
...कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी १९६८ साली, खनपटीला बसलेल्या पु. ल. देशपांड्यांना या आठ ओळी लिहून दिल्या, तेव्हा पुणं होतं.
हौस ऑफ बांबू : असे ‘बालगंधर्व’ आता न होणे...!
जसा जन्मतो तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे
असा बालगंधर्व आता न होणे!
रतीसारखे रुपलावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठांत शोभे
सुधेसारखी साद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे!
...कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी १९६८ साली, खनपटीला बसलेल्या पु. ल. देशपांड्यांना या आठ ओळी लिहून दिल्या, तेव्हा पुणं होतं, पुण्यात जंगली महाराज रोड होता आणि त्याच्या पलिकडल्या तीरावरचं बालगंधर्व रंगमंदिर बांधून पूर्ण झालं होतं. ज्या बालगंधर्वाचं हे मंदिर, त्यांच्याच हस्ते त्याचं भूमिपूजन ६२ साली पार पडलं होतं. मंदिर उभं राहून पहिल्या नांदीचे स्वर त्या वास्तूत घुमले, तेव्हा मात्र बालगंधर्व तिथं तसबिरीच्या रुपानं आणि त्या खालच्या या आठ ओळींनिशी उपस्थित होते. नारायणराव बालगंधर्वांची ही वास्तू पुल देशपांडे यांच्या संकल्पनेतून (आणि आम्हा पुणेकरांच्या मिळकत करामधून) साकारलेली. तिच्या जागी मॉडर्न थिएटर? पार्किंग? अँफी थिएटर? क्याफेटेरिया?...अहह! अशक्य!!
नअस्कार! वर दिलेलं हेच सगळं मी परवा बालगंधर्व रंग मंदिराच्या प्रांगणात (आवार नव्हे, प्रांगणच!) बोलले, तर एका नवख्या, कनिष्ठ, अननुभवी, हौशी आणि ज्युनियर ऊर्फ स्ट्रगलर कलाकाराने ‘काकू, तुम्हाला अजून आठवतं सगळं?’ असे उद्गार चारचौघात काढले. (त्याची ‘पुरुषोत्तम’मधली एकांकिका पडेल! पडेल! पडेल!!) मी लक्षच दिलं नाही. काकू काय?
आमचं ‘बालगंधर्व’ जागच्या जागी पाडणार आणि तिथं भव्य नाट्यसंकुल तीन वर्षाच्या आत उभारलं जाणाराय. परवाच बारामतीचे मा. दादासाहेब आले होते, त्यांनी अंतिम आराखड्याला मान्यता दिली म्हणे. दादासाहेब आले तेव्हा सर्वांनी (पक्षी : काही मोजके पुणेकर) एकमुखाने ‘दादाऽऽ, ते आले ना!’ हा बालगंधर्वाच्या मुखी शोभलेला संवाद सामूहिकरित्या म्हटल्याचं समजतं. असो.
बालगंधर्व पाडावं की न पाडावं, हे नाटक गेली तीन-चार वर्षं पुण्यात रंगतंय. काही कलावंतांनी ‘नाटक पडलं तरी बेहेत्तर, बालगंधर्व पडता नये’ अशी भूमिका घेतली. तर काही नियतीवादी रंगकर्मींनी ‘खुर्च्या तरी बदलून पाहू, प्रेक्षक येतायत का?’ अशी भूमिका घेतली. काहीही केलं तरी मराठी प्रेक्षक (प्रशांत दामल्यांची नाटकं सोडल्यास) फिरकत नाहीत, या अनुभूतीने रंगकर्मी हैराण झाले होते. शेवटी बालगंधर्वची जागा पार्किंगला कमी पडत्ये आहे असा शोध लागला. पार्किंग वाढवले तर प्रेक्षक वाढतील, असा निष्कर्ष निघाल्यानंतर आठशे गाड्या (पक्षी : दुचाक्या) आणि अडीच-तीनशे मोटारी (पक्षी : चारचाक्या) बसतील, येवढं पार्किंग बांधून त्याला लागूनच चांगलं हजारभर खुर्च्यांचं एक, पाश्शे खुर्च्यांचं दुसरं आणि तीनशे खुर्च्यांचं तिसरं अशी नाट्यगृहं बांधून काढण्याचा आराखडा एका वास्तुविशारदानं सादर केला. वर कटकट नको, म्हणून (आणखी एक) अँफी थिएटरही बांधायची सोय ठेवली. वर क्याफेटेरिया आहेच. या नव्या क्याफेटेरियात जुनाच बटाटावडा मिळणार की पिझ्झा-बर्गरछाप काहीही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
जुन्या बालगंधर्व रंगमंदिराशी पुणेकरांचं जिवाभावाचं नातं आहे. इथं किती लग्नं जमली याचा हिशेब लागणं कठीण! बालगंधर्व, पुल आणि गदिमा अशा तीन दिग्गजांचा परीसस्पर्श झालेली ही वास्तू पाडण्यापूर्वी एक सुंदरसा समारंभ करावा, आणि या वास्तूला मन:पूर्वक निरोप द्यावा, असं वाटतं. बदल कुणाला चुकलाय? काळाच्या ओघात कुणी काकू बनतं, कुणी काही! ‘बालगंधर्व’चं बहिरंग बदललं तरी अंतरंगात तो धूपाचा गंध आणि ऑर्गनचा सूर दर्वळत राहायला हवा, एवढीच इच्छा.
Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 14th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..