हौस ऑफ बांबू : ‘स्वावलंबी’ मराठी साहित्य!

नअस्कार! हाडाच्या साहित्यिकाला दोन मूलभूत गोष्टींची गरज असते.- शाई आणि उसंत! पैकी शाईचं येवढं काही नाही, ती (लिहायला, फासायला) मुबलक मिळते.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! हाडाच्या साहित्यिकाला दोन मूलभूत गोष्टींची गरज असते.- शाई आणि उसंत! पैकी शाईचं येवढं काही नाही, ती (लिहायला, फासायला) मुबलक मिळते.

नअस्कार! हाडाच्या साहित्यिकाला दोन मूलभूत गोष्टींची गरज असते.- शाई आणि उसंत! पैकी शाईचं येवढं काही नाही, ती (लिहायला, फासायला) मुबलक मिळते. पण उसंत कुठून आणायची? लागोपाठ दोन साहित्य संमेलनांचा श्रमपरिहार धड होत नाही, तोवर तिसऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची गडबड सुरु झाल्यानं जिवाला उसंत म्हणून नाही. खरं तर या काळात एखादाचा चांगलासा, मोठ्या साइजचा, पुठ्ठ्याच्या बांधणीतला वैचारिक ग्रंथ लिहावा म्हणून मी संकल्प सोडला होता. पण बैठक मारायला फुर्सत म्हणून मिळाली नाही. त्याआधी मी तीन काव्यसंग्रहांचा गुच्छ रसिकांना पेश करायचा बेत केला होता. कोरोनाकाळामुळे तो गुच्छ कोमेजला. ‘कविताबिविता करण्यापेक्षा वैचारिक ग्रंथ हाणा’ असा सल्ला (पुण्याच्या) एका प्रकाशकानं दिला होता. पण कसचं काय! संमेलनांचे पाढे म्हणताना आम्हा हाडाच्या साहित्यिकांची दमछाक होऊ ऱ्हायली आहे...

नाशिकजवळ आडगावातलं संमेलन झालं, नंतर सव्वा महिन्यापूर्वी उदगीरची वारी झाली. पुढलं ९६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन आता वर्ध्याला घेण्याचं ठरलं आहे. १९६९ साली वर्ध्यात साहित्य संमेलनाचा मांडव पडला होता. तेव्हा पुरु. शिव. रेगे अध्यक्ष म्हणून लाभले होते. ‘सुहृद चंपा’ आणि ‘रुपकथ्थक’ या टोपणनावानं त्यांनी खूप सुंदर कविता लिहिल्या होत्या. ही ‘सुहृद चंपा’ कोण? हे बघायला इतर लेखक गर्दी करायचे म्हणे. (रेग्यांना बघून परत जायचे!) वर्ध्याला यंदा कोण अध्यक्ष लाभणार ही उत्सुकता आहे. मराठी साहित्याग्रामाचे सरपंच कौतिकराव ठाले-पाटील यांनी (डॉ. जयंतराव नारळीकरांकडे बघून) अध्यक्ष ‘फिजिकली फिट’ असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. डॉ. नारळीकर फिजिकली फिट होतेच, कारण फिजिक्समध्ये त्यांचा हात आजही कोणी धरणार नाही. पण अध्यक्ष तंदुरुस्त हवा होता. मग भारत सासणेसाहेबांची निवड आपोआप (पक्षी : बिनविरोध) झाली. आता वर्ध्याच्या संमेलनाध्यक्षपदासाठीही तंदुरुस्त उमेदवार निवडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून काही इच्छुकांनी ताबडतोब ‘जिम’ लावल्याच्या बातम्या आहेत! येत्या जानेवारीपर्यंत सलमान टाइप बॉडी करुन देण्याचे वचन काही जिमवाल्यानी लेखकांना दिल्याचंही समजतं. या निमित्तानं मराठी साहित्य नव्हे, पण निदान साहित्यिक तरी बळकट होतील, हे काय कमी आहे?

विदर्भ साहित्य संघाचं यंदा शताब्दीवर्ष आहे. त्यामुळे येत्या जानेवारीत शताब्दी सोहळा झाला की लागलीच वर्ध्यात संमेलनाचा बार उडवायचा बेत शिजून ऱ्हायला होता. त्यानुसार साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती गेल्या आठवड्यात वर्ध्याची ट्रिप करुन आली. ‘या इथे लक्ष्मणा, बांध कुटी’ या गीताच्या चालीवर अखेरीस तिथल्या स्वावलंबी महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडव टाकावा, असा आदेश जारी करण्यात आला आहे. स्वावलंबी मैदानात सगळं स्वयंसेवा पध्दतीनं केलं, तर कार्यकर्त्यांचा फौजफाटाही वागवावा लागणार नाही, अशी सूचनाही काही महाभागांनी केली म्हणे. काहींनी नजीकच्या ‘सेवाग्रामात साहित्य संमेलन का घेऊ नये?’ असा सात्त्विक विचार नम्रपणे मांडला. त्यावर काही सुजाण आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांनी, तिथे लेखक मंडळींना लागणाऱ्या ‘सोयीसुविधा’ पुरेशा नाहीत, याकडे लक्ष वेधलं. हे खरंय! संमेलनाला येणाऱ्या लेखकांपैकी अनेकांना सोयीसुविधा फार लागतात. दिवस साहित्यकार्यात व्यतीत होतो, पण संध्याकाळी सोयीसुविधा शोधण्याची पाळी येत्ये! काही लेखकांना सोयीसुविधांशिवाय स्फुरणच चढत नाही! बरेचसे लेखक आपापल्या सोयीसुविधा घेऊन येतात, हा भाग वेगळा!

सेवाग्राम-वर्धा हा गांधीविचारानं भारलेला परिसर आहे. वर्ध्यात मराठी साहित्यिक आणि प्रकाशकांना स्वावलंबनाचे बेसिक धडे मिळाले तरी लई झालं, म्हणायचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com