
नअस्कार! साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रा. प्रा. रंगनाथराऊ पठारे यांचा पराभव झाला. मराठीचा जरीपटका दिल्लीत फडकता फडकता हुकला.
हौस ऑफ बांबू : मिश्याच्या मिषाने...!
नअस्कार! साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रा. प्रा. रंगनाथराऊ पठारे यांचा पराभव झाला. मराठीचा जरीपटका दिल्लीत फडकता फडकता हुकला. त्याआधी जहु किनाऱ्यावरील ‘शहाळे’मित्र रा. विश्वासराऊ पाटील यांची अकादमीच्या केंद्रीय कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली होती, तेव्हा कित्ती आनंद झाला होता मला!! पण रा. विश्वासराऊ (न लढता) जिंकले, आणि रा. रंगनाथराऊ (लढून) धारातीर्थी पडले! मी दोघांचंही एकाच वेळी अभिनंदन आणि सांत्त्वन करत्ये.
साहित्य अकादमीची मुहूर्तमेढ १९५२मध्ये रचली गेली. तेव्हापासूनच या सर्वोच्च साहित्यसंस्थेला मराठीचं वावडं आहे, असं दिसतं. एकही मराठी अध्यक्ष तिथं आजवर झालेला नाही. उदाहरणार्थ, मागल्या खेपेला (कधी नव्हेत ते-) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या भानगडीत आमचे आदरस्थान असलेले रा. भालचंद्र नेमाडेसर पडले. -पडले म्हंजे हुबेहूब पडले वगैरे!! निवडणुकीला उभं राहून त्यांनी प्रचारसुद्धा केला नाही. अकादमीत इनमीन शंभर सदस्यांचं मतदान असतं. प्रचाराला असा काय खर्च आला असता? पण नेमाडेजींनी मिश्यांना पीळ देत प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला. म्हणाले, चायचे, आम्ही उभं ऱ्हायचं उभं, आणि यांनी मतं द्यायची मतं! हे थोरच. त्यापेक्षा पडलेलं काय वाईट? परिणामी, त्यांना उदाहरणार्थ चार मतं पडली! रंगनाथराऊंनी मात्र ही चूक केली नाही. जी गोष्ट मिशीला पीळ देत नेमाडेजींनी टाळली, तीच गोष्ट मिशीला पीळ देत रंगनाथराऊंनी आव्हान म्हणून स्वीकारली. त्यांनी झंझावाती म्हणतात, तसा प्रचार केला. परिणाम? तीन मतं मिळाली!! इन मीन तीन!!
नेमाडे-पठारे असे पराक्रमी शिलेदार आघाडीवर पाठवूनदेखील अकादमीच्या रणांगणात मराठी आव्हानाचं पानिपत झालं, यामुळे मराठी साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे. इतकं लिहूनही...जाऊ दे. अकादमीच्या टोटल शंभर मतदारांपैकी ९७ जणांनी मतदान केलं. त्यातली साठ मतं गजलकार माधव कौशिक यांना मिळाली. पस्तीसेक मतं कानडी साहित्यिक मल्लपुरम वेंकटेश यांनी घेतली. उरलेली तीन आमच्या रंगनाथराऊंना! वास्तविक अकादमीत चार मराठी मतं आहेत. किमान चार तरी मतं रा. रंगनाथराऊंना पडायला हवी होती की नाही? पण त्यातलाच एक मराठी साहित्यिक फुटला!! तो कोण, याचा शोध घेणं सध्या चालू आहे.
रा. रंगनाथराऊंचा पाडाव करणारा हा मराठी मतदार नेमका कोण असेल? माझा वहीम रा. विश्वासराऊंवर आहे. कारण याच विश्वासराऊंना अकादमीत कशाला घेताय? असा रोखठोक सवाल रा. रंगनाथराऊंनी डिसेंबरात केला होता. त्याचा वचपा निघाला, असं माझं स्पष्ट मत आहे. हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांच्या साहित्यिक योगदानापेक्षा रा. रंगनाथराऊंचं योगदान मोठं आहे, असा ताम्रपट ज्येष्ठ साहित्यिक (पण मराठी) लक्ष्मीकांत देशमुख यांनी कालपरवाच बहाल केला होता. तरीही त्यांना तीनच मतं! याचा अर्थ मराठी माणूस ‘पीआर’ (पक्षी : स्नेहधर्म) कमी पडतो, हे उघड आहे. यापुढे मराठी साहित्यिकांनी पीआर वाढवण्यासाठी काही करायला हवं. एकवेळ साहित्यनिर्मिती नाही केली तरी चालेल, पण पीआर एजन्सी नेमावी!!
रा. रंगनाथराऊ आणि रा. नेमाडेसर या दोघाही माजी उमेदवारांना चाराच्या वर मतं मिळाली नाहीत, याला कारणीभूत दोघांच्या टोकदार मिश्या! साहित्य अकादमीला मिश्यावाले साहित्यिक चालत नाहीत, हे आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे. (तरी यांनी मिश्या वाढवल्या, आणि निवडणुकाही लढवल्या!) यापुढे तरी मराठी साहित्यिकांनी अकादमीची निवडणूक लढवण्यापूर्वी दोन पथ्यं पाळावीत. एक मिश्या ट्रिम कराव्यात, आणि पीआर एजन्सी नेमून स्नेहधर्म वाढवण्याच्या कामाला ताबडतोब लागावं. त्यातच मराठीचं काही कल्याण झालं, तर होईल!