हौस ऑफ बांबू : नवयुग चूमे नैन तिहारे...!

नमस्कार! सकाळी सकाळी जाग आली. बाहेर पाहिलं तेव्हा चैत्र आला होता! आंब्याची तांबडीलूस कोवळी पानं कुहू कुहू म्हणत होती. आभाळात तांबडं फुटत होतं.
Mohan Agashe
Mohan AgasheSakal Digital
Summary

नमस्कार! सकाळी सकाळी जाग आली. बाहेर पाहिलं तेव्हा चैत्र आला होता! आंब्याची तांबडीलूस कोवळी पानं कुहू कुहू म्हणत होती. आभाळात तांबडं फुटत होतं.

नमस्कार! सकाळी सकाळी जाग आली. बाहेर पाहिलं तेव्हा चैत्र आला होता! आंब्याची तांबडीलूस कोवळी पानं कुहू कुहू म्हणत होती. आभाळात तांबडं फुटत होतं. अचानक माझ्या ओठांवर प्रार्थनागीत आलं- ‘‘जागोऽऽ मोहन प्यारेऽऽ... जागोऽऽ.. नवयुग चूमे नैन तिहारेऽऽ...’’ तेव्हा मला माहीतही नव्हतं की आज खरोखर आमच्या प्यारे मोहन यांचा गौरव होणार आहे...

आमचे परमस्नेही परम आदरणीय सुविख्यात मानसोपचारतज्ञ प्राध्यापक डॉ. मोहननाना आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद मला जितका झाला, तितका कोणालाही झाला नसेल. डॉ. मोहननाना यांच्या मानसोपचारांचा लाभ घेणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी मी आहे, हे गुपित आजवर कोणालाही ठाऊक नव्हतं. खूप वर्ष झाली, पण कालपरवाच घडल्यासारखं वाटतं आहे. डॉ. मोहननानांची पहिली भेट कधी झाली, हे आठवत नाही, पण दुसरी भेट ससूनच्या वॉर्डात झाली एवढं आठवतंय!

डॉ. मोहननाना हे मानसोपचारांच्या विश्वातलं आदरणीय नाव आहे. त्यांची व्याख्यानं, निबंध गाजलेले आहेत. बीजे मेडिकल आणि नंतर ससूनमध्ये त्यांनी बरेच पेशंट तपासले असतील. पण पुण्याच्या हवेतच असा काहीतरी गुण आहे की काय, समजत नाही. आपण जे असतो, ते सोडून दुसरं काहीतरी करावं, अशा ऊर्मी दाटून येतात. उदाहरणार्थ, आमचे भीमसेन जोशी होते अभिजात गायक, पण त्यांना मोटार मेकॅनिकीत रस होता. दुसरेच उद्योग करुन प्रसिध्द झालेले डॉक्टर पुण्यात डझनानी सापडतील. डॉ. लागू, डॉ. अवचट, डॉ. जब्बार पटेल ही वानगीदाखल दोन-तीन नावं...

डॉ. मोहननानांना नाटकाची ओढ होती. बालनाट्यापासूनच त्यांनी सुरवात केली. पुढे कुठ्ठेही न थांबता हिंदी चित्रपटातही जोरदार भूमिका केल्या. मराठीत तर केल्याच. आपण सगळे त्यांना डॉ. आगाशे म्हणून ओळखत असलो तरी जर्मनी, इंग्लंडमध्ये वगैरे त्यांना लोक नाना फडणवीस म्हणूनच ओळखतात. ‘घाशीराम कोतवाल’मधली नानाची ती चाल अशी काही त्यांना जमली होती की, ‘‘नानात नाना, आगाशेनाना, बाकीचे नाना करिती तनाना’ असंच रसिक प्रेक्षक म्हणू लागले. ‘जा, घाश्या, मेल्या केंला तुलां कोंतवाल’ हा त्यांचा हुकूम पुन्हा तस्सा कधी ऐकू आला नाही.

मनाचिये गुंती इतका गुंतलेला हा मनुष्य अभिनयासाठी वेळ कसा काढतो, हा पुणेकरांसाठीही एक न सुटलेला गुंता आहे. तसा तो सुटला असता तर त्यांचा महिमा पुण्यभूषणवाल्यांना इतक्या उशीरा का कळला असता? डॉ. मोहननाना आगाशे हे अंतर्बाह्य पुणेकर आहेत, नव्हे पुण्यभूषणच आहेत!!

डॉ. आगाशेंना एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला! जुलैत समारंभपूर्वक तो त्यांना दिला जाईल. तोवर कळ काढली पाहिजे! डॉ. आगाशेंचं अभीष्टचिंतन करायला त्यांच्या घरी ‘भेटायला येऊ का?’ असा निरोपही पाठवला, पण ‘हल्ली मी पेशंट तपासत नाही,’ असा उलटा निरोप आला, म्हणून नाद सोडला. जाऊ दे.

सकाळपासून त्यांना फोन करतेय, करतेय, पण सारखा एंगेज्ड! ‘आपण ज्याच्याशी बोलू इच्छिता ती व्यक्ती दुसऱ्याशी बोलत आहे, आपण प्रतीक्षा करु शकता, नाहीतर...’ हे ऐकून ऐकून थकून गेले. शेवटी एकदाचा फोन लागला.

‘‘बोला!’’ नाना.

‘हार्दिक अभिनंदन! तुमचा फोन लागत नव्हता...’ मी.

‘फोन लागत नव्हता म्हणून अभिनंदन?’ नाना.

‘अनेकांचे फोन लागत नाहीएत, त्यांनाही माझ्यातर्फे आभार कळवून टाका’ असं एक काम त्यांनी माझ्यामागे लावून दिलं.

मी निमूटपणे फोन ठेवला, आणि पुन्हा एकदा ‘जागो मोहन प्यारे...’ हे गाणं गुणगुणत फोन फिरवू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com