
कादंब्रीचे पहिले पान उघडले आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक चुकून अंथ्रोपॉलजीच्या वर्गात घुसल्याची जाणीव झाली! माणसाला २० ते २०हजार हर्टझ इतक्या कंप्रतेची कंपने ऐकू येतात.
‘धीरेटॉफ चेंजॉफ मोमेंटमीज डायरेक्ट लीप्रपोर्शनल टु धी अप्लाइड फोर्स, अण्ड इट टेक्स प्लेस इन द डायरेक्शनॉफ धी फोर्स...’ न्यूटनचा भौतिकशास्त्राचा हा नियम आम्हाला लहानपणापास्नं तोंडपाठ आहे, याला कारण आमचे भौतिकशास्त्राचे गुर्जी. त्यांच्या दोन्ही गालफडांवर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या बहारदार मिश्या असत. ’अक्शन अँण्ड रिअक्शन आर इक्वल इन मॅग्निटूड बट अपोझिट इन डिरेक्शन’ या न्यूटनच्या दुसऱ्या (एका) नियमाप्रमाणे दो दिशांना जाणाऱ्या त्या अक्कडबाज मिशा...अहाहा!! आज आठवले तरी मनात गहिरे भाव दाटून येतात...
कालांतराने लक्षात आले की आमचे हे भौतिकचे सर थेट, हुबेहूब, तंतोतंत विख्यात साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारेसरांसारखेच दिसतात. आश्चर्य म्हंजे प्रा. पठारेसरांचा विषयही भौतिकच! किती योगायोग नं? तेव्हापास्नं आम्ही पठारेसरांच्या भजनीच लागलो आहो.
गेली अनेक दशके प्रा. पठारे मराठी साहित्याचे विश्व अक्षरश: गाजवत आहेत. त्यांच्या प्रतिभेच्या भराऱ्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होत नाहीच, उलट त्यांच्या साहित्यकृतींमध्ये खोली, उंची, रुंदी, वस्तुमान वगैरे सगळे भौतिकशास्त्रातले घटक व्यवस्थित असतात. हे केवळ भौ-प्राध्यापकीमुळेच शक्य झाले असणार. अगदी ‘कुंठेचा लोलक’पास्नं आत्ताच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ (व्हाया टोकदार सावलीचे वर्तमान, नामुष्कीचे स्वगत, ताम्रपट, दु:खाचे श्वापद इत्यादी) प्रा. पठारेंनी मराठीत प्रचंड मोलाची (किंवा मोलाची प्रचंड) भर घातली आहे. गेल्याच वर्षी त्यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही महाकादंब्री प्रकाशित झाली. श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनानं हे कार्य सिद्धीस नेले! पठारेसरांची नवीकोरी कादंब्री म्हटल्यावर वाचकांच्या उड्या पडणारच. उडी मारणे सोपे होते, पण कादंब्री उचलून घरी नेण्यासाठी टेम्पो करावा लागला! सातशे शहाण्णव पानांचा ऐवज तो... कादंबरी इ. स. १२९८मध्ये सुरु होत्ये, नि २०१९मध्ये संपत्ये. म्हंजे ७३०वर्षांच्या कहाणीला सातशे शहाण्णव पाने! करा हिशेब!!
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कादंब्रीचे पहिले पान उघडले आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक चुकून अंथ्रोपॉलजीच्या वर्गात घुसल्याची जाणीव झाली! माणसाला २० ते २०हजार हर्टझ इतक्या कंप्रतेची कंपने ऐकू येतात. त्याअलिकडचे आणि पलिकडचे कर्णेंद्रियांना काही म्हणता काऽऽही कळत नाही. जन्ममरणाचे असेच असणार. जन्माच्या अलिकडचे आणि मरणाच्या पलिकडचे आपल्याला काय ठाऊक असते? काऽऽही नाही.... असे काहीसे त्यांनी ‘सातपाटील कुलवृत्तांता’च्या प्रारंभालाच म्हटले आहे. एवढे वाचल्यावर कुणीही वीस हजार कंप्रतेचा एक मोठ्ठा श्वास घेईल.
प्रा. पठारे यांना मराठी भाषा विभागाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा जाहीर झाला आहे. पाठोपाठ उत्कृष्ट प्रकाशनाचा श्रीपु भागवत पुरस्कार त्यांचेच प्रकाशक ‘शब्दालय’नं पटकावला आहे. प्रा. पठारेंचा जीवन गौरव चांगला पाच लाखांचा आहे, आणि ‘शब्दालय’ला जाहीर झालेला पुरस्कार दोन लाखांचा! एकूण सात लाख इथेच झाले!! मराठी भाषेला सुगीचे दिवस येत आहेत की काय? या विचाराने मनमोराचा पिसारा फुलून आला आहे अगदी.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकंदरितच मराठी सारस्वताच्या अंगणात हल्ली शास्त्रज्ञांची लगबग वाढू लागल्याचा भास होतोय. आपले आदरणीय जयंतविष्णू नारळीकरसर आपली अध्यक्षीय दुर्बिण घेऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नाशिकच्या मांडवात पोचलेसुध्दा आहेत. त्यात आता प्रा. पठारेसर न्यूटनच्या नियमानुसार पुढे सरकले आहेत.
डोक्यावर सफरचंद आदळल्यामुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा नियम सुचला, आणि त्याने विज्ञानाला कलाटणी दिली, असे म्हणतात. मराठी सारस्वताच्या अंगणात हे सफरचंदाचे झाड कुणी लावले कुणास ठाऊक. पण त्याच्या बुडाखाली सध्या दोन प्रतिभावंतांची डोकी (वरुन पडणाऱ्या सफरचंदाची वाट पाहताना) दिसताहेत. एक आहे नारळीकरांचे, दुसरे अर्थात आपले प्रा पठारेंचे. मराठी भाषेला कलाटणी देणारी हीच ती वेळ. हाच तो क्षण.