हौस ऑफ बांबू : हो, हो...मन में है ‘विश्वास’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! पदर खोचून बुरुजावरोन घोडा उडवोन गनिमांस कापून काढत वेढा तोडत निघावे, आणि विश्वासरायांना भेटावे, ऐसे स्फुरण चढले आहे.

हौस ऑफ बांबू : हो, हो...मन में है ‘विश्वास’!

नअस्कार! पदर खोचून बुरुजावरोन घोडा उडवोन गनिमांस कापून काढत वेढा तोडत निघावे, आणि विश्वासरायांना भेटावे, ऐसे स्फुरण चढले आहे. पण...जाऊ दे! माझ्या नव्या स्फूर्तीचे कारण आहेत, अर्थातच आमचे परममित्र आणि मराठी साहित्यभूमीचे एकमेव रणझुंझार सरसेनापती रा. विश्वासराऊ पाटीलसाहेब!! अवघे भारतीय साहित्यविश्व विश्वासराऊंचा लोहा मानते. (सध्या मी त्यांच्याच हिंदीत अनुवाद झालेल्या कादंबऱ्या वाचत असल्याने भाषेवर थोडा परिणाम झाला आहे.) त्यांची छत्रपतींच्या चरित्रावर बेतलेली ‘महासम्राट’ सध्या चिक्कार गाजत्ये आहे. (त्यामुळे प्रकाशक मेहताशेठ चिक्कार खुश आहेत...) असं असूनही आमचे विश्वासराऊ गप्प बसतील? नाव सोडा! मला वाटलं होतं की, कादंब्री चांगली सुपरहिट झालेली असताना रा. विश्वासराऊ आपल्या जुहूच्या विश्वासदुर्गात आरामात बसून लावण्याबिवण्या ऐकत असतील! पण कसलं काय नि कसलं काय!! अचानक सुलतानढवा करोन त्यांनी साहित्य अकादमीचं संस्थानच उद्धस्त करोन टाकिले!!

वास्तविक वयाच्या जेमतेम तिशीत असताना विश्वासराऊंनी साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावला होता. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर (किंवा झाल्यामुळे) जरा बऱ्या वजनीगटाची कादंबरी लिहिली की अकादमी हमखास मिळते, असा अकारण गैरसमज होवोन काही महाभागांनीही जाडजूड कादंबऱ्या आणून टाकल्या होत्या. पण सोनं ते सोनंच हो! बेगडाला का कांचनाची कळा येणाराय?

वाचक हो, त्याही काळात अकादमीत चिक्कार कंपूशाही होती. साठोत्तरी अकादमी सदस्यांनी बरेच राजकारण करोन विश्वासराऊंचा पत्ता कट करण्याचे बारभाईंचे कारस्थान रचिले होते. परंतु, काव्यगडाचे किल्लेदार रा. मंगेशराऊ पाडगांवकर यांनी शर्थीने विश्वासराऊंचा किल्ला झुंजवत ठेवला, आणि त्यांना अकादमीचा पुरस्कार मिळवोन दिला, अशी बखरीत नोंद झाली आहे. तीस-पस्तीस वर्षे केवळ ‘सवंग प्रसिद्धी नको’ म्हणून रा. विश्वासराऊ गप्प बसले. पण गेल्या सप्ताहात अचानक त्यांनी अकादमीच्या मेंबरांच्या आसनांवर (किंवा खाली) जेजाळा डागल्या!!

पुण्यात एका भाषणात रा. विश्वासराऊंनी गगनभेदी गर्जना करत जाहीर केले की, ‘‘माझ्या सौंगड्यांनो, सोबत्यांनो, जिवाभावाच्या मैतरांनो, काळ मोठा कठीण आला आहे. अकादमीरूपी चंदनाच्या झाडाला कंपूशाहीरूपी विषारी सर्पाने वेटोळे घातले आहे. या सर्पाचा घात केल्याशिवाय हा विश्वासराऊ स्वस्थ बसणार नाही. हा नाग ठेचीऽऽन, तवाच आराम करीऽऽन...’’ हे ऐकोन रसिक हादरोन गेले. एवढ्यावर न थांबता रा. विश्वासराऊंनी म्यानातून आपली लेखणीरूपी तलवार काढोन थेट हल्ला चढवला, आणि ते अकादमीवर चाल करोन गेले. सोबत खाशांची मोजकी फौज होती. पण तरीही पराक्रमाची शर्थ करोन त्यांनी अकादमीतील साहित्यकारणाची दुर्दशा चव्हाट्यावर आणली.

साहित्यकारण कसले, राजकारणच ते!! तिथल्या त्या कंपूशाहीचा पर्दाफाश करणारा ‘पोष्ट’रूपी तोफगोळा ‘फेसबुक’रूपी ‘मुलुखमैदान’च्या मुखातून उडाला, आणि- ताडताड पावले टाकत रा. विश्वासराऊंनी अकादमीत प्रवेश केला, तो केलाच! ते स्वत:च मेंबर झाले!! हे म्हंजे एखाद्याने हाटेलात जाऊन ‘इडली, मेदूवडा (सिंगल, सांबार अलग) आणि चाय’ अशी ऑर्डर देऊन, नंतर यथावकाश मिश्या पुसत गल्ल्यावरच्या अण्णाच्याच हातावर उलटे बिल टेकवावे, तशापैकी झाले!!

रा. विश्वासराऊंच्या सुलतानढव्याची खबर ऐकोन अकादमीची जुनी मेंबरे भराभरा पांगली. गनिमाची पळता भुई थोडी जाहली. दाती तृण घेवोन, आणि हात रुमालात बांधोन गनिम शरण आला. रा. विश्वासराऊंनी त्यांस मोठ्या मनाने अभय दिले. फेसबुकवरली पोष्ट त्यांनी काढून टाकिली, आणि सिंहासनानिकटच्या खुर्चीत बैसोन ते सुहास्य वदनें वदले : ‘‘आता नवा भिडू, नवा राज! कळलं? बसा!’’