हौस ऑफ बांबू : वाङ््मयीन कोरोना प्रवाह...

नअस्कार! भविष्यातील मराठी साहित्यकृतींची समीक्षा (पक्षी : परीक्षण) कशी असेल? याचा वानोळा आम्ही येथे सादर करीत आहोत.
Corona
CoronaSakal

नअस्कार! भविष्यातील मराठी साहित्यकृतींची समीक्षा (पक्षी : परीक्षण) कशी असेल? याचा वानोळा आम्ही येथे सादर करीत आहोत. सांप्रतकाळी मराठी वाङमयाच्या क्षेत्रात सारेच वाङमयीन प्रवाह पार आटले आहेत, हे आपण बघतोच आहो. कोरोना साहित्याला मात्र बहर येत आहे. आजमितीला सारेच लेखक कोविडानुभूतीवर आधारित काहीतरी लिहायचा यत्न करीत आहेत. लेखकच का? साधे पेशंटसुध्दा (बरे झाल्यानंतर) आपापले अनुभव लिहून समाजमाध्यमांवर टाकीत आहेत. हा एक पोस्ट कोविड सिंड्रोम असेल का? असेल अथवा नसेल, परंतु, यातूनच कोरोना साहित्याचा नवा सशक्त प्रवाह वाहूं लागेल, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. त्या दृष्टीने मी एका काल्पनिक कोरोना साहित्यकृतीवरील एक काल्पनिक परीक्षण लिहून ठेवत आहे, जेणेकरुन भविष्यातील समीक्षकांनाही बरे पडेल!

‘विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशले...’(टिप : नमनालाच ज्ञानेश्वराला दंडवत घातला की टिपण आपोआप वैश्विक पातळीवर जाते.) या संत ज्ञानेश्वरांच्या (टिप : ज्ञानोबामाऊली वगैरे लाड नाय हां! ही समीक्षा आहे!!) ओवीची अनुभूती यावी, असा प्रयास सर्वच वैश्विक साहित्याचा असतो. किमान तसा तो असणे अपेक्षित आहे. कारण साहित्याची मूळ भूमिकाच ही विश्वाचे आर्त शोधणारी असते. त्या दृष्टीने पाहूं गेल्यास अश्वमेध ऊर्फ पप्पू पोवळे यांची ‘विषाचा प्याला’ (प्रकाशक : लट्टू प्रकाशन, नारायणपेठ) ही लघुकादंबरी काही अंशी यशस्वी आणि बव्हंशी अपयशी ठरते, असे म्हणावे लागते. प्रस्तुत कादंबरीचा नायक बीमार आहे, आणि एका कोविड केंद्रातील ‘आय’ वॉर्डात दाखल आहे. कोविड संशयित, कोविड पॉझिटिव, कोविडग्रस्त ते कोविडमुक्त अशा चार टप्प्यातील त्याचा हा प्रवास वाचला की फ्रान्झ काफ्का यांच्या ‘मेटामॉर्फोसिस’ या नितांतसुंदर कथेची आठवण होते. लेखकाने हे चारही टप्पे अतिशय तपशीलात लिहिले आहेत व रसिक वाचकांनी त्याला समाज माध्यमावर आंगठे उमटवून भरघोस प्रतिसाददेखील दिला आहे. वैद्यकीय उपचारांचा भाग थोडा कंटाळवाणा झाला आहे. विशेषत: त्यातील टेस्ट, आर्टीपीसीआर, एचारसीटी, रेमडेसिवीर आदी उल्लेख टाळता आले असते तर बरे झाले असते.

लोकांना हल्ली याचा उबग आला आहे, असे वाटते. परंतु, ‘गडगडाट करत वॉर्डबॉय राजूने ऑक्‍सिजनचा सिलिंडर ढकलत आणला, तेव्हा मरुवक्कम मुळ्ळगारु’ (टिप : अर्थ विचारु नका, शोधूही नका! सापडणार नाही!!) या दक्षिणी चित्रपटाची नायिका ललिथागौरी हिच्या लोळणफुगडीची आठवण झाली...’ असे सूचक वाक्‍य पप्पू पोवळे लिहून जातात, किंवा नर्स सुषमा हिला ‘सिस्टर’ अशी हांक मारणे जिवावर कसे आले, हेही ते प्रामाणिकपणाने नमूद करतात, तेव्हा कादंबरीची उंची वास्तवाच्या खडकावर खऱ्या अर्थाने आदळते. मात्र डॉ. साटम यांचे खलप्रवृत्तीचे पात्र केवळ रंजनासाठीच आल्यासारखे वाटते. अर्थात डॉ. साटम यांनी पेशंट पोवळे यांच्या तंबाकूच्या पुड्या फेकून दिल्या, तो प्रसंग संघर्षमय वठला आहे! हमेशा पीपीइ किटमध्ये वावरुन वॉर्डात दहशत माजवणाऱ्या या डॉक्‍टराला पेशंट पोवळे यांनी एकदाही एकसंध पाहिला नाही, हे विशेष! चेहरामोहरा, आकारउकार नसलेला खलनायक असलेली ही मराठी साहित्यातील पहिलीच कादंबरी ठरावी, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. एकंदरित हा ‘विषाचा प्याला’ वाचकांनी रिचवायला हरकत नाही असे वाटते. त्यात स्मरणरंजनाबरोबरच मरणरंजनाचीही अनुभूती मिळते. हेच या कादंबरीचे यश आणि अपयशही! असो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com