ढिंग टांग : पत्र लिहिण्यास कारण की...

ढिंग टांग : पत्र लिहिण्यास कारण की...

आदरणीय वैनीसाहेब यांसी,
शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम आपणां सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. खरे तर आपल्याला शुभेच्छा कार्ड पाठवणार होतो. पण शेवटी असे पत्र लिहिणे भाग पडले आहे. काय करु? इलाजच राहिला नाही. नव्या वर्षाच्या प्रारंभालाच तक्रारीचा अर्ज दाखल करावा लागत आहे. (हे म्हणजे केकच्या खोक्‍यात चिक्की पाठवण्यासारखे झाले, हे मला कळते आहे. असो.) पत्रास कारण की, आपण नेमलेली (काही) माणसे सध्या आमच्यावर (विशेषत: माझ्यावर) इतक्‍या गलिच्छ भाषेत टीका करत आहेत, की मन अगदी विटून गेले आहे. गेले काही दिवस सारखे मळमळल्यासारखे वाटते आहे. किती भयंकर ती भाषा! काय ती गलिच्छ शब्दयोजना! किती ते नावे ठेवणे! छे छे, अगदी उबग आला आहे. (माझ्यासारखा) सभ्य माणूस मनातदेखील उच्चारणार नाही, असे शब्द छापले आणि बोलले जात आहेत. किंबहुना, ‘अशी काय टीका केली?’ असे तुम्ही विचारलेत, तर मला डिटेलवार सांगताही येणार नाही, अशा भाषेत मला नावे ठेवली जातात. मी रोज घरी गेल्यावर रडतो, वैनी, ढसाढसा रडतो!!

वैनी, मी मूळचा कोल्हापूरचा. (पण सध्या पुण्यात असतो!!) आमच्या कोल्हापुरात भाषेचा साज काही औरच आहे. अस्सल मऱ्हाटी वळणाची कोल्हापुरी बोली जिभेवर चढली की शब्दांना निराळीच झळाळी चढते. आमच्या कोल्हापुरी बोलीत तांबड्या-पांढऱ्या रश्‍शाचा झटका आहे, आणि कोल्हापुरी व्हाणेचा फटकाही!! पण... वैनी, कोल्हापूरचा असलो तरी स्वभावाने मी खूप हळवा आहे हो! कोल्हापूरचा असल्याने मी रोज बदामाचे दूध पिऊन चारशे दंडबैठका काढत असणार, आणि शरीराप्रमाणेच मनानेही टणक असणार, असा तुम्हा लोकांचा गैरसमज झाला आहे का? असेल तर कृपया तो काढून टाकावा. मी कविमनाचा संवेदनशील माणूस आहे...

आदरणीय वैनीसाहेब, तुमच्या गोटामध्ये एक संजयाजी नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी तर माझे गिऱ्हाईक केले आहे. रोज सकाळी काही मिळाले नाही की हे गृहस्थ माझ्यावर तुटून पडतात. ते वाटेल तसे बोलतात नि लिहितात, म्हणून इतरही त्यांचीच री ओढतात. बाकीचे मग (मला) हसतात. वाईट भाग म्हंजे आमच्या पक्षातले लोकही हंसतात! हसतील त्याचे दात दिसतील! त्यांना चांगली अद्दल घडवावी, म्हणून मी (आमच्या) वरिष्ठांकडे तक्रार केली होती. वरिष्ठ म्हणाले की,‘ ते आमचं कशाला ऐकतील? त्यांच्या हायकमांडकडे तक्रार करा!‘ मध्यंतरी मी स्वत: त्यांना फोन करुन बजावले होते की, ‘हे असं टोचून टोचून बोलणं थांबवा नाहीतर माझ्याशी गाठ आहे!’ तर मलाच खिजवत म्हणाले की, ‘बोलणार! एकदा नाही शंभरदा बोलणार! काय कराल?’

‘मी वैनीसाहेबांना नाव सांगीन!’ असे मी ठणकावले. ...गडी घाबरल्यासारखा वाटला. एकदा खिशात हात घातलान, मग हाताची घडी घातलीन! मग स्वत:च्याच तोंडावरुन हात फिरवत म्हणाले की, ‘ इतकं टोकाला जाण्याचं काय कारण आहे? आपण आपसांत भांडण मिटवू की!’ गप्प बसलो होतो, पण गृहस्थ पुन्हा वळणावर गेला!! काल तर मला गळकी किटली म्हणाले!! हो, हो, ग-ळ-की कि-ट-ली!! वांचून मी स्फुंदून स्फुंदून रडलो.

वैनीसाहेब, तुमच्या माणसाला आवरा, असे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. कृपया लक्ष घालावे ही विनंती. मोठ्यांस सा. न. आणि लहानांस अ. उ. आ.!! आपलाच. 

चंदूदादा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com