हौस ऑफ बांबू : मराठी रही हमरी मातृबोली…!

आदरणीय योगी आदित्यनाथजी, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेस, नअस्कार! पहिल्यांदाच आपल्याला पत्र लिहित आहे.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

आदरणीय योगी आदित्यनाथजी, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेस, नअस्कार! पहिल्यांदाच आपल्याला पत्र लिहित आहे.

आदरणीय योगी आदित्यनाथजी, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेस, नअस्कार! पहिल्यांदाच आपल्याला पत्र लिहित आहे. मागल्या खेपेला एकदा बाबा रामदेव यांना तारुण्यपीटिकांसाठी पतंजलीचं काही रामबाण औषध निघालं आहे का, असं विचारण्यासाठी (फोटोसकट) पत्र पाठवलं होतं. त्यांनी उलटटपाली वजन कमी करण्यासाठीचा क्याटलॉग पाठवलान! असो. पत्र लिहिण्यास कारण की आमच्याकडील एक उत्तर भारतीय मराठी नेते (किंवा मराठी उत्तरभारतीय नेते म्हटलं तरी चालेल!) मा. क्रिपाशंकरजी यांनी गेल्या आठवड्यात पत्र पाठवून उत्तर प्रदेशात शाळेमध्ये मुलांना मराठी शिकवण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यानुसार आपण प्रायोगिक तत्त्वावर वाराणशीत (पक्षी : काशी) मराठी शिकवण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्याचंही समजलं. हार्दिक अभिनंदन!

आमच्या मराठी भाषेसाठी (हल्ली) कोण येवढं करतं? एकटे भाषामंत्री मा. सुभाषाजी देसाई किती ठिकाणी पुरे पडणार? उत्तर प्रदेशातील मुलांना मराठी शिकवून तयार करुनच रोजगारासाठी महाराष्ट्रात पाठवण्याची ही आयडिया नामी आहे, हे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच. आपल्या आदेशानुसार लौकरच उत्तर प्रदेशातली मंडळी घडाघडा मराठी बोलू लागतील, असा विश्वास मला वाटतो. एक काळ असा येईल की, उत्तर प्रदेशातल्या दुकानांमध्ये ‘चांगला रवा आहे का हो?’ किंवा ‘आलिबागचे कडवे वाल आले आहेत’ अशा पाट्या लागतील! राजहंस, मॅजेस्टिक, नवचैतन्य वगैरे प्रकाशकांची कार्यालये लखनौत उघडतील. ‘मराठी साहित्याला काळाचं भान आहे काय?’ असा परिसंवाद काशीनगरीत झडेल! उत्तरेतल्या सुपीक भूमीत लखलखते मराठी साहित्याचे मळे फुलतील, आणि एखादा उत्तरभारतीय मराठी लेखक भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईल, असंही स्वप्न माझ्या नेत्रकमलांसमोर (कमल हा शब्द मी मुद्दाम वापरलाय हं!) तरळून गेलं. ‘मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार रामप्यारे दशरथप्रशाद चौबे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर’ अशी ब्रेकिंग न्यूजही मी मनाच्या टीव्हीवर पाहून घेतली. ‘रामकलीच्या काही कविता’ हा काव्यसंग्रहदेखील मनातल्या मनात मी चाळला. जौनपुरजवळच्या एखाद्या निसर्गरम्य खेडेगावातली ही संवेदनशील मनाची तरुण कवयित्री रामकली म्हंजे मीच, असं मला क्षणभर वाटून गेलं.

ताबडतोब मला दोन ओळी सुचल्या त्या अशा :

मराठी रही हमरी मातृबोली, यदि आज वो राजभासा नहीं, नहीं आज ऐस्वर्य मेरी माई तुमको, यसस्वी रहे दिव्य आसा यहीं।।

...कशा आहेत? काही मराठी समीक्षकांना मी या ओळी ऐकवल्या. तर त्या ऐकून ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, कविवर्य माधव ज्युलियन यांचा आत्मा तळतळेल!! मी लक्षच दिलं नाही. नाहीतरी मराठीची अवस्था बघून अनेकांचे आत्मे नेहमीच तळतळत असतात. त्यात काय येवढं? उत्तर प्रदेशात यापुढे गाँव गाँव में बच्चा मराठी मे रोएगा, हे खरं असलं तरी, आमच्या मुंबई-पुणे-औरंगाबाद- नागपुरातले लोक काही मागे नाहीत. तिथली मुलं मराठीत रडली, तर इथली हिंदीत रडतील! मुंबईत तर एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला अभावितपणे ‘एक पायधुनी देना’, ‘कांदिवली चलेगा क्या?,’ ‘भय्या कैसा दिया पापलेट?’ असंच विचारतो. ‘‘मां भैन नही हय क्या तेरी?’’ किंवा ‘‘जादा शाणपत्ती मत कर बे, खिसक ले’’ हे उद्गार हिंदी वाटत असले तरी प्रत्यक्षात मराठीच आहेत. योगीजी, आम्ही हिंदी जगवतो, तुम्ही मराठी टिकवा! यातच सगळ्यांचं हित आहे. कळावं. सदैव आपली.

-कु. सरोज चंदनवाले.

ता. क. : इतरांना पत्र पाठवताना मी पाकिटात गुलाबाच्या पाकळ्या घालत्ये. तुम्हाला झेंडूच्या पाठवल्या आहेत. स्वीकार व्हावा ही विनंती! .स. चं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com