
हौस ऑफ बांबू : ‘त्यांची’ फिल्लमबाजी आणि फटकेबाजी!
नअस्कार! रा.रा. शिरीष मधुकर कणेकर ऐंशी वर्षाचे झाले ही बातमी शुद्ध थोतांड आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सोशल मीडियावर लोक हल्ली काहीही टाकत असतात. शिरीष मधुकर अस्सल मुंबईकर आहेत, हे दुसरं थोतांड आहे. त्यांची टोमणेबाजी ऐका, ते पुण्याचे नाहीत, असं कोणीही छातीठोकपणाने म्हणू शकणार नाही. कणेकर पुण्यात असते तर आज ‘वैशाली’ किंवा ‘रुपाली’च्या किंवा ‘वाडेश्वर’च्या कट्ट्यावर असते. पण नियतीनं त्यांची दादरच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर प्रतिष्ठापना केली.
शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर कणेकर आणि त्यांचं नाटकवालं मित्रमंडळ कधी कधी जमायचं. तिथं खेळजोडे चढवून, हाताची घडी घालून ते बसलेले असत. भोवताली मित्रांचं कोंडाळं! तिथल्या कट्ट्यावर बसल्या बसल्या जो टॉक शो सुरु व्हायचा, त्याला तोड नव्हती. अनेक ऐकलेले, न ऐकलेले, घडलेले, न घडलेले किस्से-कहाण्या, इन्स्टंट शाब्दिक कुरघोड्यांना उधाण यायचं, त्या गप्पांना खमंग बटाटेवड्याचा सुगंध असे.
शिरीष मधुकर यांची दोन दैवतं जगप्रसिद्ध आहेत. (म्हणजे ती दैवतं कणेकरांची आहेत, ही बाब जगप्रसिद्ध आहे! ) एक बॉलिवुड थेस्पियन युसुफसाब ऊर्फ दिलिप कुमार, आणि गानसरस्वती लतादिदी मंगेशकर…विविध मुलाखतींमध्ये या दोघांनीही आपण कणेकरांचं दैवत असल्याचं आवर्जून सांगितलं आहे म्हणे! त्यातही दिलिप कुमार हा विषय निघाला की कणेकरांची लेखणी बहरते. लतादिदींचा विषय आला की विचारायलाच नको. मिलो न तुम तो हम घबराए,
मिलो तो आंख चुराए, हमें क्या हो गया है…अशीच अवस्था! लतादिदी गेल्या, तेव्हा एका सुप्रसिध्द (पण जगप्रसिध्द नव्हे, प्लीज नोट! ) वृत्तवाहिनीच्या निवेदिकेनं ‘‘दिदींची सर्वात आवडती पाच गाणी सांगता येतील का?’ असं त्यांना विचारलं. ‘‘छे, पाच वगैरे नाही, दोन-तीनच सांगता येतील!’ असं खवचट उत्तर शिरीष मधुकरांनी शांतपणे दिलं. स्वभावच मुळी हा असा!!
एका साप्ताहिकाच्या होतकरु संपादकानं त्यांना विनम्रतेनं सांगितलं, ‘कणेकर, तुम्ही सगळ्यांसमोर मला ‘सर’ कशाला म्हणता?’
‘सगळ्यांसमोर वेडसर कसं म्हणणार? म्हणून शॉर्टफॉर्म वापरला!’ कणेकरांनी थंड उत्तर दिलं. सदर संपादक आता निमूटपणे नियमित स्तंभलेखन करुन पोट भरतो, आणि इतरांना सर असं संबोधतो. असो.
अतिप्राचीनकाळी म्हणजे निओलिथिक युगात (त्याकाळी सोशल मीडियाचा जन्म झाला नव्हता, बरं का मुलांनो! ) ‘क्रिकेटवेध’ नामक एक चित्तवेधक पुस्तक बाजारात आलं. वाचक चमकले! खेळकर, वाचकाशी पटकन दोस्ती करणारी शैली, स्वत:लाही टोमणे मारत मारत केलेली क्रिकेटविश्वातली वर्णनं…
वेस्ट इंडिजचा एक यष्टिरक्षक होता, त्याच्यानंतर जेफ दुजाँ नावाचा यष्टिरक्षक आला. तेव्हा कणेकरांच्या लेखाचा मथळा होता : मरे एक त्याचा दुजाँ शोक वाहे…! हे असलं काहीतरी लिहून कणेकर लुभावत असत. पत्रकारितेतले भलेबुरे अनुभव घेतल्यानंतर कणेकरांनी फ्रीलान्सिंगचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी तुला ही अवदसा का आठवली? असं विचारलं होतं. पुढे त्यांच्यातला परफॉर्मर अचानक उभा राहिला, तो थेट माइक्रोफोनसमोर…त्यांच्या स्टँडअप टॉकशोजनी इतिहास घडवला. हल्ली युट्यूबवर डझनावारी असले शोज दिसतात, पण कणेकरांनी केलं ते निव्वळ कथाकथन नव्हतं. त्यात मिस्किल, बोचरा विनोद होता, किस्से-कहाण्या होत्या, रंजक इतिहास होता, आणि मुख्य म्हणजे आपुलकीचा संवाद होता…
सिनेमा हा कणेकरांचा श्वास आहे, आणि क्रिकेट हा उच्छ्वास! दोन्ही क्रिया आज ऐंशी वर्ष चालू आहेत. त्या पुढेही चालू राहोत! लगे रहो, कणेकर, अजून वीस बाकी आहेत!!