Hous of Bamboo
Hous of Bamboosakal

हौस ऑफ बांबू : तेवढेच ज्ञानप्रकाशात...!

नअस्कार! काय? आजचा दिवस राखून ठेवलात की नाही? नाही? अरेच्चा...मी तर आत्तापास्नंच तयार होऊन बसल्ये आहे...

नअस्कार! काय? आजचा दिवस राखून ठेवलात की नाही? नाही? अरेच्चा...मी तर आत्तापास्नंच तयार होऊन बसल्ये आहे... आमचे फ्रेंड, फिलॉसफर, गाइड आणि मराठी साहित्यातील एकमेव ज्ञानदिवा जे की, रा. अच्युतम गोडबोलेम यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव मिळणार आहे ना आज! जायलाच हवं...नाही गेले तर ज्ञानलक्ष्यी साहित्यात मला काही रसच नाही, असं बोलतील ना लोक!

...आणि काय हो, मराठीत आधीच कोणी ज्ञानलक्ष्यी लिहीत नाही, याचं काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? आपल्या मराठीत, ज्यांनी ज्ञानलक्ष्यी लिहावं, ते ज्ञानमहर्षी उगाचच ललित साहित्यात घुटमळत बसतात नि ज्यांनी ललित साहित्यच लिहिलेलं बरं, असे महाभाग विज्ञानावर तारे तोडत असतात. चांगलं का हे?

साहित्य कसं कसदार, ज्ञानलक्ष्यी असावं. त्यायोगे वाचक कसा एका बैठकीत प्रबुध्द व्हायला हवा! ज्ञानलक्ष्यी साहित्य लिहिणं म्हंजे कविता करणं नव्हे. त्यासाठी माणसाला ज्ञानी असावं लागतं. आमचे फ्रें. फि. गा. अच्युतम गोडबोलेम आहेतच मुळी ज्ञानी! खरे तर ते महाज्ञानी आहेत, पण तसं सांगत नाहीत. संगणकापासून नॅनोटेक्नॉलजीपर्यंत आणि मानसशास्त्रापासून अर्थशास्त्रापर्यंत कित्येक विषयांवर त्यांनी रसाळ भाषेत जाडजूड पुस्तकं लिहिली आहेत. सगळी बेस्टसेलर हं! आवृत्ती पडून राहिली, अशी रडारड करायला (प्रकाशकांना) काही स्कोपच नाही.

बरं, या पुस्तकाच्या पानात पांडित्याचा अंशदेखील नाही. अगदी सामान्य बुध्दीच्या वाचकालाही सहज समजेल, अशी लिखाणाची हातोटी! मध्यंतरी अच्युतम मला रस्त्यात भेटले, तेव्हा ‘मी तुला आदर्श वाचक मानतो! सरु, तू रोल मॉडेल आहेस!’ असं म्हणाले होते. केवढी मोहरले होते. पण...जाऊ दे.

सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेतून निघालेला अच्युत गोडबोले नावाचा बुध्दिमान विद्यार्थी थेट मुंबईच्या आयआयटीत दाखल झाला. तिथून मोठमोठाल्या कंपन्यांमध्ये सीइओ म्हणून करिअर केलं. एखादा हौशी लेखक लिखाणबिखाण सोडून नोकरीला लागला की मार्गी लागला असं म्हटलं जातं. पण अच्युत गोडबोले यांची तऱ्हा निराळीच! चांगली ‘पटनी कंप्युटर्स’मधली कोट्यानुकोटीची चाकरी सोडून कॉर्पोरेट क्षेत्रातले हे विभूतीमत्त्व थेट मराठी साहित्याच्या अंगणात अवतरलं. शुध्द मराठीत याला कुणी अवदसा आठवली असं म्हटलं असतं. पण रा. अच्युतरावांनी साहित्यक्षेत्रातली आपलं नाव राखलं.

...एखाद्या बरड माळरानावर पाणाड्या आल्यावर आसपासचे लोक त्याच्याकडे श्रध्देनं बघायला लागतात. हा मनुष्यमात्र भूगर्भातलं निर्मळ जळ आपल्या दिव्यशक्तीनं वर आणणार, आणि म्हणणार- ‘‘मारा हिते बोर! चाळीस फुटावर पाणी आहे...!’’आणि कारंजं उडतं की हो! अगदी त्या भरवशाच्या पाणाड्यासारखे आहेत आमचे फ्रे. फि. गा. अच्युतम गोडबोलेम!!

मराठीच्या महालात काव्यज्योती, कादंबरीचे दिवे, कथांच्या दिवट्या, प्रवासवर्णनांचे पलिते, निबंधांचे टेंभे, समीक्षेच्या मशाली, अशी सगळी अग्निजन्य सामग्री उपलब्ध असली तरी इथल्या दालनात ज्ञानलक्ष्यी झुंबरच नाही, ही खंत वाटून अच्युतम यांनी धडाधड पुस्तकं आणण्याचा सपाटा लावला. ज्ञानलक्ष्यी पुस्तकं लिहूनही त्यांचं चांगलं चाललं आहे. अशा या गोडबोलेसाहेबांना महाराष्ट्र साहित्य परिषदेनं अंजली सोमण पुरस्कृत जीवनगौरव प्रदान करायचं ठरवलं आहे...हे ग्रेटच.

...गोरापान बांधा, हसतमुख, बुध्दिमान चेहरा, आणि हनुवटीवर खास चिकटवल्यासारखी दाढी!! (ओढून बघणारे एकदा!) ओठांवर प्रहरानुसार पुरिया, भूप, यमन किंवा बागेसरीची बंदिश!! हो, फ्रें. फि. गा. अच्युतम यांना रागदारी संगीतातलंही प्रचंड कळतं. इतकं की त्यांना याच समारंभात ‘पंडित’ ही उपाधी द्यायला हरकत नाही.

म्हणून आठवण करुन दिली...येताय ना कार्यक्रमाला? मराठी भाषा ज्ञानभाषा व्हायला हवी, असं वाटतं ना? मग याच! अहो, तेवढंच ज्ञानप्रकाशात...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com