हौस ऑफ बांबू : मराठी रंगभूमीचे आल्केमिस्ट ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! सर्वप्रथम आमचे धर्मगुरु, मार्गदर्शक, आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथाकार आणि मराठी रंगभूमीचे आल्केमिस्ट ऊर्फ किमयागार रा. रा. सतीश वसंत आळेकरसरांचे डब्बल अभिनंदन.

हौस ऑफ बांबू : मराठी रंगभूमीचे आल्केमिस्ट !

नअस्कार! सर्वप्रथम आमचे धर्मगुरु, मार्गदर्शक, आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथाकार आणि मराठी रंगभूमीचे आल्केमिस्ट ऊर्फ किमयागार रा. रा. सतीश वसंत आळेकरसरांचे डब्बल अभिनंदन. एका दिवसात दोन दणदणीत पुरस्कार!! एक थेट सांगलीचं विष्णुदास भावे गौरव पदक (विथ रु. पंचवीस हजार रोख) आणि दुसरा पाच लाखांचा सांस्कृतिक विभागाचा प्रभाकर पणशीकर स्मृती जीवन गौरव…चोवीस तासात सव्वापाच लाखांचे दोन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पुण्यातले यच्चयावत सगळे अड्डे (पक्षी : वाडेश्वर, रुपाली, वैशाली, विश्व, प्रभा, एटसेटरा) ओसंडून वाहू लागले. ‘याला काय अर्थय? पासून ते ‘ हे म्हंजे अगदी थोरच झालं!’ पर्यंत अनेक संमिश्र प्रतिक्रियांचा गडगडाट सुरु झाल्यामुळे पुण्यातून पाऊस काढता पाय घेत असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे.

रा. सं. व. आळेकर यांचा जन्म दिल्लीतला, (पण) शिक्षण पुण्यातलं. लहानपणी (म्हंजे आळेकरांच्या लहानपणी) त्यांनी ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक मंत्रमुग्ध होऊन पाहिल्याची रंगभूमीच्या इतिहासात ठळक नोंद आहे. (लहानपणी ‘शांतता!..’ बघितल्यावर एखाद्याचं काय होणार, तुम्हीच सांगा! ) त्यामुळे त्यांना रंगभूमीवर कारकीर्द घडवण्यावाचून तरणोपायच नव्हता. थोडंफार लौकिक यश गाठीशी असावं म्हणून ते रसायनशास्त्र शिकले. पण तेही कोणाकडून? तर फर्गसनमधले प्राध्यापक भालबाजी केळकरांकडून!! त्यामुळे व्हायचं ते झालंच. पीडीएच्या प्रयोगशाळेत त्यांचा चंचुप्रवेश झालाच. बॅकस्टेज, अभिनय आणि लेखन या क्रमानं आपोआप घडत गेलं. बॅकस्टेजवाले म्हणाले, अभिनय करा. अभिनय करणारे म्हणाले, लेखन करा. लेखन करायचं तर छापणार कुठे? तर सत्यकथेत! पुढे पुढे तर आळेकरांनी एकांकिका लिहायची, आणि संपादक राम पटवर्धनांनी ती ‘सत्यकथे’त साहित्य म्हणून छापायची असे समांतर प्रयोग सुरु झाले. उदाहरणार्थ, ‘झुलता पूल’ ही एकांकिका आळेकरांनी ‘सत्यकथे’साठी खास लिहिलेली होती. पण पटवर्धनांनी तिला टोक आणण्यासाठी ती परत पाठवली. तिला टोक करुन पुन्हा खटाववाडीत पाठवण्यापूर्वीच ती पुरुषोत्तम करंडकात बेस्ट ठरली. मग राम पटवर्धनांनी ती ‘सत्यकथे’त बिनाटोकाचीच छापली, असा रंगीबेरंगी इतिहास आहे.

‘झुलता पूल’ वाचूनच थोर नाटककार विजयराव तेंडुलकरांनी ‘अरे, तुमचा तो आळेकर आहे ना? ‘ही इज ए प्लेराइट’ हे अजरामर उद्गार काढले होते. इथून पुढे अर्वाचीन मराठी रंगभूमीचा इतिहास घडला. ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे,’ ‘दुसरा सामना’ वगैरे अप्रतिम प्रयोग आळेकरांच्या लेखन-दिग्दर्शनातून घडले, आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहात राहिले. थिएटर अकॅडमीचे एक संस्थापक अशीही आळेकरसरांची ओळख आहेच. याच उमेदीच्या काळात त्यांना डॉ. जब्बारजी पटेल नावाचा मित्र भेटला. दोघांनी मिळून रंगभूमीचं भलं केलं. म्हणजे, ‘घाशीराम कोतवाल’ पेश केलं. ये दोस्ती बर्करार रहे, असंच आम्ही (चाहते) म्हणू!! रा. आळेकरसरांची नाटकं परदेशातही गाजली. एडिंबरा फ्रिंज फेस्टिवलमध्येही त्यांनी आपली नाटके नेली. युनियन जॅक उतरल्यानंतर नाट्यकलेत महाराष्ट्र (आणि पुणं) इतकं पुढे गेल्याची तिथल्या विंग्रजसाहेबांना कल्पनाच नव्हती…

चेष्टेचा भाग सोडा. आळेकरसर आमचेच (ललित कला केंद्राचे) आहेत. रंगभूमीशी संबंधित बहुतेक सगळे पुरस्कार त्यांना एव्हाना मिळाले आहेत. अगदी पुरुषोत्तम करंडकापासून पद्मश्रीपर्यंत! विष्णुदास भावे गौरवपदक हा मात्र खरोखर मानाचा तुरा आहे! गेली दोन वर्षे हे पदक कुणालाच मिळालं नव्हतं. कोरोनामुळे हं! योग्यतेचं कुणी नव्हतं, असं काही नाही. सेनापती बापट रस्त्यावरून आळेकरसर मॉर्निंग वॉकला जाताना दिसतात. आता तिथंच त्यांना गाठून प्रत्यक्ष अभिनंदन करायचं ठरवलं आहे. तेवढाच आमचाही मॉर्निंग वॉक!

Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 24th September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..