esakal | ढिंग टांग : शॉक ट्रीटमेंट!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : शॉक ट्रीटमेंट!

माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांची लूटमार चालवलीये तुम्ही लोकांनी! लाखो रुपयांची विजेची बिलं पाठवता, आणि आता भरायला सांगता? अरे, काय हा सरकारी कारभार आहे की सावकारी? हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही!!

ढिंग टांग : शॉक ट्रीटमेंट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दादू : (फोन करु की नको करु, अशा संभ्रमात अखेर...) हलोऽऽ...सदूराया, मी रागावलोय!

सदू : (थंडपणे) बरं! मग?

दादू : (चवताळून) प्रचंड संतापलोय!

सदू : (अति थंडपणे) ताक पी, ताक! संताक...आपलं ते हे...संताप कमी होतो!

दादू : (स्फोट होत) खामोश! थंडीच्या दिवसात ताक प्यायला सांगतोस? सर्दी झाली म्हंजे?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदू : (खांदे उडवत ) मग काढा पी!!

दादू : (विषय बदलत ) ते जाऊ दे! माझी एक गंभीर तक्रार आहे! मला दिवाळीचा फराळ कां पाठवला नाहीस?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदू : (टोमणे मारत) तोंडावरचा मास्क काढावा लागतो, फराळासाठी! तू काढतोस का? चकल्या सॅनिटायझरमध्ये बुचकळून खाणं बरं नाही, आणि करंज्या साबणाने धुता येत नाहीत...हे तुला माहीत असेलच!

दादू : (खवचटपणाने ) अरेच्चा हो की! माझ्या लक्षातच आलं नव्हतं! तू धुऊन घेतल्यास वाटतं करंज्या!! हाहा!!

सदू :

(इशारेवजा) कळतात ही बोलणी मला! फोन का केला होतास ते लौकर सांगून टाक! नंतर मनात आलं तरी तुला फोन फिरवता येणार नाही!

दादू : (कपाळाला आठी घालत) ही धमकी आहे?

सदू : (खुलासेवजा) नाही! नोटिस म्हण हवं तर! आम्ही तुमची वीज कापणार आहोत! वीज कापली की तुम्ही तुमचे फोन चार्जिंगला कुठे लावणार? चार्जिंग नसेल तर फोन कसे फिरवणार?

दादू : (खवळून) सद्या, तोंड सांभाळून बोल! गाठ माझ्याशी आहे! आमची वीज कापणारे अजून जन्माला यायचेत!!

सदू : (निर्विकारपणे) काय करशील?

दादू : (कात्रीसारखी बोटं हवेत चालवत) मीच तुमची वीज कापीन! पाणी कापीन! ग्यास कनेक्‍शन तोडीन!!

सदू : (उडवून लावत) अरे, जा रे जा! हल्ली मंत्रालयाचा नवा पत्ता ठाऊक आहे नं? कृष्णकुंज, शिवाजी पार्क, दादर!! समस्या अनेक, उपाय एकच - मनसे!

दादू : (थयथयाट करत) खामोश! हा काय प्रकार आहे?

सदू : (दात ओठ खात) माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांची लूटमार चालवलीये तुम्ही लोकांनी! लाखो रुपयांची विजेची बिलं पाठवता, आणि आता भरायला सांगता? अरे, काय हा सरकारी कारभार आहे की सावकारी? हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही!!

दादू : (काही न कळून) तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय! कोण कापणारेय महाराष्ट्राची वीज? हे लोकांचं लाडकं, लोकप्रिय, कल्याणकारी राज्य आहे, मिस्टर सदूराज!! इथे असले प्रकार चालत नाहीत!... माझ्या माहितीनुसार आम्ही विजेच्या बिलात भरघोस सवलत देणार आहोत!

सदू : (थंडपणे संयम राखत) तुमच्या वीजमंत्र्यानंच जनतेला सांगितलंय! सरकारी तिजोरीत दमडी नसल्याकारणाने बिलं पूर्ण भरा! तुमच्या सरकारात काय घडतंय, हे तुम्हाला माहीत नसतं, असं दिसतंय!!

दादू : (बुचकळ्यात पडत ) असं कसं होईल? दिवाळीपूर्वी आम्ही झक्कास आश्वासन दिलं होतं की!

सदू : (छद्मीपणाने) आश्वासनांवर कोण विश्वास ठेवेल तुमच्या? आता आम्हीच रस्त्यावर उतरुन तुम्हाला शॉक देणार आहोत!

दादू : (निक्षून सांगत ) एक काय ते ठरवा! शॉक देणार की वीज कापणार? दोन्ही चालणार नाही!!

सदू : (विचारपूर्वक) शॉक ट्रीटमेंटला पर्याय उरला नाही!

दादू : (कुत्सितपणे) शॉक द्यायलासुध्दा वीज लागतेच! ती कुठून आणणार? सांगाल का?

हाहा!!