पाटलांचा दर्दनाक फटका!
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

हौस ऑफ बांबू : पीडीएफ : पाटलांचा दर्दनाक फटका!

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! गेल्या आठवड्यातली गोष्ट. वाचक प्रेरणा दिनाच्या थोडी आधीची. मुंबईतल्या जुहू-तारा रोड परिसरात घडलेला प्रसंग. अमिताभ बच्चनच्या बंगल्यासमोर बराच वेळ उभं राहून काहीच न दिसल्याने कंटाळून चालू लागले होत्ये. हल्ली बच्चनसाहेब बंगल्याबाहेर पडत नाहीत. बंगल्यासमोरच्या चाहत्यांच्या गर्दीत एक गूढ व्यक्ती ‘आर्टीपीसीआर आठसो रुपया, आर्टीपीसीआर आठसो’ असं पुटपुटत हिंडत होती. आर्टीपीसीआर निगेटिव असलेल्यांनाच फूटपाथवर उभं राहू देतात, असं कळलं. हल्ली सिनेमा थेटरं बंद असल्यानं कुठल्या तिकिटाचा काळाबाजार होईल, हे सांगता येत नाही. मी पुढे निघाल्ये! पुढल्या चौकातून उजवीकडे वळून जुहू किनाऱ्यावर जाताना रस्त्यात एक ऐतिहासिक व्यक्ती घाईघाईने कुठेतरी जाताना दिसली. चेहऱ्यावर मास्कवटा होता. त्यातून ड्रॅगनसारखे (दोन) फुत्कार येत होते. एक हात तलवारीच्या मुठीवर ठेवल्यासारखा दिसत होता. मी तात्काळ ओळखले. हे तर आपले ‘पानिपत’कार विश्वासराऊ!

‘अय्या! राऊसाहेब, तुम्ही?’’ मी हटकलं. त्यांनी डोळे गरागरा फिरवले, पाय जोराजोरात हापटले. माझ्याकडे रोखून बघत त्यांनी अदृश्य तलवारीवरची मूठ घट्ट केली. (अमिताभ बच्चनच्या बंगल्यासमोरची गर्दी वळून आमच्याकडे बघू लागली.) राऊसाहेबांचा वाडा जुहू परिसरातच आहे. अमिताभच्या बंगल्यासमोर चित्रपट रसिकांची गर्दी असते, राऊसाहेबांच्या वाड्यासमोर मराठी साहित्य रसिकांची झुंबड असते! असो!!

‘कंपलेंट द्यायला चाललोय!’’ ते ठसक्यात म्हणाले.

‘कोणाविरुद्ध?’’ माझ्या मेलीच्या मनात नाही नाही ते विचार आले! विश्वासराऊंचे सगळे प्रकाशक (मेहता, राजहंस वगैरे) जीपमध्ये निमूटपणे बसतानाची दृश्यं तरळून गेली. आजकाल प्रकाशकांचे दिवस काही बरे नाहीत. कुण्णी कुण्णी पुस्तकं वाचत नसल्यानं सगळी पंचाईत झाली आहे. ‘‘चोरीची कंपलेंट आहे... चोर, डाकू, दरोडेखोर, लुच्चे कुठले!’’ राऊसाहेबांनी दोनचार तलवारीचे हातसुद्धा केले.

‘माझी बहुमोल पुस्तकं पीडीएफ स्वरूपात इंटरनेटवर हिंडतायत! रॉयल्टी कोण देणार? फुकटे लेकाचे!’’ मास्कवट्यामधून फुत्काराचे ढग उमटले. जुहूत त्या दिवशी धुके पसरल्याचे हवामान खात्याने नंतर जाहीर केले. ‘‘आमच्या कादंबऱ्या फूटपाथवर विकतात! इंटरनेटवर फुकट वाचतात…अशानं मराठी साहित्य भिकेला लागेल!,’’ राऊसाहेबांनी टिपेचा सूर लावला. मागल्या खेपेला त्यांच्याबरोबर पन्हाळा ते विशाळगड ट्रेक केला होता, तेव्हा पावनखिंडीत ते अशाच टिपेच्या सुरात ओरडले होते, ते आठवले.

…मग मी राऊसाहेबांबरोबर जुहू पोलिस ठाण्यात गेले. तिथले फौजदार नेमके राऊसाहेबांची ‘महानायक’ मोबाइलवरच (फुकटात) वाचत होते. त्यांनी आधी कंपलेंट नोंदवण्यास कुरकूर केली. ‘जाऊ देना, लोक वाचतायत तर वाचू देत. वाचनाची आवड कशी लागणार? तुमच्यासारखे जंटलमन लेखक जर असं वागू लागले तर…’ वगैरे उपदेश त्यांनी करुन पाहिला. पण चिते की चाल, बाज की नजर और राऊसाहेब की तलवार पर संदेह नहीं करते! कंपलेंट लिहून घ्यावीच लागली. निम्मी बाजी जिंकल्याच्या आनंदात राऊसाहेबांनी मला ‘आमची ‘चंद्रमुखी वाचा की’, ‘नागकेसर वाचा की’, ‘लालबाग वाचा की’, अशा विनंत्यांचा सपाटा लावला. ‘विकत घेऊन वाचा’ हे कंसातलं अनुच्चारित वाक्य मला दरवेळी ऐकू येत होतं.

‘बेस्ट लक हं!’’ मी म्हटलं.

‘बचेंगे तो और भी लडेंगे!’’ असं म्हणत राऊसाहेब जुहू गल्लीत अदृश्य झाले. या घटनेनंतर दोनच दिवसांनी वाचक प्रेरणा दिनी मराठी भाषा विभागाने शासन निर्णय काढला की, वाचकांनी एकमेकांना पीडीएफ स्वरुपातच एकमेकांना पुस्तके भेट पाठवावीत! म्हंजे सगळं मुसळ केरात! प्रकाशक डोक्याला हात लावून बसले, आणि राऊसाहेबांच्या मोहिमेचंच पानिपत झालं!! याला म्हणतात, पीडीएफ! पाटलांचा दर्दनाक फटका…एक दिलेला, एक खाल्लेला!

loading image
go to top