ढिंग टांग!  :  सुलट उलट ! 

ब्रिटिश नंदी
Saturday, 17 October 2020

आम्ही किती छॉऽऽन ठेवला होता दौलतीचा कारभार! एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात! नाहीतर तुमची ही राजवट! देवा रे देवा!! बघावं तिथं नुसती कुलपं!! तुम्ही म्हंजे "लॉकडाऊन सीएम'च आहात!!

कमळाबाई : (दार ठोठावत) अहो, ऐक्‍लं का? 

उधोजीराजे : (आतून) अजिबात नाही! 

कमळाबाई : (पुन्हा कडी वाजवत) ईश्‍श! नाही काय म्हंटाय? दार उघडा! 

उधोजीराजे : (आतूनच) नाही उघडणार! आमच्या गडाचे दरवाजे सध्या बंद आहेत! लॉकडाऊनचा नियम आहे!! उद्या, दिवसाढवळ्या या! 

कमळाबाई : (मुसमुसत) इतकं निष्ठूर व्हावं का एका माणसानं? नातं तुटलं म्हणून माणूस तर नाही ना गेलं!! हुस..हुस...फ्रुंफ्रांफ्री...फुस्स!! 

उधोजीराजे : (क्षणभर शांतता...कानोसा घेत) तुम्ही रडताय की हसताय? 

कमळाबाई : (नाक फेंदारत) कळतात बरं ही टोचून बोलणी! सवय आहे म्हटलं आम्हाला!! दार उघडा, आम्ही जाब विचारायला आलो आहोत! 

उधोजीराजे : (संतापून) तुम्ही आम्हाला जाब विचारणाऱ्या कोण? या उधोजीला कुणीही जाब विचारत नसतो! 

कमळाबाई : (कुत्सितपणानं) हुं:!! तरी बरं, मास्क लावू की नको, हे सुद्धा इतर दोघा जोडीदारांना विचारता!! ...आम्ही जाब विचारणारच! तो आमचा हक्कच आहे मुळी!! 

उधोजीराजे : (बेपर्वाईनं) उद्या विचारा! आता निघा!! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कमळाबाई : (दार जोराजोरात वाजवत) आमच्या हातात जेव्हा दौलतीचा कारभार होता, तेव्हाचे दिवस विसरलात वाटतं! 

उधोजीराजे : (पुन्हा क्षणभर शांतता...सुस्कारा टाकत) तेच विसरायचा प्रयत्न करतोय! 

कमळाबाई : (दुर्लक्ष करत) आम्ही किती छॉऽऽन ठेवला होता दौलतीचा कारभार! एकदाही लाइट गेली नव्हती पाच वर्षात! नाहीतर तुमची ही राजवट! देवा रे देवा!! बघावं तिथं नुसती कुलपं!! तुम्ही म्हंजे "लॉकडाऊन सीएम'च आहात!! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उधोजीराजे : (दातओठ खात) जातीस का बोलावू शिपायांना? 

कमळाबाई : (आणखी डिवचत) आमचे सगळे निर्णय उलटे फिरवताय म्हणे! 

उधोजीराजे : (खवळून) सोडतो की काय!! माझ्या रयतेच्या हितासाठी मी काहीही करीन!! 

कमळाबाई : (टोमणा मारत) रयतेच्या हितासाठी की अहंकारासाठी!! 

उधोजीराजे : (निक्षून सांगत) खामोश! अहंकाराची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही कमळाबाई!! आम्ही जे काही केलं ते महाराष्ट्राच्या हितासाठीच केलं!! तुम्ही घेतलेले सुलट निर्णय आम्ही उलट करणार, आणि उलट घेतलेले निर्णय सुलट करणार! त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे समजून असा!! 

कमळाबाई : (हट्टीपणाने) वा रे वा!! आमचे निर्णय फिरवता! तेव्हा आमच्या निर्णयाला तुमचंच पाठबळ होतं ना? नाणार म्हणू नका, मेट्रो म्हणू नका, जलयुक्त शिवार म्हणू नका...आपण जोडीनं घेतलेले निर्णय तुम्ही आता फिरवताय! असे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येतात का कुणाला? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीराजे : (अर्थपूर्ण पद्धतीने) आमच्या नव्या घड्याळात येतात!! त्या जलयुक्त शिवार योजनेची तर चौकशीच लावणार आहे मी! मग बघा, कशी तंतरते ती!! हाहा!! 

कमळाबाई : (हेटाळणी करत) आहाहा!! करा ना वाट्टेल तेवढ्या चौकशा करा! कर नाही त्याला डर कसली?...आणि काय हो, नातं संपलं की दुष्मनी सुरु होते का? आपण किती आणाभाका घेतल्या होत्या, त्या आठवा जरा! 

उधोजीराजे : (कर्तव्यकठोरपणे) आठवा नाही नि नववा नाही!! तुमचा माझा संबंध संपला! फायनल!! तुम्ही इथून जा बरं!! 

कमळाबाई : (पदर खोचून) मी इथेच बसून राहीन पुतळ्यासारखी! मुळीच हलणार नाही! मग काय कराल? कधीतरी तुम्हाला दार उघडावं लागेलच नं? लॉकडाऊन कधीतरी संपणारच आहे, तेव्हा कळेल इंगा! (फतकल मारत) जय महाराष्ट्र!! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about